केंद्र सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे देशस्तरावर सीमॅट परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेमार्फत विद्यार्थ्यांना देशभरातील साडेतीन हजारांहून अधिक व्यवस्थापन शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येतो. सीमॅट परीक्षेतील चार विषयांपैकी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या दोन विषयांची तयारी कशी करावी, याची सविस्तर माहिती करून घेऊयात..

या लेखमालेतील पहिल्या लेखात आपण सीमॅट परीक्षेचे स्वरूप पाहिले. सीमॅटच्या अभ्यासाची पूर्वतयारी कशी करावी याचाही आढावा आपण घेतला. सीमॅटमध्ये लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन (इंग्रजी), क्वान्टिटेटिव्ह टेक्निक्स अॅण्ड डाटा इंटरप्रिटेशन (गणित), लॉजिकल रिझनिंग (बुद्धिमापन चाचणी) व जनरल अवेअरनेस (सामान्य ज्ञान) असे चार विषय असतात. त्यात प्रत्येकी २५ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात व त्यास एकूण १०० गुण असतात. यातील इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयांचे अभ्यासक्रम व त्याची तयारी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन (इंग्रजी)
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात देशांमधील सीमारेषा पुसट झाल्या आहेत व उद्योगाच्या कक्षा देशाबाहेर रुंदावत आहेत. अशा स्पर्धात्मक वातावरणात प्रभावी संवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि इंग्रजी ही जगाच्या संवादाची भाषा मानली जाते. देशांतर्गत व जागतिक व्यवहार इंग्रजीतूनच चालतात. त्यामुळे इंग्रजीचे आकलन व ज्ञान ही काळाची गरज आहे. म्हणून विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे आकलन व भाषेची समज यांचे मूल्यांकन करण्यासाठी लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन हा विषय सीमॅटच्या परीक्षेत अंतर्भूत केला आहे.
व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना इत्यादी कोणत्याही भाषेची मूलभूत अंगे आहेत. सीमॅट परीक्षेच्या इंग्रजी विभागात या सर्व बाबींची चाचणी होते. इंग्रजी भाषेच्या अभ्यासक्रमात साधारणत: पुढील घटकांचा समावेश होतो-
० उताऱ्यावरील प्रश्न
० इंग्रजी व्याकरण
० वाक्यातील चुकांची दुरुस्ती करणे
० परिच्छेदातील गाळलेले शब्द भरणे
० दिलेल्या शब्दसमूहाकरिता एक शब्द ओळखणे
० म्हणी व वाक्प्रचार
० परिच्छेदातील वाक्यांचा योग्य क्रम लावणे
० तर्कसंगती
० समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
इंग्रजी भाषेचे आकलन सुकर व्हावे याकरिता विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करणे आवशक आहे. आवडते पुस्तक, कादंबरी, प्रसिद्ध व्यक्तींचे चरित्र, इत्यादी विविधांगी पुस्तकांचे वाचन केल्यास उपयुक्त ठरते. काही वेळा असे निदर्शनास आले आहे कीस्पर्धा परीक्षांमधील उतारे उद्योगविषयक असतात. त्यामुळे त्या विषयांतील एखादे नियतकालिक वाचल्यास इंग्रजी सुधारते, विषयाची समज वाढते व तांत्रिक संज्ञांची सवयही होते. वाचन करताना केवळ रसग्रहण न करता विद्यार्थ्यांनी विश्लेषणात्मक व तुलनात्मक दृष्टिकोन ठेवावा. लेखाचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करावा. यामुळे उताऱ्यावरील प्रश्न व परिच्छेदातील वाक्यांचा योग्य क्रम लावणे असे प्रश्न सोडवणे सुलभ होते.
वाचनाबरोबरच इंग्रजीच्या व्याकरणाचे ज्ञानसुद्धा महत्त्वाचे आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी इंग्रजी व्याकरणाचे नियम, त्यातील विविध अव्यये, वाक्यरचना, त्यातील उपवाक्यांचा उपयोग, विशेषणे, इत्यादीचा सखोल अभ्यास करणे अपेक्षित आहे. या अभ्यासाचा उपयोग परिच्छेदातील गाळलेले शब्द भरणे, वाक्यातील चुका सुधारणे अशा प्रश्नांसाठी होतो. आजकाल बाजारात क्यू कार्डस् उपलब्ध आहेत. त्याच्या नियमित सरावाने विद्यार्थ्यांचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढतो. म्हणी व वाक्प्रचार, शब्दसमूहासाठी एक शब्द, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द असे प्रश्न सोडविण्यासाठी शब्दसंग्रहच उपयुक्त ठरतो.
क्रिटिकल रिझनिंग (तर्कसंगती) या प्रश्नप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेवरील पकड, विश्लेषणात्मक विचारक्षमता व तर्कशक्ती यांचा कस लागतो. प्रस्तुत विधानातील ‘गृहीतक’ ओळखणे, विधानावरून अनुमान लावणे, विधानावरून निष्कर्ष काढणे अशा स्वरूपाचे प्रश्न अपेक्षित असतात. विद्यार्थ्यांनी दिलेले विधान नीट वाचून त्याचा योग्य अर्थ समजून घेणे, त्यातील किचकट शब्दांचा समर्पक अर्थ लावणे, विधानातील अन्वये ओळखून त्यांचा अर्थ लावणे व अंतिमत: विधानाचे सखोल बारकाईने विश्लेषण करणे अपेक्षित असते. याकरिता विद्यार्थ्यांनी अशा प्रश्नांचा सराव, इंग्रजी भाषेवरील पकड मजबूत करणे आणि विश्लेषणात्मक विचार करण्याची सवय स्वत:ला जाणीवपूर्वक लावून घेणे आवश्यक आहे.

सामान्य ज्ञान
विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या उअळ, उएळ या परीक्षांमध्ये केवळ इंग्रजी, गणित व बुद्धिमापन चाचणी या विषयांवर आधारित प्रश्न असतात. मात्र उटअळ परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानावर विचारले जाणारे प्रश्न या परीक्षेचे वेगळेपण अधोरेखित करतात. एमबीए झालेले विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये महत्त्वाची अधिकाराची पदे भूषवितात. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम थेट कंपनीच्या कारभारावर व पर्यायाने भवितव्यावर होणार असतो. याकरिता अशा अधिकाऱ्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच अवांतर ज्ञान व भवताली सुरू असणाऱ्या घडामोडींची माहिती असणे अनिवार्य असते. म्हणून या २५ प्रश्नांमार्फत विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन व भवतालच्या जगाविषयीचे आकलन तापासले जाते.
सामान्य ज्ञान हा विषय परीक्षेतील इतर विषयांपेक्षा वेगळा आहे, कारण इतर विषयांच्या तयारीला लागणाऱ्या कालावधीपेक्षा सामान्य ज्ञान सुधारण्यास अधिक कालावधी लागतो. काही दिवसांच्या अभ्यासात सामान्य ज्ञानाची तयारी होणे, शक्य नाही. अनेकदा विद्यार्थी इंग्रजी व गणितावर जास्त भर देतात. वृत्तपत्रे वाचून सामान्य ज्ञानावरील प्रश्नांची आपण सहज उत्तरे देऊ शकतो असा त्यांचा समज असतो. पण विद्यार्थ्यांनी हे ध्यानात ठेवायला हवे की, सीमॅटच्या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयांत किमान गुण मिळविण्याची अट आहे. त्यामुळे कोणत्याही एका विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतर तीन विषयांत चांगले गुण मिळवूनदेखील केवळ सामान्य ज्ञानामुळे काही विद्यार्थी मागे पडताना दिसतात. त्यामुळे हा धोका ओळखून विद्यार्थ्यांनी या विषयाला योग्य महत्त्व द्यायला हवे आणि त्याचाही नियोजनबद्ध अभ्यास करायला हवा.
सामान्य ज्ञान विषयाचे प्रश्न मुख्यत: दोन प्रकारांत विभागलेले असतात. काही प्रश्न स्थिर स्वरूपाच्या माहितीवर आधारित, तर काही प्रश्न चालू घडामोडींवर आधारित असतात. सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांमध्ये साधारणत: पुढील घटकांचा समावेश होतो-
० स्टॅटिक जनरल नॉलेज (स्थिर स्वरूपाची माहिती)
० इतिहास
० भूगोल
०अर्थशास्त्र
० विज्ञान
० भारतीय संविधान
० क्रीडा
० संस्कृती
० साहित्य
० चालू घडामोडी
० राजकारण
० उद्योगविषयक घडामोडी
० अर्थव्यवस्था व आíथक धोरण
० आंतरराष्ट्रीय घडामोडी
० सरकारी योजना
० क्रीडाविषयक घटना
० चच्रेतील व्यक्तींविषयी माहिती
या विभागातील प्रश्नांची काठिण्यपातळी अनेकदा भिन्न असते. विद्यार्थ्यांनी सर्वच्या सर्व २५ प्रश्न सोडवणे अपेक्षित नसते. काही प्रश्न अत्यंत सोपे तर काही प्रश्न थोडे कठीण असतात. ऋण गुणांकन असल्याने विद्यार्थ्यांनी प्रश्न काळजीपूर्वक निवडावेत आणि निवडलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावीत. या विभागातील काही प्रश्न तर शालेय अभ्यासक्रमात शिकविलेल्या काही बाबींवर आधारित असतात. त्यामुळे शालेय पाठय़पुस्तकांतील इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांची उजळणी अत्यंत उपयुक्त ठरते.
चालू घडामोडींवरील प्रश्न आव्हानात्मक असतात. हे आव्हान पेलण्यासाठी वृत्तपत्रे, चांगल्या दर्जाची नियतकालिके आदींचे नियमित वाचन आवश्यक असते. हे युग माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे आपल्याला इंटरनेटच्या साहाय्याने संगणकावर एका क्लिकवर आवश्यक ती माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रे वाचनाला इंटरनेटची जोड दिल्यास सामान्य ज्ञानाचा अभ्यास सुलभ व रंजक होऊ शकतो.
सीमॅट परीक्षेतील चार विषयांपकी इंग्रजी व सामान्य ज्ञान या दोन विषयांची आपण सविस्तर माहिती घेतली. लेखमालेतील पुढील लेखात आपण गणित व बुद्धिमापन चाचणी या विषयांची माहिती घेऊ.
डॉ. वरदराज बापट
(सीए, पीएच.डी.)
प्राध्यापक, आयआयटी, मुंबई.
varadrajb@gmail.com

अजिंक्य नवरे
(एमबीए), पीएच.डी. रिसर्च स्कॉलर,
आय आय टी, मुंबई.
ajinkya.navare@gmail.com