असाध्य ते साध्य
करिता सायास
कारण अभ्यास
तुका म्हणे!
मनापासून समजून-उमजून
सातत्यानं केली जाणारी उजळणी
म्हणजे अभ्यास..
जिज्ञासा आणि निरीक्षणातून
प्रश्न विचारत घडणारा संवाद
म्हणजे अभ्यास..
शिस्त आणि नियोजनातून
मनाला सवय लावणारा संस्कार
म्हणजे अभ्यास..
विचार आणि कृतीतून
चुकत शिकत होणारे प्रयत्न
म्हणजे अभ्यास..
ध्यास आणि अनुभवातून
व्यक्तित्वाला घडविणारा प्रवास
म्हणजे अभ्यास..
श्रवण आणि संभाषणातून
वाचन-लेखनामुळे होणारा सराव
म्हणजे अभ्यास..
बुद्धी आणि हृदयापासून
हातांतून आविष्कृत होणारी सर्जकता
म्हणजे अभ्यास..
का? कसं? कधी? कुणी? कोठून?
किती? तरी प्रश्नांची ‘उत्तर’क्रिया
म्हणजे अभ्यास..
अभ्यास मनापासून हवा.
अभ्यास आवडीनं हवा.
अभ्यास स्वत:हून हवा.
अभ्यास आयुष्यभरासाठी हवा.
अभ्यास माणूसपणासाठी हवा.
 प्रा. विजय जामसंडेकर