News Flash

तयारी एमबीएची! : उत्पादन व्यवस्थापन

व्यवस्थापनाच्या मूलभूत तत्त्वांचा उत्पादनविषयक प्रक्रियेत अधिकाधिक उपयोग करून उत्पादनविषयक क्षमता कशी दुणावता येईल, याचा अभ्यास एमबीएच्या या विद्याशाखेत केला जातो.

| November 4, 2013 01:01 am

व्यवस्थापनाच्या मूलभूत तत्त्वांचा उत्पादनविषयक प्रक्रियेत अधिकाधिक उपयोग करून उत्पादनविषयक क्षमता कशी दुणावता येईल, याचा अभ्यास एमबीएच्या या विद्याशाखेत केला जातो. त्याविषयी..
विशेषत: उत्पादन क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असे उत्पादन व्यवस्थापन हे स्पेशलायझेशन एमबीएच्या दुसऱ्या वर्षांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे म्हणजे नियोजन, सुसूत्रीकरण, नियंत्रण, निर्णय घेणे इ. उत्पादन कार्यामध्ये वापरून अधिकाधिक कार्यक्षमतेने उत्पादनप्रक्रिया कशा प्रकारे चालवता येईल यासबंधीचे मार्गदर्शन केले जाते.
कोणतेही क्षेत्र उत्पादन अथवा सेवा, सरकारी किंवा खासगी संस्था तसेच नफा मिळवण्याचा उद्देश नसलेल्या संस्था यामध्ये व्यवस्थापनाची गरज नेहमीच भासते. व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश उपलब्ध साधनसामग्री जास्तीत जास्त प्रमाणात वापरून तिच्याच साहाय्याने उत्पादकता वाढवणे व पर्यायाने उत्पादन खर्च कमी करून, व्यवसायाची स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची क्षमता वाढवणे हा असतो. याच तत्त्वाचा वापर औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्पादन नियंत्रण व नियोजन यासाठी प्रभावीपणे करता येतो. उत्पादन हे पर्याप्त प्रमाणात तसेच सुनियोजित पद्धतीने करणे, उत्पादनामध्ये गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न करणे, वस्तूच्या साठय़ावर (इन्व्हेन्टरी) योग्य नियंत्रण ठेवणे, उत्पादनाचे नियोजन करताना मागणीचा अंदाज करणे इ. अनेक पैलूंचा विचार करणे गरजेचे ठरते. या दृष्टीने या स्पेशलायझेशनमध्ये वेगवेगळय़ा विषयांचा समावेश केलेला असतो.
उत्पादन व्यवस्थापनात सर्वप्रथम अभ्यासावा लागणारा विषय म्हणजे उत्पादनाचे नियंत्रण आणि नियोजन (प्लॅनिंग अ‍ॅण्ड कंट्रोलिंग). प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात करण्याअगोदर योग्य प्रकारचे नियोजन करणे आवश्यक असते. एका वर्षांत किती उत्पादन करायचे हे बव्हंशी मागणीच्या अंदाजावर अवलंबून असते. यासाठी मागणीच्या अंदाजाची (डिमांड फोरकास्टिंग) वेगवेगळी तत्त्वे वापरावी लागतात. याशिवाय उत्पादनाचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळय़ा मशिन्सची रचना (लेआऊट) कसा असावा व कच्च्या मालाचा ओघ (प्रवाह) वेगवेगळय़ा प्रक्रियांमधून कशा पद्धतीने चालू राहावा याचाही विचार केला जातो. मशीन लेआऊट आणि प्रोसेस लेआऊट अशा दोन महत्त्वाच्या विभागांचा या ठिकाणी समावेश होतो. या दोन्ही लेआऊटचा प्रमुख उद्देश म्हणजे उत्पादनाचा प्रवाह विनाअडथळा चालू राहावा हाच आहे. यासाठीच वेगवेगळय़ा प्रकारचे फ्लो चार्टस् तयार केले जातात.
याशिवाय उत्पादनाच्या नियोजनामध्ये, साधनसामग्रीचे (रिसोर्सेस) नियोजन हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये उत्पादन करीत असलेल्या वस्तूचे नेमके स्वरूप कसे आहे तसेच त्यासाठी कोणता कच्चा माल आणि इतर साधनसामग्री लागेल याचा एकत्रित विचार केला जातो. या दृष्टीने उत्पादनक्षमतेचे नियोजन, तसेच एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग आणि मॅन्युफॅ क्चरिंग रिसोर्सेस प्लॅनिंग केले जाते. याचबरोबर उत्पादनाचे वेळापत्रक  ठरवणे (शेडय़ुलिंग) व त्यासाठी मशीन लोडिंग करणे या सर्व गोष्टींचे नियोजन केले जाते.  नियोजन आणि नियंत्रण हा संपूर्ण उत्पादन कामाचा गाभा आहे, असे या ठिकाणी म्हणता येईल.
उत्पादन व्यवस्थापनाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे उत्पादनाविषयी स्ट्रॅटेजी ठरवून ती कंपनीच्या एकूण स्ट्रॅटेजीशी सुसंगत ठेवणे. स्ट्रॅटेजी हा शब्द मुळामध्ये लष्करी डावपेचांमधून आला व युद्धात विजय मिळवण्यासाठी वापरली जाणारी व्यूहरचना असा त्याचा मूळ अर्थ आहे. आधुनिक व्यवसाय हे जर युद्धासमान मानले तर त्यामध्ये टिकून राहण्यासाठी वापरले जाणारे डावपेच म्हणजे स्ट्रॅटेजी असा अर्थ घेता येईल. यामुळे उत्पादनविषयक वेगवेगळे डावपेच ठरवून ती अमलात आणणे हे एक महत्त्वाचे काम ठरते. स्ट्रॅटेजी ठरवताना, जागतिक पातळीवर उत्पादन पद्धतीमध्ये तसेच त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये कोणते बदल होत आहेत याचा विचार आवश्यक ठरतो. वस्तूचा दर्जा, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, वस्तूंचे विपणन यासंबंधीच्या संकल्पना  सतत बदलत आहेत. आधुनिक काळामध्ये वस्तूंचे जीवनचक्र (प्रॉडक्ट लाइफ सायकल) हे कमी कमी होत चालले आहे. यामुळे सतत नवीन संशोधन करीत राहून वस्तूंमध्ये सुधारणा कशा करता येतील आणि उत्पादनपद्धती व प्रक्रियांमध्ये कशा प्रकारचे बदल करता येतील याचा सतत विचार करावा लागतो. या दृष्टीने स्ट्रॅटेजी ठरवणे हेच एक महत्त्वाचे व कौशल्याचे काम ठरते. स्ट्रॅटेजी ठरवल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवणे हा त्यापुढचा भाग. उत्पादनातील स्ट्रॅटेजीचा मूळ उद्देश स्पर्धेमध्ये टिकून राहणे हा आहे व यासाठी स्ट्रॅटेजी ठरवणे जसे आवश्यक आहे, तसे तिची अंमलबजावणी करणे हेही तितकेच आवश्यक आहे. यासाठी केलेले नियोजन काटेकोरपणे पाळले जाते किंवा नाही याचा विचार करावा लागतो. केलेल्या कामाचे मूल्यमापन करणे हेही आवश्यक ठरते आणि स्ट्रॅटेजी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेळप्रसंगी संघटनात्मक बदलही करावे लागतात. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी एकूणच कामाचा दर्जा म्हणजेच उत्पादित वस्तूंचा दर्जा वाढवण्यासाठी गरज असते. या दृष्टीने ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण झाली किंवा नाही आणि ठरवलेल्या स्ट्रॅटेजीचा काय फायदा झाला, याचे मूल्यमापन वेळोवेळी करावे लागते. हासुद्धा स्ट्रॅटेजीचाच एक भाग आहे. याशिवाय वेगवेगळय़ा आधुनिक संकल्पना, उदा. लीन (छींल्ल) मॅन्युफॅक्चिरग प्रत्यक्षात कशा उतरवता येतील याचाही विचार आवश्यक असतो. या दृष्टीने स्ट्रॅटेजी हा विषय महत्त्वाचा ठरतो. उत्पादनविषयक स्ट्रॅटेजीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन’ (टोटल क्वालिटी मॅनेजमेंट) याविषयीची सुरुवात गुणवत्तेच्या संकल्पनेच्या व्याख्येपासून होते. मुळात गुणवत्ता म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. यानंतर गुणवत्ता सुधारण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार येतो. यासाठी गुणवत्ता या विषयातील तज्ज्ञ मानले जाणारे डेमिंग, कैझन, जुरान, तागुची या तज्ज्ञांनी सांगितलेल्या व मांडलेल्या संकल्पनांचा अभ्यास केला पाहिजे. तसेच गुणवत्ता मोजण्यासाठी असणारे वेगवेगळे निकष उदा. संख्याशास्त्रीय गुणवत्ता नियंत्रण (स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल), वेगवेगळे फ्लो चार्टस् पॅरेटो विश्लेषण इत्यादींचा वापर कसा होतो हे समजले पाहिजे. झीरो डिफेक्ट उत्पादन ही संकल्पना आज वापरली जाते. तसेच गुणवत्ताविषयक वेगवेगळी परिमाणे उदा. आय.एस.ओ. स्टॅन्डर्ड्ससुद्धा मोठय़ा प्रमाणावर वापरली जातात.
वरील विषयांबरोबरच चांगल्या व्यवस्थापनासाठी कच्च्या मालाचे तसेच उत्पादित मालाच्या साठय़ाचे (इन्व्हेन्टरी) व्यवस्थापन हा विषयसुद्धा तितकाच तहत्त्वाचा आहे. वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी कच्च्या मालाची खरेदी आवश्यक आहे व त्यामुळे काही प्रमाणात कच्च्या मालाचा साठा शिल्लक राहणे हेही स्वाभाविक आहे. कच्च्या मालाचा साठा मोठय़ा प्रमाणावर शिल्लक राहिला तर त्यामध्ये खेळते भांडवल (वर्किंग कॅपिटल) मोठय़ा प्रमाणावर अडकून पडते व यामधून अनेक अडचणी निर्माण होतात. त्यासाठी अनेक कंपन्या ‘झीरो इन्व्हेन्टरी’ ही पद्धत अमलात आणतात. मात्र ही पद्धत अवलंबण्यासाठी उत्पादनाचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे अन्यथा कच्च्या मालाअभावी संपूर्ण उत्पादनप्रक्रियाच बंद पडेल; याशिवाय कच्च्या मालाचा साठा मर्यादित ठेवण्यासाठी वस्तूच्या साठय़ाची कमाल व किमान पातळी ठरवणे, ए.बी.सी. पद्धत अवलंबणे इ. मार्गाचा वापर करता येतो.  
उत्पादन व्यवस्थापनामध्ये अशा प्रकारे वेगवेगळय़ा पैलूंचा वापर केला जातो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापनातील तंत्रांचा वापर करून उत्पादन प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवणे व स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी मदत करणे हा उत्पादन व्यवस्थापनाचा मूळ उद्देश आहे. यासाठी अगोदरच्या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे सैद्धान्तिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिकेशन समजावून घेण्यासाठी केस स्टडी, कारखान्यांना भेटी, तज्ज्ञांची भाषणे, उत्पादनविषयक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचे ज्ञान मिळवणे आदी मार्ग उपयुक्त ठरतात.                                                                                                                
nmvechalekar@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 1:01 am

Web Title: preparing for an mba production management
टॅग : Mba
Next Stories
1 आदरातिथ्याची संधी
2 खासगी सेवाक्षेत्राचे वाढते महत्त्व
3 स्वत:ची प्रतिभा ओळखा
Just Now!
X