डॉ. सिद्धीविनायक बर्वे

जीवतंत्रज्ञानाशी संबंधित विविध विषयातील आपल्या देशातील वाढीचा विचार केला तर प्रक्रिया उद्योगात भारतात प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

जीवतंत्रज्ञानातील मूलभूत प्रक्रियांचा विचार केला तर किण्वन किंवा आंबविण्याची प्रक्रिया ही जीवतंत्रज्ञानाचा एक प्रमुख घटक ठरते. या जैविक तंत्राचा वापर प्रक्रिया उद्योगात मोठय़ा प्रमाणावर केला जातो. जैविक क्रियांचा मानवी कल्याणासाठी वापर करणारे शास्त्र म्हणून जीवतंत्रज्ञान विकसित होत असताना सूक्ष्मजीवशास्त्रातील या प्रक्रियाचा वापर मानवी जीवनात फार पुरातन काळापासून केला जातो. उदाहरण द्यायचे झाले तर दुधाचं दही बनत ते जैविक प्रक्रियेद्वारे. जीवाणूद्वारे दुधाचे रुपांतर दह्यात होते. तसेच आंबविण्याच्या प्रक्रियेच्या वापरातून मद्यार्काची निर्मिती केली जाते. अशा वरकरणी सोप्या वाटणाऱ्या प्रक्रियांच्या वापरातून विकसित होणारे तंत्रज्ञान हा प्रक्रिया उद्योगांचा पाया आहे. जीवतंत्रज्ञानविषयक विविध क्षेत्रातील व्याप्तींचा विचार केला तर वनस्पतीज जीवतंत्रज्ञानातील संधीप्रमाणे सूक्ष्मजीवशास्त्र विषयक व या क्षेत्राशी निगडित प्रक्रिया उद्योगात विकासाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत.

भारतात प्रक्रिया उद्योगाला लागणारे पोषक वातावरण उपलब्ध आहे. या प्रक्रिया उद्योगांसाठी विशिष्ठ तापमानाची गरज असते आणि असे तापमान भारतात नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे. या नैसर्गिक वरदानाचा आपण फायदा करून घ्यायला हवा. जीवतंत्रज्ञान हे संशोधनाधिष्ठित शास्त्र असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर आस्थापनाची आवश्यकता असते हे जरी खरे असले तरी सूक्ष्मजीवशास्त्राशी निगडित प्रक्रिया उद्योगातील विकासाच्या अमर्याद संधी भारताकडे उपलब्ध आहेत. प्रक्रिया उद्योगातून निर्माण झालेल्या घटकांचा दैनंदिन जीवनात मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याने या क्षेत्रात छोटय़ा मोठय़ा उद्योगांच्या निर्मितीतून स्वयंरोजगारच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. प्रक्रिया उद्योगातून निर्माण होणारे, दुग्धजन्य पदार्थ, मद्यार्क अशा घटकांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत असताना या क्षेत्रात उद्योगांच्या विकासासाठी प्रचंड वाव आहे.

जीवतंत्रज्ञानात केवळ नोकरीच्या किती संधी उपलब्ध आहेत याचा विचार न करता या क्षेत्रात संशोधन तसेच उद्योगांच्या किती संधी उपलब्ध आहेत, असा विचार केला तर भारतात जीवतंत्रज्ञानाची क्रांती नक्कीच घडू शकते.

सूक्ष्मजीवांच्या सहभागातून मानवी आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या प्रतिजैविक तसेच लसींची निर्मिती केली जाते. जीवतंत्रज्ञान ही आंतरशाखीय ज्ञानशाखा असल्यामुळे प्रक्रिया उद्योगांत प्रतिरक्षा शास्त्र, जैवरसायनशास्त्र, वनस्पतीज जीवतंत्रज्ञान तसेच रेणवीय जीवशास्त्र अशा आधुनिकतंत्रांचा वापर करण्यात येतो. आरोग्य क्षेत्रासाठी प्रतिजैविकांची तसेच लसींची मोठय़ा प्रमाणात गरज असते आणि या वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या जैविक घटकांचा सतत पुरवठा करावा लागत असल्यामुळे या क्षेत्रात वाढीच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. भारताची तसेच जगाची लोकसंख्या विचारात घेतली तर प्रक्रिया उद्योगाच्या वाढीस प्रचंड वाव आहे. आरोग्य क्षेत्राशी संबंधित प्रक्रिया उद्योगातून निर्माण केलेल्या घटकांची निर्यात करण्याची संधी भारताकडे उपलब्ध आहे. या संधीचे सोने करुन घेणे हे आपल्या हातात आहे.

वैद्यकीय क्षेत्रात प्रक्रिया उद्योगांद्वारे निर्मित घटकांची निर्मिती करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूकीची गरज असते हे खरे असल तरी प्रक्रिया उद्योगाद्वारे कमी भांडवलातून अनेक घटकांची निर्मिती करता येण शक्य होतं या प्रकारात समावेश होतो तो वितंचक किंवा एन्झाईम्सचा. वितंचकांचा वापर बहुतेक रासायनिक तसेच जैविक प्रक्रियेत होत असतो. ही वितंचके रासायनिक किंवा जैविक प्रक्रिया घडवून आणण्यासाठी सहाय्यक म्हणून काम करतात. साधे उदाहरण घ्यायचे तर अन्नपचनासाठी वितंचकांची गरज लागते. ही वितंचके मानवी शरीरात निर्माण होतात. पण काही कारणामुळे ती शरीरात निर्माण झाली नाहीत तर बाहेरुन द्यावी लागतात. तसे केल्याने वितंचकांची कमतरता दूर केली जाऊ शकते. आरोग्य क्षेत्राबरोबरच इतर अनेक क्षेत्रात वितंचकांची गरज लागते. वितंचकांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत असल्यामुळे या क्षेत्रातील वाढीस प्रचंड वाव आहे.

पर्यावरण क्षेत्राशी निगडित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वितंचकांचा वापर केला जातो. वितंचकाच्या वापरातून कचऱ्याचे विघटन जलद रितीने करता येऊ शकते. कवक म्हणजेच बुरशी तसेच जीवाणूंची मोठय़ा प्रमाणात निर्मिती करुन त्यापासून निर्माण होणाऱ्या वितंचकांचा वापर पर्यावरण रक्षणासाठी करण्यात येतो.

रेणवीय जीवतंत्रज्ञानाच्या वापरातून मानवी जीवनास आवश्यक असलेल्या घटकांची निर्मिती करणारी जनुके सूक्ष्मजीवांत संक्रमित करुन प्रक्रिया उद्योगाव्दारे या सूक्ष्मजीवांची वाढ केली जाते व हे घटक मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी वापरले जातात.

सूक्ष्मजीवशास्त्राशी निगडित काही प्रक्रिया उद्योगांची ओळख करुन घेत असताना एक बाब आपल्या लक्षात आली असेल की या तंत्राव्दारे निर्मित जैविक घटकांचा वापर प्रचंड प्रमाणार होत असल्यामुळे या घटकांची सतत निर्मिती करावी लागते म्हणून जीवतंत्रज्ञानाशी निगडित प्रक्रिया उद्योगांत करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत.

भारतात चंदीगड येथील सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्था, पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, दिल्लीतील भारतीय प्रतिरक्षा संस्था अशा प्रगत संशोधन संस्थाबरोबर पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स तर बंगलोरमधील बायोकॉन असे जागतिक कीर्तीचे उद्योग भारतात आहेत त्याचबरोबर भारतातील व परदेशातील बहुतेक विद्यापीठ तसेच महाविद्यालयातून या विषयातील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

जीवतंत्रज्ञान ही एक अदृष्य क्रांती आहे पण या तंत्राचे परिणाम सर्वव्यापी आहेत. जागतिक स्तरावर अव्वल देश होण्यासाठी आपल्याला या क्रांतीत सहभागी व्हायलाच हवे.

( केळकर शिक्षण संस्थेच्या, सायंटिफिक रिसर्च सेंटर, मुलुंड येथे लेखक संचालक म्हणून कार्यरत आहेत. )