डॉ. नीता ताटके,  क्रीडा मानसतज्ज्ञ

करोनानंतर नोकरी व्यवसायाच्या संधी कशा बदलत जातील, याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत.  टाळेबंदीच्या काळातील ठप्प झालेले व्यवहार आणि अर्थचक्रातील बदल पाहता त्या रास्तही आहेत पण पुढे काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेच. पुढच्या काळातील करिअरचा मार्ग कसा असेल, याविषयी विविध विषयांतील तज्ज्ञांनी लिहीलेली ही लेखमाला..

शमा पहिल्यापासूनच तुडतुडीत, धावण्याच्या शर्यतीत पहिला क्रमांक शाळेत तिने कधीच सोडला नाही. तिची आवड, इच्छा बघून तिच्या पालकांनी तिचे नाव ‘अ‍ॅथलेटिक्स’ प्रशिक्षणासाठी घातले; पण अट एकच, अभ्यास चांगला झालाच पाहिजे, तिथे गुण कमी मिळाले तर धावणे बंद. दुर्दैवाने दहावीत गेल्यावर, तिच्या ‘क्लास’च्या सरांनी शमाच्या पालकांना खास बोलावून स्पष्ट सांगितले, ‘हिचे धावणे बंद करा आधी, परीक्षेत चांगले गुण मिळाले तर पुढे डॉक्टर, इंजिनीअर होता येईल, नुसते धावून काय मिळणार आहे?’ शमाची एक उभरती क्रीडा कारकीर्द तिथेच थांबली.  तिचे रडणे, नाराज होणे यावरून तिने आणखीच बोलणी खाल्ली. तिच्या पालकांचे वा शिक्षकांचे काही चुकले आहे असे बहुतेकांना वाटलेच नाही. अगदी आत्तापर्यंत अभ्यासच महत्त्वाचा, बाकी सगळे दुय्यम.. अशीच समाजाची मनोभूमिका होती. अभ्यासात कमी असलात तर ‘टय़ूशन’, अभ्यासात चांगले आहात, मग अजून चांगले गुण मिळविण्यासाठी ‘मोठी टय़ूशन’ यामध्ये भरडल्या जाणाऱ्या मुलांच्या इतर कलागुणांकडे सर्रास दुर्लक्ष केले गेले वा दुय्यम स्थान दिले गेले.

‘हे काम म्हणजे काय खेळ वाटला का तुला’ असे खेळाकडे तुच्छतापूर्वक बघण्याच्या दृष्टिकोनापासून ‘आमचा मुलगा खेळातच कारकीर्द करायची म्हणतोय, आमची काही ना नाही त्याला, नाही तरी चांगला अभ्यास करून चांगली नोकरी मिळेलच याची काय खात्री?’ असे अभिमानाने सांगणारे पालक.. असा कालापव्ययापासून ‘प्रतिष्ठे’पर्यंतचा खेळाचा प्रवास अत्यंत धिम्या गतीने झाला, मात्र आता खेळाला सुगीचे दिवस यायला सुरुवात झाली होती. भारतात क्रीडापटूंना आर्थिक स्थैर्य मिळायला प्रामुख्याने क्रिकेटपटूंपासून सुरुवात झाली, हळूहळू त्यात इतर खेळांचा समावेश व्हायला लागला, तरी सुरुवातीला हे भाग्य अगदी अतिशय चांगली कामगिरी करणाऱ्या मोजक्याच खेळाडूंपुरते मर्यादित होते. मात्र कसोटीपासून एकदिवसीय, मग ‘टी-२०’ असे क्रिकेटचे स्वरूप बदलले, खेळाडूंवरती बोली लागायला सुरुवात झाली आणि अनेक गुणवंत खेळाडूंना याचा फायदा झाला. समालोचक, विविध वृत्तवाहिन्या, पत्रकार, विश्लेषक या सर्वानाच यानिमित्ताने करिअरची एक वेगळी वाट चोखाळता आली. ‘टी-२०’च्या निमित्ताने ‘चीअर लीडर्स’ आल्या. मला आठवते आहे, डी. वाय. पाटील स्टेडियम येथे झालेल्या एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत ‘चीअर लीडर्स’ म्हणून भांगडा, गरबा खेळणारे गट आले होते व त्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. खेळाच्या स्पर्धेच्या निमित्ताने कलाकारही खेळाशी जोडले जात होते आणि त्यातून प्रसिद्धीबरोबरच पैसाही येऊ लागला होता. सुदैवाने हे लोण क्रिकेटपुरते मर्यादित न राहता इतर खेळांतही पसरले. प्रो-कबड्डीने या भारतीय खेळाचा चेहरामोहराच अगदी आश्चर्य वाटावे असा बदलला. या स्पर्धा बघायला प्रेक्षक तिकीट घेऊन मैदानावर गर्दी करायला लागले, दूरचित्रवाणीवर या खेळाचे ‘थेट’ प्रक्षेपण व्हायला सुरुवात झाली आणि समाजात भारतीय खेळाच्या खेळाडूंनाही प्रतिष्ठा मिळू लागली. पूर्वी अभ्यास एके अभ्यास करणारे पालक मुलांना मैदानावर पाठवू लागले, शाळा-महाविद्यालयांना खेळाचे महत्त्व पटू लागले आणि विद्यार्थ्यांना क्रीडा सुविधा मिळू लागल्या. अगदी नामांकित महाविद्यालयांतही  कमी गुण असले तरी क्रीडा कौशल्याच्या जोरावर खेळाडूंना प्रवेश मिळायला सुरुवात झाली. यानंतर अनेक खेळाडूंनी खेळामधलीच पुढची पायरी गाठली, ती म्हणजे प्रशिक्षकाची. आंतरराष्ट्रीय शाळा, उइरउ/कउरउ शाळांमध्ये खेळातला सहभाग प्रतिष्ठेचा मानला जाऊ लागला आणि सधन पालकांची मुलेही विविध खेळांकडे वळायला सुरुवात झाल्याने प्रशिक्षकांना या शाळांमधूनही चांगली मागणी येऊ लागली, प्रशिक्षकांना अर्थार्जनही चांगले होऊ लागले. याच सुमारास सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात ‘फिटनेस जिम्स’चाही प्रवेश झाला आणि या ‘जिम्स’तर्फे ‘फिटनेस’चे अभ्यासक्रम राबविले जाऊ लागले. यातूनच ‘फिटनेस ट्रेनर्स’ व ‘पर्सनल ट्रेनर्स’ तयार होऊ लागले. त्यांनासुद्धा चांगली मागणी येऊ लागली. खेळांच्या स्पर्धा वाढायला लागल्या, त्यांचे ‘इव्हेंट्स’ व्हायला सुरुवात झाली आणि ‘क्रीडा कार्यक्रम व्यवस्थापन’ ही नवीन शाखा सुरू झाली. याचेही अभ्यासक्रम सुरू झाले आणि नेतृत्व, वक्तृत्व, धावपळ करण्याची आवड असलेल्यांना ‘जरा हटके’ कारकीर्द घडविण्याची संधीही मिळाली. ‘खेळाडू/क्रीडा व्यवस्थापन’ करण्याच्या संधीही उपलब्ध होऊ लागल्या.

खेळाडूंना जाहिरातीचे दरवाजे खुले झाले, समाजमाध्यमांचा प्रसार वाढायला लागला आणि अनेक खेळाडूंनीसुद्धा लोकांच्या नजरेत रहाण्यासाठी, ‘फॅन्स’ना उत्तरे देण्यासाठी, खेळाव्यतिरिक्त आपण काय करतो हे दाखविण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठय़ा प्रमाणात वापर करायला सुरुवात केली. ते झाल्यावर मग या बाबी सांभाळणाऱ्या कंपन्या, व्यक्ती पुढे आल्या. संगणक चांगले हाताळणाऱ्या, लिखाण चांगले करणाऱ्यांना, प्रत्यक्ष खेळाची नसेल, पण खेळाशी जोडली गेलेली ही एक कारकीर्दसुद्धा उपलब्ध झाली. खेळांचे साहित्य बनविणारे, टी—शर्ट, शॉर्ट्स,  ट्रॅक सूट्स् आदी खेळाशी संबंधित कपडे व त्यावरील ‘लोगो’ बनविणारे, पदके, आकर्षक चषक, बॅनर्स बनविणारे, अनेक लघुउद्योग उभे राहिले. यापैकी कशासाठीही परीक्षेतले गुण किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रम आवश्यक नसल्याने, अनुभवाच्या जोरावर, वेळप्रसंगी प्रमाणपत्र अभ्यासक्रम करून या सर्व मंडळींनी आपला जम चांगला बसवला. प्रतिष्ठा, पैसा मिळायला सुरुवात झाली, समाजाच्या दृष्टिकोनातही फरक पडायला लागला आणि खेळ व खेळासंबंधी व्यवसाय यांनी आपले पाय अधिक भक्कमपणे रोवायला सुरुवात केली. अकल्पितपणे या सगळ्याला ’करोनाची’ दृष्ट लागली आहे. आज खेळ  बंद आहे, कुठलीच उन्हाळी शिबिरे, स्पर्धा झाल्या नाहीत. अगदी जपानच्या ऑलिम्पिक स्पर्धाही पुढे ढकलल्या गेल्या. सर्वच संस्था, प्रशिक्षक, कपडय़ांचे तागे, पदके, चषक यांना लागणाऱ्या साहित्यामध्ये गुंतवणूक केलेले लघुउद्योग या सर्वासमोर गंभीर आर्थिक प्रश्न उभे राहायला सुरुवात झाली आहे आणि नजीकच्या काळाकडे याची उत्तरे नाहीत. क्रीडा आणि तद्संबंधित व्यवसाय बहरत असतानाच ‘करोना ग्रहणाने असंख्य खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मंडळी खूप चिंतेत आहेत. मात्र या टाळेबंदीत आणि नंतरही ‘आरोग्य’ हे प्राधान्यक्रमावर असणार आहे, त्यामुळे हे चित्र अगदीच वाईट ठरणार नाही. क्रीडा आणि व्यायामाचे कोणते दरवाजे आता उघडतील हे आपण पाहू या पुढच्या लेखात.