पुणे शहर हे फक्त ‘ऑटोमोबाइल’ हब किंवा ‘आय.टी.’ हब राहिलेले नसून देशसंरक्षण क्षेत्रातदेखील पुण्याच्या तरुणांनी आपला ठसा उमटवलेला दिसत आहे.
अलीकडेच- १४ डिसेंबर रोजी पुण्याचे सहा तरुण भारतीय लष्करामध्ये ‘लेफ्टनंट’पदी दाखल झाले.  या युवकांची नावे वेदांग पाठक, सुहेल कडू, प्रीतिश लाटकर, निखिल सावंत, हिमांशू सेनगावकर आणि अभिजीत गोसावी अशी आहेत तर तीन पुणेकर तरुण हवाई दलामध्ये ‘फ्लाइंग ऑफिसर’ रँकमध्ये कमिशन्ड ऑफिसर बनत आहेत. त्यांची नावे आहेत चैतन्य मोडक, अॅलेन नागेश आणि सुशांत भोसले.
या नऊ तरुणांपैकी चार तरुणांनी डिसेंबर २००९ मध्ये एन.डी.ए.च्या १२३ व्या तुकडीत प्रवेश घेतला होता. यापैकी सुहेल कडू, प्रीतिश लाटकर आणि अभिजीत गोसावी यांनी आर्मी विंगमध्ये तर अॅलेन नागेश याने एन.डी.ए.च्या एअरफोर्स विंगमध्ये प्रवेश घेतला होता. वेदांग पाठक आणि हिमांशू सेनगावकर यांनी देहरादूनच्या इंडियन मिलिटरी अॅकॅडमी येथे सी.डी.एस. एन्ट्रीअंतर्गत जुलै २०१२ मध्ये प्रवेश घेतला व निखिल सावंत याने जानेवारी २०१३ मध्ये आय.एम.ए.मध्ये टेक्निकल ग्रॅज्युएट्स कोर्स (टी.जी.सी.) एन्ट्रीअंतर्गत प्रवेश केला. चैतन्य मोडक आणि सुशांत भोसले यांनी जुलै २०१२ मध्ये एअरफोर्स अॅकॅडमीमध्ये अॅफकॅट एन्ट्री आणि सी.डी.एस. एन्ट्रीअंतर्गत प्रवेश केला.
हा कमिशनिंगचा सोहळा आर्मीसाठी देहरादूनच्या इंडियन मिलिटरी अॅकॅडमी येथे होत असून एअरफोर्सच्या तरुणांचे कमिशन हैदराबाद-दुंदिगल येथील एअरफोर्स अॅकॅडमी येथे घडत आहे.
सुहेल कडू याने आठवी ते बारावीचे शिक्षण देहरादूनच्या आर.आय.एम.सी.मधून घेतले असून त्यानंतर त्याने एन.डी.ए.मध्ये डिसेंबर २००९ मध्ये प्रवेश केला. ते प्रशिक्षण संपवून जानेवारी २०१३ मध्ये आय.एम.ए. देहरादूनमध्ये प्रवेश केला. सुहेलचे वडील चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये हवालदार (रायटर) असून आई गृहिणी आहे. सुहेल हा कोथरूडचा रहिवासी आहे. सुहेल हा इन्फन्ट्री (पायदळ) ऑफिसर बनत आहे.
प्रीतिश लाटकर हा चिंचवडचा रहिवासी वाकडच्या ‘द गुड समरिटन स्कूल’मध्ये दहावीपर्यंत शिकला, तर अकरावी- बारावी त्याने शिवाजीनगरच्या भारत इंग्लिश स्कूलमध्ये केले. डिसेंबर २००९ मध्ये एनडीए प्रवेश, जानेवारी २०१३ मध्ये आय.एम.ए. प्रवेश. प्रीतिशचे वडील थरमॅक्स कंपनीमध्ये कार्यरत असून त्याची आई चिंचवडच्या एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. प्रीतिश यास ‘इंजिनीअर्स’ कोरमध्ये कमिशन मिळाले आहे.
अभिजीत गोसावी हा औंधचा रहिवासी. त्याने फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि अकरावी-बारावी फग्र्युसन महाविद्यालयातून केली. नंतर डिसेंबर २००९ मध्ये एन.डी.ए. व जानेवारी २०१३ पासून आय.एम.ए. देहरादून येथे प्रशिक्षण घेतले. अभिजीतचे आई-वडील हे दोघेही पोलीस खात्यात कार्यरत आहेत. अभिजीतला आर्मीच्या ए.एस.सी. कोरमध्ये कमिशन मिळाले आहे.
अॅलेन नागेश हा देखील औंधचा रहिवासी असून त्याचे संपूर्ण शालेय शिक्षण तसेच अकरावी-बारावीपर्यंतचे शिक्षण पाषाणच्या ‘लॉयलाज’मध्ये झाले आहे. त्यानंतर डिसेंबर २००९ पासून एन.डी.ए. (एअरफोर्स विंग) व जानेवारी २०१३ पासून दुंदिगलच्या (हैदराबाद) एअरफोर्स अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. अॅलेन हा फायटर पायलट बनला आहे.
वेदांग पाठक हा पाषाणचा रहिवासी असून त्याने इंदिरा कॉलेजमधून बी.बी.ए. पदवीचे शिक्षण घेतले. त्याने जुलै २०१२ मध्ये देहरादून येथे आय.एम.ए.मध्ये सी.डी.एस. एन्ट्रीअंतर्गत प्रवेश केला. वेदांग हा इन्फन्ट्री (पायदळ) ऑफिसर म्हणून कमिशन मिळाले आहे. वेदांगचे वडील पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असून आई गृहिणी आहे.
हिमांशू सेनगावकर हा डेक्कन जिमखान्याचा रहिवासी असून त्याने बी.एम.सी.सी. कॉलेजमधून बी.कॉम. पदवी शिक्षण घेतले आहे. जुलै २०१२ मध्ये सी.डी.एस. एन्ट्रीद्वारे त्याने आय.एम.ए.मध्ये प्रवेश केला. हिमांशूचे वडील पोलीस खात्यात उच्च पदावर कार्यरत आहेत. आई पुण्यात प्ले ग्रुपच्या शाळेची चेन चालवितात. हिमांशूचे कमिशन ‘आर्मर्ड’ कोरमध्ये झाले आहे.
निखिल सावंत हा वानोरीचा रहिवासी असून त्याचे वडील निवृत्त आर्मी अधिकारी तर आई गृहिणी आहे. पुण्याच्या (कोंढवा) व्ही.आय.आय.टी. कॉलेजमधून त्याने स्थापत्य विभागातून अभियांत्रिकी पदवी घेतली. जानेवारी २०१३ मध्ये आय.एम.ए.मध्ये प्रवेश. निखिल यास ‘कोर ऑफ इंजिनीअर्स’मध्ये कमिशन मिळाले आहे.
चैतन्य मोडक हा सदाशिव पेठ येथील रहिवासी असून त्याने व्ही.आय.टी. येथून इन्स्ट्रमेंटेशन अॅण्ड कंट्रोलमध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. त्याने जून २०१२ मध्ये एअरफोर्स अॅकॅडमीमध्ये प्रवेश केला. तो फायटर पायलट झाला आहे. चैतन्यचे वडील ऑर्थोपेडिक सर्जन असून आई ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहे.
सुशांत भोसले हा लोहेगावचा रहिवासी. त्याने शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी संपादन केली. जून २०१२ मध्ये त्याने एअरफोर्स अॅकॅडमीमध्ये प्रवेश केला. तो ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट पायलट बनला आहे. सुशांतचे वडील भारतीय हवाई दलातच कार्यरत असून आई गृहिणी आहे.
वेदांग पाठक आणि सुहेल कडू यांना इन्फन्ट्री ऑफिसर म्हणून कमिशन मिळाले आहे. प्रीतिश लाटकर आणि निखिल सावंत यांना कोर ऑफ इंजिनीअर्समध्ये कमिशन प्राप्त झाले आहे. हिमांशू सेनगावकर याला आर्मर्ड कोरमध्ये तर अभिजीत गोसावी याला ए.एस.सी.मध्ये कमिशन मिळाले आहे. हे सर्व सहा विद्यार्थी आता ‘लेफ्टनंट’ झाले आहेत. त्याचबरोबर चैतन्य मोडक आणि अॅलेन नागेश हे दोघे फायटर पायलट म्हणून कमिशन तर सुशांत भोसले हा ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट पायलट म्हणून कमिशन झाला आहे. म्हणजेच हे तिघे हवाई दलातील तरुण ‘फ्लाइंग ऑफिसर’ म्हणून कमिशन झाले आहेत.
हे सर्व नऊ तरुण पुण्याच्या ‘अॅपेक्स करिअर्स’चे माजी विद्यार्थी आहेत, जेथे त्यांनी मुलाखतीचे प्रशिक्षण घेऊन डिफेन्सच्या एस.एस.बी. मुलाखतीत यश मिळवले होते. ‘अॅपेक्स करिअर्स’चे संचालक आणि या सर्व तरुणांचे प्रशिक्षक लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर म्हणाले की, माझे नऊ विद्यार्थी एकाच दिवशी अधिकारी बनत असल्याचा मला विशेष आनंद होत आहे. मला खात्री आहे की, हे सर्व तरुण भारतीय सशस्त्र दलात उत्तम अधिकारी म्हणून आपले कर्तृत्व सिद्ध करतील.