19 February 2020

News Flash

‘प्रयोग’ शाळा : गोष्टीवेल्हाळ

ऑगस्ट १९९८ मध्ये कृतिका बुरघाटे साहाय्यक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लक्कडकोट या शाळेत रुजू झाल्या.

(संग्रहित छायाचित्र)

स्वाती केतकर- पंडित

गोष्ट आवडत नसलेले मूल शोधणे अवघडच. पण गोष्ट लिहिणारी मुले घडवणे त्याहून अवघड. कृतिका बुरघाटे ही शिक्षिका नेमका हाच प्रयत्न करते आहे.

ऑगस्ट १९९८ मध्ये कृतिका बुरघाटे साहाय्यक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लक्कडकोट या शाळेत रुजू झाल्या. हे गाव महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या सीमा भागातील शाळा आहे. डोंगर-पहाडांनी वेढलेल्या या छोटय़ाशा खेडय़ातली शाळा मात्र अगदी छान होती. इथला शिक्षकवर्गही प्रयोगशील होता. यामुळे कृतिकांच्या मुळातील प्रयोगशील स्वभावाला वाव मिळाला. सुरुवातीला कृतिकाकडे पहिली-दुसरीचे वर्ग होते. या लहानग्यांना अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी मातीमध्ये चित्र, अक्षरे रंगवणे. टेपरेकॉर्डरवर बालगीते लावून त्यावर विद्यार्थ्यांना मनसोक्त नाचू देणे. वर्ग सजवणे यासारख्या गोष्टी कृतिका आवर्जून करत असत. यातून दोन गोष्टी होत होत्या. गाण्यांतून नवे शब्द मुलांना भेटत होते तर मातीतल्या अभ्यासामुळे त्याची गोडी आणि गंमत वाटू लागली होती. कृतिका म्हणतात, ‘‘नाचण्याचा तास मुलांना भलता आवडायचा. त्यांच्यातला बुजरेपणा भीती या तासाने अगदी घालवून टाकली.’’ या विद्यार्थ्यांसोबत कृतिका यांनी लेखन वाचनाचेही काही प्रयोग केले. याचे कारण सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘या मुलांना अक्षरओळख होत होती. वाचन-लेखनाची सुरुवात होती पण हे सगळे का करायचे, याची जाणीव त्यांना नव्हती. ती वाचनातून, पुस्तकांतून करून देण्याचा प्रयत्न मी केला. दररोज काही तरी वाचणे आणि त्याबद्दल दोन शब्द, दोन वाक्ये किमान सांगणे हा उपक्रम घेतला. या साध्याशा उपक्रमाने अनेक विद्यार्थ्यांना बोलते केले. लिहायचे का, वाचायचे कशासाठी या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली. या शाळेत तेलगू, गोंडी, पारधी आणि मराठी असे बहुभाषिक विद्यार्थी होते. त्यांनाही आपापल्या भाषेतून प्रमाणभाषेत जाण्याचा सहजी मार्ग या उपक्रमाने दिला.’’ बहुभाषिक विद्यार्थ्यांबद्दल कृतिका म्हणतात, ‘‘या विद्यार्थ्यांना बोलता छान यायचे पण प्रमाणभाषेत लिहिताना मात्र थोडी गल्लत होई. पण आम्ही मुद्दामच त्यांच्या सर्व चुका दाखवल्या नाहीत. मग त्यांचा त्यांनाच आत्मविश्वास वाटू लागला. गोडी वाटू लागली आणि प्रमाणभाषेची भीतीही गेली.’’

दहा वर्षांनंतर म्हणजे २००८ मध्ये कृतिका यांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. देवाडा केंद्रातील पं.स. राजुरा इथल्या जिल्हा परिषद शाळा सोंडो इथे त्यांची बदली झाली. इथे कृतिका समाजशास्त्र हा विषय शिकवत होत्या. तो शिकवताना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांसोबतच त्यांनी भाषेवरही काही उपक्रम घेतले. कारण भूगोलातले, इतिहासातले अनेक कठीण शब्द वाचताना मुले अडखळत. भाषेवर काम केल्याने समाजशास्त्रही सोपे झाले. भूगोलाचा अभ्यास करताना शाळेजवळच्या परिसरात फेरफटका, क्षेत्रभेटी देणे, इतिहासाचा अभ्यास करताना शिवाजी महाराजांवरील सिनेमे पाहणे, कलाकृती वाचणे यासारख्या गोष्टींचा उपयोग करत कृतिका यांनी हा विषय अधिकाधिक विद्यार्थीप्रिय बनवला. या सगळ्या उपक्रमांतही सोंडो शाळेतील इतर शिक्षकांची खूप मदत झाल्याचे कृतिका आवर्जून सांगतात.

यानंतर कृतिकांची बदली झाली, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोवरी, केंद्र साखरी, प. स. राजुरा येथे. याच शाळेत त्यांचा गोष्टींचा उपक्रम सुरू झाला. या शाळेमध्ये कृतिका यांनी वाचन, लेखन, संवाद यावर read to express  हा उपक्रम घेतला. कृतिकाकडे पाचवीचा वर्ग होता. या विद्यार्थ्यांसोबत read to express उपक्रम राबवताना कृतिकांनी अनेक उपक्रम घेतले. त्यांच्याकडे पाचवीचा वर्ग होता. या वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत उपक्रम घेताना मुक्त गप्पा, विषय निवड, अनुभव लेखन या त्रिसूत्रीच्या आधारे मुलांनी २०१४-१५मध्ये ‘अर्णव’ नावाचे एक पुस्तक तयार केले. पण या प्रमाणभाषेच्या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांच्या मूळ भाषेतली गंमत हरवते आहे, असे कृतिकांना वाटले. मग पुढच्या वर्षी ‘अर्णव भाग २’ सजला तो बोलीभाषेतील कलाकृतीनी. हा नवा ‘अर्णव’ वाचताना मुलांना फार मजा येत होती. असे बोलीभाषेतले लेख त्यांनी कधी कुठे वाचले नव्हते. ‘‘आव माय हे मीन लिवल!!’’ असे आश्चर्यकारक उद्गार मुले काढत. ‘‘आमी अशे बोलतो का?’’ असे ते विचारत.

कृतिका कायमच विद्यार्थ्यांना घेऊन क्षेत्रभेटी घेत असे. वर्गाबाहेर गेल्यावर विद्यार्थी एकदम मोकळे होत, भरपूर बडबड करत. घरच्या, गावच्या, दोस्तांच्या गप्पा सांगत. गमतीजमती सांगत. हे अनुभव लिहून ठेवले तर काय मजा येईल, असे कृतिकांना वाटले आणि त्यातूनच गोष्टींच्या उपक्रमाची सुरुवात झाली. मुले सुरुवातीला आपले आपण अनुभव लिहून ठेवत असत. पण काहीजण लेखनात कच्चे होते, पण त्यांच्याकडे अनुभव पक्के असत. यावर मुलांनीच उपाय शोधला. ते चांगले लिहिणाऱ्या आपल्यातल्याच एकाला लेखक म्हणून नेमायचे. मग लेखक सांगितलेली कथा जशीच्या तशी लिहून द्यायचा. ती वाचल्यानंतर मुलांना लक्षात यायचे, यात काय हवे, काय नको.. तसेच कधी तरी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा आल्यावर वर्गात गुंगवून ठेवण्यासाठी कृतिका त्यांच्याकडून अनुभव घेऊन त्याची फळ्यावर गोष्ट लिहू लागल्या. फळ्यावरच्या गोष्टी लेखनात मुलांना खूपच मजा येऊ लागली. याचसोबत लिखाणाची पद्धत, विरामचिन्हे, परिच्छेद यांचे शिक्षण आपसूकच झाले. यातूनच त्यांचा गोष्टींचा प्रकल्प साकारला. ‘अर्णव’च्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी अनेक लेखनप्रकार हाताळले. आणि हळूहळू जे मनात येते, जसे येते, त्या क्रमाने तरीही ओघवते लिहिण्यात विद्यार्थी पारंगत होऊ लागले. मुलांच्या मनातल्या या खुसखुशीत गोष्टींचे कृतिकानी एक छानसे पुस्तक केले. आता काही संकेतस्थळांवरही या गोष्टी प्रसिद्ध होत आहेत.

सध्या कृतिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मसाळा (तुकुम) येथे विषय शिक्षिका आहेत. परंतु गेली ३ वर्षे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, चंद्रपूर येथे प्रतिनियुक्तीने विषय साहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. अर्थात या पदावर काम करतानाही विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचा त्यांचा उत्साह दांडगा आहे.

First Published on July 12, 2019 1:33 am

Web Title: prayogshala article by swati pandit abn 97
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर
2 यूपीएससीची तयारी : भारतीय स्वातंत्र्यसमर
3 एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षेच्या काळातील व्यवस्थापन
Just Now!
X