जेव्हा तुम्हाला मानसिक गुंत्यात सापडल्यासारखं वाटतं, तेव्हा एक सोपी गोष्ट करावी. स्वत:ला विचारा की आपण जे करीत आहोत, त्यात आनंद वाटतो का? हलकंफुलकं वाटतं का? तसं वाटत नसेल तर समजून घ्यावं की तुमच्या वर्तमान क्षणावर काळाची सावली पडली आहे आणि मग तुम्हाला जीवन जगणं एक ओझं वाटेल, एक संघर्ष वाटेल.
तुम्ही जे करत आहात, त्यात आनंद, सहजता वाटत नसेल तर तुम्ही जे करीत आहात ते बदलावं असा याचा अर्थ नाही. जे करता त्या पद्धतीत बदल करणं पुरेसं आहे. काय यापेक्षा कसं मिळणार, त्याची उपलब्धी काय असेल याकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही जे करता ते अधिक लक्षपूर्वक करा. वर्तमानात म्हणजे या क्षणाला जे येईल तिकडं खोलवर लक्ष द्या. याचा अर्थ जे आहे ते संपूर्णपणे आहे तसं स्वीकारा; कारण तुम्ही एखाद्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देणं आणि त्याच वेळी त्याला विरोध करणं या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी एकाच वेळी तुम्ही करू शकत नाही.
तुम्ही वर्तमान क्षणाचा आदर करता, स्वीकार करता तेव्हा सगळं असमाधान लुप्त होतं, संघर्ष संपुष्टात येतो आणि त्या वेळी तुमचं जीवन आनंदानं आणि समाधानानं वाहू लागतं. तुम्ही वर्तमान क्षणांचं भान ठेवून काही करू लागता, त्या वेळी तुमची कृती गुणवत्तापूर्ण आणि आत्मीयतेनं भरलेली असल्याची जाणीव तुम्हाला होते. मग ती कृती अगदी साधी आणि छोटी का असेना!
तुमचं चित्त वर्तमानापासून इतर बाबीकडे भरकटणं थांबतं तेव्हा तुमची कृती आनंदानं उतू जाते. तुमचं चित्त वर्तमान क्षणाकडे वळताच तुम्हांला मन:शांती अनुभवता येते.
‘प्रॅक्टिसिंग द पॉवर ऑफ नाऊ’ – एखार्ट टॉल, अनुवाद प्रा. दिनकर बोरीकर, साकेत प्रकाशन, पृष्ठे – ११२, किंमत – १०० रु.