लघुउद्योजकतेला मारक ठरणारी गोष्ट म्हणजे उद्योजक आणि कर्मचारीवर्गाचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन. त्याची कारणे आणि परिणाम यांची मीमांसा करणारा लेख-
ठोक्याठोक्याला बदलणाऱ्या आणि सतत वृिद्धगत होणाऱ्या अर्थव्यवस्थेत लघुउद्योजकता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते यात दुमत नाही. उत्तम विस्तार करण्याची क्षमता असूनही लघुउद्योजक भारतीय ‘ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट’मध्ये केवळ १७ टक्के भागीदारी करतात. हे जाणून घ्यायला हवे की, सुमारे ८० टक्के लघुउद्योग पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच बंद पडतात.
लघुउद्योग सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेताना बाजारपेठेतील स्पर्धा, आíथक बळ, शासकीय योजना हे बाह्य मुद्दे मोठे अडथळे असतात, असे नाही. उद्योजकांचा विकास न होण्यामागचे कारण उद्योजकांमधील महत्त्वाकांक्षेची कमतरता नसते तर भारतीय लघुउद्योजकांमधील पूर्वग्रहदूषित विचारसरणी हे यामागचे प्रमुख कारण असू शकते, जे त्यांना विलक्षण
त्रासदायक ठरते.
पूर्वग्रह हे एखाद्या व्यक्तीने वेळोवेळी जोपासलेले काही समज, मान्यता आणि तत्त्वांचा साचा असतो. या मान्यता किंवा समज व्यावसायिक यशासाठी एक मूलभूत पाया रचतात आणि त्या उद्योजकाने आपल्या व्यावसायिक प्रवासादरम्यान एकत्रित व जमा केलेल्या अनुभवांवरून तयार झालेल्या असतात. परंतु, आजच्या धावपळीच्या व आव्हानात्मक काळात डार्वनिचा सिद्धांत लक्षात घ्यायला हवा- तो म्हणजे ‘survival of the fittest’.
औद्योगिक संस्थेतील पूर्वग्रह:
* कार्यकारी स्तरावर होणारे पूर्वग्रह  
पिरॅमिडच्या शेवटच्या स्तरावर असणारे नोकरदार किंवा वेतनदार कंपनीच्या विकासाचा पाया उभारत असतात. उच्च अधिकारीवर्गाने उभारलेल्या आलेखानुसार व योजनेनुसार प्रत्यक्ष काम करून परिणाम साधणारा हा वर्ग असतो. या स्तरावर पूर्वग्रह तयार होतात व पिरॅमिडच्या वरच्या प्रत्येक स्तरावरील व्यक्तीकरिता हे पूर्वग्रह अधिक प्रभावी ठरतात. व्यवस्थापकाकडे आपल्या कामाचा वृत्तान्त देणारी व्यक्ती एक साचेबद्ध विचारसरणी विकसित करत असते आणि कदाचित त्यांचा असा समज असतो की, त्यांच्या कामातील सहभागाची पुरेशी दखल घेतली जात नाही अथवा त्या बाबतीत पक्षपात केला जातो किंवा त्यांचे मत ग्राह्य़ धरले जात नाही इत्यादी. कामाची पद्धत, विरोधी गट व उच्च व्यवस्थापनाबद्दल एक सर्वसाधारण दृष्टिकोन हा वर्ग तयार करतो.
* व्यवस्थापकीय स्तरावरील पूर्वग्रह  
मध्यम स्तरावरील व्यवस्थापक हे काही अधिकार सांभाळत असतात. कंपनी जसजशी वाढत जाते, तशा या व्यक्तीही वाढत आणि घडत जातात. संस्थेच्या विविध टप्प्यांत त्यांनी दिलेल्या  योगदानामुळे संस्था मोठी झालेली असते. सर्वात वरच्या स्तरावरील व्यवस्थापन व सर्वात खालच्या स्तरावरील व्यवस्थापनामध्ये ते एक दुवा असतात. त्यांच्या सहभागाबद्दल त्यांची वारंवार होणारी प्रशंसा व्यवस्थापकाची स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी कारणीभूत ठरते. मात्र, हे अतिशय धोकादायक  पूर्वग्रहदूषित विचारसरणीचे आव्हान ठरू शकते. यामुळे नोकरादारांबाबत त्यांची वृत्ती व दृष्टिकोन संकुचित होतो. कामाचे मूल्यमापन करण्यासाठी योग्य साधने उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा व्यवस्थापक काही नोकरदारांबाबत पक्षपात करतात. सर्वसामान्यपणे काम किंवा समूहाच्या नेतृत्व धोरणामुळे व्यवस्थापक सर्जनशील कल्पनांचा मार्ग रोखू शकतात. ‘माझ्या हाताखालचे लोक विचार करू शकत नाहीत किंवा माझ्याइतका विचार करू शकत नाही’, ‘मी सांगेन तीच पूर्व दिशा’, ‘नोकरदारांना सक्षम बनवल्यास ते उद्या माझ्यासाठीच धोका बनू शकतात,’ असे काही बिनबुडाचे समज कंपनीच्या कार्यप्रणालीसाठी घातक ठरतात. अनियंत्रित नेतृत्व करणारा एखादा अधिकारी मोठय़ा प्रमाणावर लक्ष्य गाठू शकतो, मात्र त्याच्या नियंत्रण करण्याच्या वृत्तीमुळे नोकरदारवर्गात त्याची आणि पर्यायाने कंपनीचीही प्रतिमा डागाळू शकते.
* उच्च व्यवस्थापन स्तरावरील पूर्वग्रह  
या स्तरावर उद्योजक अतिशय किचकट अशा पूर्वग्रहाला सामोरा जातो. अधिकतर भारतीय व्यवसाय हे पिढय़ान्पिढय़ा कुटुंबांकरवी चालत आलेले असतात. असे उद्योजक जर व्यवस्थापनाच्या जुन्या पद्धतींनुसार काम करत असतील तर जुन्या-नव्या पिढीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. रोजच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित केल्यास उद्योजक कदाचित मोठय़ा आणि महत्त्वाच्या संधींना हुकू शकतात. हाताळण्यास व नियंत्रण करण्यास कठीण अशा व्यवहारांमध्ये जर उद्योजक अडकला तर त्याचे/ तिचे लक्ष मुख्य व्यवसायावरून ढळू शकते आणि पर्यायाने त्यांचा स्पध्रेला सामोरे जाण्याचा वेग कमी होऊ शकतो. यावेळी काही अधिकार विभाजित करावेत. जेणेकरून उद्योजक आपल्या कौश्यल्यानुसार महत्त्वाच्या मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित करू शकतो.
* पूर्वग्रहांचे कंपनीवर होणारे परिणाम  
पूर्वग्रहदूषित विचारसरणीमुळे कंपनीच्या प्रत्येक स्तरावर जी अस्थिरता निर्माण होते, त्यामुळे नवनिर्मितीला अडथळे येतात. याचा अर्थातच ध्येयपूर्तीच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो आणि कामाच्या वेगवेगळया विभागांमध्ये अजिबात मेळ राहत नाही. या काही सामान्य गोष्टींचा व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक ठरणाऱ्या उत्तम सेवा, ग्राहकांचे समाधान आणि स्पर्धात्मक लाभ या गोष्टींवर परिणाम होतो आणि यामुळे अनेक संधी हुकू शकतात.
* आत्मपरीक्षणाची गरज
कंपनीमधून नराश्य दूर करण्यासाठी प्रत्येक स्तरावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ‘स्वत:ला बदला, त्याबरोबर नशीबही आपोआप बदलेल’ या अर्थाच्या एका पोर्तुगीज म्हणीप्रमाणेच उद्योजकाने स्वतची विचारसरणी, ध्येय व कृती नियोजित लक्ष्यानुसार ठरवलेल्या असाव्यात. संस्थेच्या व्यवहारांची ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल असावी.
यापूर्वी नमूद सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी आधी अडथळे ओळखावेत आणि ते व्यवस्थापकीय स्तरापर्यंत कळवावेत. ज्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तिगत ध्येयपूर्तीचे लक्ष्य हे एकत्रितपणे समूहाचे किंवा संस्थेचे ध्येय असते.
व्यवस्थापन स्तरावरील नोकरदारांनी व्यवसायाविषयी सखोल विचारसरणी ठेवावी आणि प्रत्येक समूहासोबत काम करण्याची तयारी ठेवावी. प्रत्येकाने आपली भूमिका ओळखून उच्च व कनिष्ठ पदांवरील व्यवस्थापनांमध्ये माध्यमाचे काम करावे व स्वत:चे काम प्रभावीपणे पार पाडावे. जेथे व्यावहारिक बाबी- टाग्रेट आणि आउटपुट येतात, त्यावेळी व्यवस्थापकाने पुढाकार घेऊन नोकरदारांचे नेतृत्व करावे. यामुळे कामामध्ये पारदर्शकता येते आणि नोकरदारांना वर्तमान आणि आगामी ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन लाभते.
* अडचणी हाताळणे
कंपनी अडचणीत असताना त्वरित आणि अचूक निर्णय घेणे आवश्यक असते. अ‍ॅन्थनी जे. डी. अँगेलो यांच्या ‘जो अपयशामधून काही शिकत नाही, तोच खरा अपयशी’ या उक्तीनुसार, उपाययोजना करण्यासाठी कामाप्रती प्रचंड निष्ठा, वचनबद्धता आणि एका सुनियोजित पद्धतीनुसार तिचा अवलंब करण्याची आवश्यकता असते. योग्य दृष्टिकोन मिळवण्यासाठी तिसऱ्या किंवा बाहेरील कंपनीकडून सहकार्य घेणे उपयुक्त ठरते. ज्यामुळे पूर्वग्रहांचे व्यवस्थित अवलोकन होऊ शकते आणि त्यावरील योग्य उपायही ते सुचवू शकतात.
जॅक वेल्थच्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हा तुम्ही नेतृत्व करत नसता तेव्हा स्वत: विकसित होण्यात यश असते, पण जेव्हा तुम्ही नेतृत्व करू लागता तेव्हा इतरांचा विकास करण्यात तुमचे यश असते.’ उद्योजकाने स्वत: पारदर्शकरीतीने काम केले तर कंपनी त्याच्या मार्गावर नक्की चालेल!