|| योगेश बोराटे

संस्थेची ओळख केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा असणाऱ्या पाँडिचेरी विद्यापीठाची स्थापना १९८५ साली झाली. विद्यापीठाच्या स्थापनेवेळी स्थानिक शासनाने समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागामध्ये उपलब्ध करून दिलेल्या जवळपास आठशे एकरांच्या परिसरामध्ये आता या विद्यापीठाचा विस्तार झाला आहे. या विस्तीर्ण शैक्षणिक संकुलामधून विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज चालते. यंदाच्या ‘एनआयआरएफ’च्या मानांकनामध्ये या विद्यापीठाने पंजाबमधील गुरुनानक देव विद्यापीठाच्या बरोबरीने देशात ५९वा क्रमांक पटकावला आहे.

पुद्दुचेरीमधील मुख्य संकुलाच्या जोडीने विद्यापीठाने कराइकल आणि पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आपली पदव्युत्तर शैक्षणिक केंद्रे सुरू केलेली आहेत. एकाच वेळी सहा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील अशा सुविधा या विद्यापीठाने उभारल्या आहेत. पेटंट फॅसिलिटेशन सेल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट सेल, कम्युनिटी कॉलेज, कम्युनिटी रेडिओ सेंटर अशा सुविधांच्या आधाराने हे विद्यापीठ समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिकांच्या गरजा पूर्ण करत आहे. त्याचबरोबर त्यांना आपल्याशी जोडून घेण्यासाठी व्यापक प्रयत्नही करत आहे. स्वत:चे असे कम्युनिटी कॉलेज सुरू करणारे देशातील पहिले विद्यापीठ म्हणूनही हे विद्यापीठ विचारात घेतले जाते.

विभाग आणि अभ्यासक्रम

पाँडिचेरी विद्यापीठामध्ये शैक्षणिक विभाग हे वेगवेगळ्या १५ स्कूल्सच्या माध्यमातून विभागलेले आहेत. या स्कूल्सच्या अंतर्गत एकूण ५१ पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आणि संशोधन पातळीवरील दीडशेहून अधिक अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय विद्यापीठाने सायंकाळच्या सत्रात चालणारे १५ अ‍ॅड-ऑन अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठातर्फे देशभरातील विविध शहरांमध्ये प्रवेश परीक्षेचे आयोजनही केले जाते. विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ लॉ, सुब्रमनिया भारती स्कूल ऑफ तमिळ लँग्वेज अँड लिटरेचर, स्कूल ऑफ एज्युकेशन, स्कूल ऑफ मॅनेजमेंट, रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस, स्कूल ऑफ इंजिनीअिरग अँड टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ फिजिकल, केमिकल अँड अ‍ॅप्लाइड सायन्सेस, स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज, स्कूल ऑफ परफॉìमग आर्ट्स, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस अँड इंटरनॅशनल स्टडीज, स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, मदनजीत स्कूल ऑफ ग्रीन एनर्जी टेक्नॉलॉजीज, स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस या स्कूल्स आहेत. विद्यापीठाच्या फ्रेंच विभागामध्ये एम. ए. फ्रेंच हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. माध्यमांच्या क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने एम. ए. मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाच्या जोडीने एम.एस.सी. इलेक्ट्रॉनिक मीडिया हा अभ्यासक्रमही उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय विद्यापीठामध्ये एम. एस्सी. क्वांटिटेटिव्ह फायनान्स, एम. टेक. कॉम्प्युटेशनल बायोलॉजी, एम. टेक. एक्स्प्लोरेशन जिओसायन्स हे तुलनेने वेगळे अभ्यासक्रही चालविले जातात. विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षे कालावधीचे एकत्रित असे इंटिग्रेटेड एम. ए. आणि एम. एस्सी अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. त्यामध्ये अप्लाइड जिओलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथेमेटिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि स्टॅटेस्टिक्स या विषयांमधील पाच वर्षे कालावधीचे इंटिग्रेटेड एम. एस्सी. अभ्यासक्रम, तर हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्सेस, सोशिओलॉजी विषयातील एम. ए. अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या कराइकल येथील केंद्रात तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम, तर पोर्ट ब्लेअर येथील केंद्रात दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम व दोन पीएच. डी. अभ्यासक्रम चालवले जातात. त्यामध्ये एम. एस्सी. डिझास्टर मॅनेजमेंट, एम. एस्सी. मरीन बायोलॉजी या नेहमीच्या अभ्यासक्रमांच्या तुलनेमध्ये वेगळ्या असणाऱ्या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे.

सुविधा

सध्या विद्यापीठाच्या संकुलात २२ वसतिगृहे असून यातील १३ वसतिगृहे मुलांसाठी, ८ मुलींसाठी तर एक परदेशी विद्यार्थ्यांसाठी आहे. या सर्व वसतिगृहांत मिळून सुमारे दीड हजार विद्यार्थी निवासी सुविधेचा लाभ घेत आहेत. विद्यापीठाने विशेष विद्यार्थासाठीही निवास व भोजन सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. पोर्ट ब्लेअर व कराइकल येथील संकुलात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. विद्यापीठाचे ‘आनंदा रंगापिल्लाई ग्रंथालय’ हे एक अत्याधुनिक ग्रंथालय ठरते. अपंग विद्यार्थ्यांच्या सोयीचाही या ग्रंथालयाच्या निर्मितीदरम्यान विचार करण्यात आला आहे. हे ग्रंथालय म्हणजे पूर्णपणे वातानुकूलित, वाय-फाय सुविधा असलेले, दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान असेलली सुविधा उपलब्ध करून देणारी अशी वास्तू आहे. विशेष म्हणजे ग्रंथालयातील जवळपास ५ लाख पुस्तके कायम रिमोट अ‍ॅक्सेसवरदेखील उपलब्ध आहेत. परदेशी विद्यार्थाच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने २००० सालापासून ‘स्टडी इंडिया प्रोग्रॅम’ सुरू केला आहे. या माध्यमातून विद्यार्थी सेमिस्टर किंवा शॉर्ट टर्म अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतात. ‘स्पेशल कोर्स’मधून स्पोकन तमिळ, क्लासिकल इंडियन फिलॉसॉफी, हिंदूझम अँड इट्स प्रॅक्टिसेस, प्रॅक्टिकल क्लासिकल योगा ट्रेनिंग, आयडिया ऑफ इंडियन फिलॉसॉफी अशा विषयांमध्ये ३ क्रेडिटचे कोर्स करता येणे शक्य झाले आहे.

borateys@gmail.com