सहयोगी अधिष्ठाता, इंडसर्च, पुणे
एम.बी.ए. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उज्ज्वल भवितव्याची संधी प्रत्येकाला मिळेलच. मात्र, यासाठी शॉर्टकट्स टाळलेच पाहिजेत. एम.बी.ए.च्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने शिक्षण – प्रशिक्षणादरम्यान उपलब्ध होणाऱ्या संधींचा पुरेपूर उपयोग करायला हवा.
प्रो जेक्ट रिपोर्टचा मुख्य भाग- ज्याला रिपोर्टचा गाभा म्हणता येईल, तो म्हणजे जमा केलेल्या माहितीचे केलेले विश्लेषण. जमा केलेली माहिती ही प्रोजेक्टच्या उद्देशाशी संबंधित आणि सुसंगत असायला हवी. माहिती मिळविण्यासाठी प्रश्नावली तयार करून माहिती मिळवणे तसेच कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष बोलून माहिती मिळवणे, वेगवेगळे दस्तऐवज, वार्षिक अहवाल या अनेक मार्गाचा अवलंब करावा लागतो. यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की, प्रश्नावली तयार करताना विशेष काळजी घ्यायला हवी. यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची संख्या अधिक जास्त असल्यास उत्तरे मिळविताना अडचणी येतात. तसेच शक्यतोवर प्रश्नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपाचे ठेवल्यास उत्तरे देणाऱ्याला सोपे जाते. अर्थात काही प्रश्न हे वर्णनात्मक ठेवावे लागतात. मात्र अशा प्रश्नांची संख्या मर्यादित ठेवणे हे केव्हाही चांगले. प्रश्नावली तयार करताना लक्षात ठेवले पाहिजे की, त्यामधून जमा होणारी माहिती ही प्रोजेक्ट रिपोर्टच्या उद्देशाशी सुसंगत आहे.
जमा केलेल्या माहितीचे विश्लेषण अनेक पद्धतीने करता येते. यासाठी वेगवेगळे पर्याय वापरता येतात. यामध्ये माहितीवरून टेबल तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे आलेख तयार करणे, तसेच संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर करणे या अनेक पद्धतींचा वापर कता येतो. उदा. मालाच्या साठय़ाचे व्यवस्थापन (Inventory Management)
हा जर प्रोजेक्ट रिपोर्टचा विषय असेल तर जमा केलेल्या माहितीवरून गेल्या तीन ते पाच वर्षांमध्ये वस्तूच्या साठय़ामध्ये कसा बदल होत गेला,
वस्तूच्या साठय़ावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला गेला, साठय़ाशी संबंधित
असे वेगवेगळे रेशो (Ratios) कसे बदलत
गेले, खेळते भांडवल किती प्रमाणात अडकून
पडले आणि त्याचा नफ्यावर कसा परिणाम
झाला, या सर्व आणि इतरही संबंधित गोष्टी
म्हणजे कंपनीचे खरेदीविषयक धोरण आणि उत्पादनविषयक धोरण इ. गोष्टी माहितीचे विश्लेषण करून दाखविता येते. इतर कंपन्यांच्या प्रकाशित झालेल्या माहितीवरून तुलनात्मक विश्लेषणही करणे शक्य आहे.
प्रोजेक्ट रिपोर्टचा विषय जर मार्केटिंग मॅनेजमेन्टमधील जाहिरातविषयक असेल तर मिळविलेल्या माहितीचे विश्लेषण विषयाच्या
संदर्भात केले पाहिजे. प्रोजेक्ट रिपोर्टचा उद्देश जर जाहिरातीची परिणामकारकता पाहणे असा असेल
तर त्या दृष्टीने ग्राहकांची केलेली नमुना पाहणी (Sample Survey), जाहिरात एजन्सीकडून मिळविलेली माहिती, कंपनीच्या मार्केटिंग विभागातील अधिकाऱ्याचे मत, कंपनीच्या वस्तूच्या विक्रीचे आकडे इ. मार्गातून मिळविलेल्या माहितीचे
विश्लेषण योग्य पद्धतीने केले पाहिजे. माहितीचे विश्लेषण करण्यासाठी संख्याशास्त्रातील तंत्राचा वापरसुद्धा प्रभावी असतो. यामध्ये सरासरी, टक्केवारी यांसारख्या सर्वाना माहिती असलेल्या पद्धतीपासून को-रिलेशन, रिग्रेशन यांसारख्या अ‍ॅडव्हान्स्ड पद्धतींचा उपयोग करता येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या आलेखांचा वापर केल्यास विश्लेषण अधिक
प्रभावी होते. विश्लेषण करताना कंपनीच्या
दृष्टीने काय फायदा होईल, याचाही विचार करणे आवश्यक आहे.
माहितीचे विश्लेषण केल्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्टचा पुढचा टप्पा म्हणजे विश्लेषणाच्या आधारे निष्कर्ष काढणे. निष्कर्ष काढताना ते विश्लेषणाशी तसेच प्रोजेक्टच्या उद्देशाशी संबंधित आहेत किंवा
नाहीत याचा विचार केला पाहिजे. निष्कर्ष हे केवळ वरवरचे असून उपयोगी नाही. ते भरीव स्वरूपात असायला हवेत. यासाठी प्रोजेक्ट रिपोर्टचा विषय आधी नीट समजून घेणे आवश्यक आहे. विषय समजून न घेता केवळ औपचारिकता म्हणून प्रोजेक्ट रिपोर्ट केला तर कोणालाच फायदा होत नाही. म्हणून विषयाच्या मुळापर्यंत जायला हवे. कित्येक वेळा विद्यार्थ्यांची तक्रार असते की, कंपनीमधील अधिकारी सहकार्य करीत नाहीत आणि त्यामुळे पुरेशी माहिती मिळत नाही. अशा परिस्थितीत स्वत: पुढाकार घेऊन जास्तीतजास्त माहिती कशी मिळेल, हे पाहिले पाहिजे. त्यानंतरही जर माहिती मिळालीच नाही तर कंपनीचे उपलब्ध असणारे आणि प्रसिद्ध झालेले  डॉक्युमेन्ट्स यावरून माहिती घेता येते. अशा पद्धतीने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे काढलेले निष्कर्ष हे अतिशय उपयुक्त ठरतात.
निष्कर्षांनंतर प्रोजेक्टचा पुढचा भाग म्हणजे निष्कर्षांच्या आधारे केलेल्या सूचना. कंपनीला सुचविलेल्या उपाययोजना या पुन्हा विषयाच्या मुळाशी जाऊन केल्या पाहिजे. तसेच त्या व्यवहार्य आहेत किंवा नाही हेही पाहणे आवश्यक आहे. काही कंपन्यांमध्ये अशी पद्धत आहे की, प्रोजेक्ट रिपोर्ट
पूर्ण होण्यापूर्वी तो कंपनीकडून मान्य करून
घेतला पाहिजे. अशा वेळी साहजिकच सूचना करण्यासाठी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे ठरते.
प्रोजेक्ट रिपोर्टच्या शेवटी संदर्भ ग्रंथ किंवा इतर काही संदर्भ उदा. वेबसाइट्स इत्यादींची सूची द्यावी लागते. यामध्ये वापरलेली पुस्तके, लेख किंवा इतर संदर्भ यांची यादी देणे आवश्यक आहे.
वरील मुद्दय़ांवरून असे लक्षात येईल की, एम.बी.ए.च्या वाटचालीमध्ये प्रोजेक्ट रिपोर्टला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. रिपोर्ट योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे केला तर त्याचा उपयोग विद्यार्थी आणि कंपनी या दोघांनाही होतो. तसेच प्रोजेक्ट रिपोर्टवर आधारित परीक्षा देताना प्रोजेक्ट वाचून जाणे आवश्यक आहे. अन्यथा परीक्षा देताना तारांबळ उडते.
सारांश म्हणजे एम.बी.ए. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उज्ज्वल भवितव्याची संधी प्रत्येकाला आहे. मात्र यासाठी शॉर्टकट्स टाळलेच पाहिजेत. एम.बी.ए.च्या दोन वर्षांत मिळणारा प्रत्येक क्षण वापरला तरच संधी उपलब्ध होतात. नुसती एम.बी.ए. पदवी उपयोगी पडणार नाही. एम.बी.ए.च्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने शिक्षण – प्रशिक्षणादरम्यान उपलब्ध होणाऱ्या संधींचा पुरेपूर उपयोग करायला हवा.
शेवटी एम.बी.ए.च्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना खूबप खूप शुभेच्छा.    
(समाप्त)