हातमागावर विणलेल्या अस्सल भारतीय साडय़ांची परंपरा खूप मोठी आहे. यामध्ये महाराष्ट्रातली पैठणी, मध्य प्रदेशातल्या चंदेरी आणि महेश्वरी साडय़ा, तामिळनाडूतली सुंगडी, बंगळुरूजवळच्या कांची गावाची कांजीवरम साडी, राजस्थानातली बांधणी, कोलकात्याची कलकत्ता कॉटन आणि सिल्क साडी, बिहारची टसर सिल्क साडी, ओडिशातली संबळपुरी सिल्क साडी, बनारसचा बनारसी शालू अशी अनेक उदाहरणं सांगता येतील.
अस्सल भारतीय साडय़ांच्या परंपरेतली आणखी एक साडी म्हणजे आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली साडी. या साडीचा उगम झाला पोचमपल्ली या गावात. नालगोंडा जिल्ह्य़ातील हे गाव हैदराबादपासून सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. मुख्यत: रेशीम आणि कॉटनमध्ये तयार केल्या जाणाऱ्या पोचमपल्ली साडय़ा त्यांच्या विशिष्ट पॅटर्नमुळे प्रसिद्ध आहेत. या साडय़ांच्या दोन्ही बाजूंना सारखंच डिझाइन असतं. पोचमपल्ली साडय़ांच्या विशिष्ट प्रकारच्या डिझाइन्सला जिओग्राफिकल इंडिकेशन आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट यांसारख्या कायद्याचं संरक्षण आहे. इथल्या विणकरांनी इक्कतच्या भौगोलिक डिझाइन्सचा वापर मोठय़ा कलात्मकतेने या साडय़ांमध्ये केला आहे. ग्राहक किंवा व्यापारी ज्याप्रमाणे कागदावर डिझाइन काढून देतील त्याप्रमाणे बांधणीचं काम करून इथले कारागीर साडय़ा बनवून देतात.
या साडय़ांसाठी लागणारं पांढरं रेशीम बंगळुरूमधून पोचमपल्लीत येतं. प्रत्येक रंगासाठी रेशीम बांधायचं, रंगवायचं आणि वाळवायचं. त्यानंतर साडी विणायला घ्यायची. रेशीम रंगवून तयार करण्यासाठी तीन-चार आठवडे लागतात आणि मग त्यानंतर आणखी तीन ते चार आठवडे साडी विणण्यासाठी. इतकी मेहनत घेऊन साडी तयार झाल्यावर तिची स्पर्धा असते ती यंत्रमागावर तयार झालेल्या तशाच प्रकारच्या दिसणाऱ्या िपट्रेड साडय़ांशी. या साडय़ांचं उत्पादन वेगाने होत असल्यामुळे त्यांच्या किमतीही तुलनेने कमी असतात. यंत्रमागावर केल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या प्रचंड वेगापुढे आपला टिकाव लागणं शक्य नाही, हे पाहून पोचमपल्लीच्या कारागिरांनी आपला परंपरागत विणकामाचा उद्योग सोडून उपजीविकेचे दुसरे मार्ग शोधायला सुरुवात केली आहे. पूर्वी पोचमपल्लीमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त हातमाग होते आणि दोन-अडीच हजार कारागीर साडय़ा विणत असत. आता गावात केवळ तीन-चारशे हातमाग आहेत. इथल्या विणकरांची परिस्थिती इतकी हलाखीची झाली होती की, काही वर्षांपूर्वी हे गाव विणकरांच्या आत्महत्यांमुळे चच्रेत होतं. अवघ्या एक-दीड वर्षांत ३० पेक्षा अधिक विणकरांनी परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
अशा निराशात्मक स्थितीतही चीन्ताकिंडी मल्लेशाम हा युवा विणकर नाउमेद झाला नाही. लक्ष्मीनारान आणि लक्ष्मी या गरीब विणकर दाम्पत्याचा हा एकुलता एक मुलगा. वयाच्या दहाव्या वर्षांपासून मल्लेशाम विणकाम करायला लागला. दिवसभर आई-वडिलांच्या हाताखाली विणकाम करायचं आणि मग रात्रशाळेत जाऊन शिकायचं हा मल्लेशामचा दिनक्रम. इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण सुरळीत झालं, पण पुढे मात्र घरच्या बिकट आíथक परिस्थितीमुळे मल्लेशामला शिक्षण सोडावं लागलं. मुळात मल्लेशामला शिक्षणाची आवड होती. त्यामुळे मिळेल त्याचं मार्गदर्शन घेऊन दहावी तरी व्हायचंच, हे त्याने मनोमन ठरवलं होतं. त्याप्रमाणे तो दहावी झाला; पण त्यासाठी त्याला तीन वेळा प्रयत्न करावे लागले. दहावी झाल्यावर मात्र मल्लेशामच्या औपचारिक शिक्षणाला पूर्णविराम मिळाला.
मल्लेशामच्या कुटुंबाचा व्यवसाय पोचमपल्ली साडी विणण्याचा. त्यांच्या अनेक पिढय़ांनी ही परंपरा जपली होती. पोचमपल्ली साडी विणायला सुरुवात करण्यापूर्वी रेशीम बांधायला लागतं; म्हणजेच रेशमाच्या धाग्यांच्या लडी तयार करायला लागतात. याला स्थानिक भाषेत ‘आसू’ म्हणतात. हाताने केली जाणारी ही आसू प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि कष्टाची असते. रेशीम बांधण्यासाठी आपला हात एक मीटरच्या अंतरात लंबगोलाकार मार्गाने सतत फिरवावा लागतो. एक साडी तयार करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आसू प्रक्रियेत तब्बल नऊ हजार वेळा हात पुढे-मागे करावा लागतो. सर्वसाधारणपणे महिला विणकर ही प्रक्रिया करतात. साहजिकच मल्लेशामची आई, लक्ष्मी ही प्रक्रिया करायची. एका दिवसात लक्ष्मी दोन साडय़ांसाठी पुरेसं होईल इतक्या रेशमावर आसू प्रक्रिया करत. पण त्यासाठी त्यांना १८ हजार वेळा हाताची पुढे-मागे हालचाल करावी लागत असे. साहजिकच, त्यांच्या शरीरावर याचा विपरीत परिणाम व्हायला लागला. हाताचे, खांद्याचे सांधे, स्नायू दुखायला लागले. सतत एका जागी बसून पाठदुखी जडली. हळूहळू हे दुखणं इतकं वाढलं की, आता काम थांबवावं असा विचार लक्ष्मी यांच्या मनात येऊ लागला.
आपल्या आईप्रमाणेच इतरही महिला विणकरांना हा त्रास होत असणार, हे मल्लेशामने ओळखलं आणि आसू प्रक्रिया करण्यासाठी एखादं यंत्रं तयार करण्याचं त्यानं ठरवलं. त्या वेळी त्याचं वय होतं अवघं २० वर्षांचं. मल्लेशामला कोणतंही तांत्रिक ज्ञान नव्हतं. पण इच्छाशक्ती प्रबळ होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने प्रयोग करून बघण्याची तयारी होती. मुख्य अडचण होती ती पशांची! पण प्रचंड मेहनत करून काम करायचं, पसे मिळवायचे आणि त्यातले बरेचसे पसे वाचवून ते आपल्या प्रयोगांवर खर्च करायचे ही मल्लेशामची जणू जीवनशैली बनली. वयाच्या चोविसाव्या वर्षी मल्लेशामचं लग्न झालं. त्याची पत्नी स्वरना त्याच्या कामात मदत करू लागली. तिच्याजवळ असलेली सगळी पुंजी तिने मल्लेशामच्या स्वाधीन केली. या पशाच्या बळावर मल्लेशामने आसू मशीनच्या प्रस्तावित पाच प्रमुख भागांपकी तीन भाग तयार केले. पण पुढे पशाअभावी काम ठप्प झालं. पाच र्वष काम चाललं होतं, हातात पसे नव्हते आणि एवढं करून आसू मशीनही तयार झालं नव्हतं. अशा परिस्थितीत नातेवाईक, आजूबाजूचे लोक मल्लेशामला हे ‘वेड’ सोडून देण्याचा सल्ला द्यायला लागले. जेव्हा घरातले लोकही मल्लेशामला आसू मशीनवरून दूषणं द्यायला लागले तेव्हा मल्लेशाम घर सोडून हैदराबादला आला. तिथे एका इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरकडे रोजंदारीवर तो काम करायला लागला; मिळालेल्या रकमेचा काही भाग गावाला कुटुंबीयांना पाठवायला लागला. त्यानंतर वर्षभराने त्याला वेगवेगळी मशीन्स विकणाऱ्या एका दुकानात नोकरी मिळाली. तिथल्या यंत्रांचं निरीक्षण मल्लेशामच्या कामी आलं. हळूहळू आसू मशीन आकाराला आलं. १०-१२ वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर पाहिलं आसू मशीन तयार झालं. आपल्या आईच्या नावावरून मल्लेशामने या यंत्राला ‘लक्ष्मी आसू मशीन’ असं नाव दिलं. मल्लेशामने हळूहळू या यंत्रात सुधारणा घडवून आणल्या. या यंत्राच्या वेगवेगळ्या सुधारित आवृत्त्या तयार केल्या. जे काम करायला चार-पाच तास लागत होते, ते काम आता तासाभरात आणि अत्यंत कमी कष्टात होऊ लागलं. विणकरांना वरदान ठरणारं यंत्र तयार केल्याबद्दल ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’ या संस्थेने मल्लेशामला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केलं; या यंत्राचं एकस्व मिळवून देण्यासाठी मदत केली. विणकरांचं काम सोपं व्हावं, त्यांनी आपला परंपरागत व्यवसाय सोडून देऊ नये यासाठी मल्लेशाम यांनी लक्ष्मी आसू मशीन्सचं उत्पादन सुरू केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी सुमारे पाचशे यंत्रांची त्यांनी विक्री केली आहे.
हातमाग हे केवळ विणकामाचं साधनच नव्हे तर आपल्या देशाच्या समृद्ध संस्कृतीचं जणू प्रतीक आहे. सातत्याने १५ र्वष संशोधन करून मल्लेशाम यांनी आपली ही संस्कृती जपण्याचं अमूल्य काम केलं आहे. म्हणूनच जगातल्या उत्तम सात ग्रामीण संशोधकांच्या फोर्ब्स यादीत मल्लेशाम यांचा समावेश करण्यात आला आहे.                                                                                   
hemantlagvankar@gmail.com