tayari-mpsc2मित्रांनो, परीक्षा जसजशी जवळ येते तसतसे मनावरचे दडपण वाढत जाते.. साधारणत: आजपासून ५० दिवसांनी विक्रीकर निरीक्षक पदासाठी पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. जर अगदीच गणिती भाषेत तासांचा हिशेब केला आणि त्या तासांचा आपल्या जबाबदाऱ्या व अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींचा मेळ घातला तर आपल्यापाशी फारच कमी वेळ आहे, असे तुम्हाला जाणवेल. पण हातात असलेल्या वेळेचा योग्य मेळ साधला तर यश मिळवणे कठीण नाही. या परीक्षेची तयारी करताना पुढे नमूद केलेल्या घटकांचा सविस्तर अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.

१) चालू घडामोडी
चालू घडामोडी हा सर्वच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना जे अपयश येते, त्यात या घटकाचा आवाका लक्षात न आल्याने त्यांची गुणसंख्या घसरते आणि अंतिम यादीत प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या गुणांपेक्षा काहीसे गुण कमी पडतात. या घटकाची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम मागील प्रश्नपत्रिका सोडवणे उत्तम.
* आंतरराष्ट्रीय घडामोडी
या घटकात भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या जागतिक स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करावे. उदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिकडेच झालेल्या नेपाळ, जपान, अमेरिका इ. देशांच्या भेटी व त्या भेटींचे महत्त्व. पंतप्रधान उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या जागतिक संघटनांच्या परिषदांचा अभ्यास सविस्तर करावा तसेच इतर महत्त्वपूर्ण संघटनांची माहिती करून घ्यावी. उदा. संयुक्त राष्ट्र संघटना, त्याच्या सहयोगी संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार, जागतिक व्यापार संघटना, ओपेक, सार्क, एशियान, जी-8, जी-२० इ. संघटना, त्यांची मुख्यालये, या संघटनांमधील सदस्य देश, सदस्य देशांच्या झालेल्या बठका यांचा अभ्यास करावा. काही प्रश्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान, पदव्या या उपघटकावरदेखील विचारले जातात. उदा. नोबल पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, बुकर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय शांतता व नि:शस्त्रीकरण यासाठी देण्यात येणारे पुरस्कार या विषयक मागील तीन वर्षांच्या पुरस्कार विजेत्यांची नावे, पुरस्काराचे स्वरूप जाणून घ्यावे.

* राष्ट्रीय घडामोडी
यांत प्रश्न प्रामुख्याने चालू वर्ष आणि मागील दोन वर्षांपासूनच्या घडामोडींवर विचारले जाऊ शकतात. उदा. लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, स्वच्छता अभियान, मेक इंडिया योजना इ. राष्ट्रीय स्तरावर दिले गेलेले पुरस्कार, देशात घडलेल्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी, या काळात लागलेले शोध, शास्त्रज्ञ, अवकाश संशोधन केंद्र, त्यांच्या महत्त्वाच्या मोहिमा यांचा अभ्यास करावा. साहित्यक्षेत्रातील घडामोडींचाही अभ्यास करावा. उदा. गेल्या दोन वर्षांंत चच्रेत असलेली पुस्तके, त्यांचे लेखक इ. झालेल्या महत्त्वाच्या नेमणुका- उदा. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष, जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सचिव, रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष .

* क्रीडा घडामोडी
या घटकात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक, बुद्धिबळ, क्रिकेट, फुटबॉल स्पर्धा, २०-२० क्रिकेट सामने, चारही ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धांची माहिती, स्पर्धाचे स्थळ, सहभागी देश, विजेता व उपविजेता संघाची नावे, स्पध्रेदरम्यानचे महत्त्वाचे विक्रम यांचा अभ्यास करावा.
वरील घटकाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर घोषित केलेले वर्ष, राष्ट्रीय स्तरावर घोषित केलेले वर्ष, विविध क्षेत्रातील ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवडल्या गेलेल्या व्यक्ती, राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे ऑपरेशन उदा. ग्रीन हंट इ. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एखादा महत्त्वाचा निर्णय, न्यायाधीशांची नावे, जनगणना इ. याशिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्माननीय व्यक्तींचे निधन झाले असेल तर त्यांचे कार्यक्षेत्र, त्यांना प्राप्त पुरस्कार इ. अभ्यास करावा.

२) अंकगणित
परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण या घटकावर जास्तीत जास्त गुण मिळवून अंतिम यादीत आपले स्थान निश्चित करण्यास संधी असते. अंकगणितावरील प्रश्न प्रामुख्याने इ. पाचवी ते इ. दहावी पर्यंत शिकलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. हा घटक आपण खालील प्रकारे विभाजीत करू शकतो- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, भूमिती, काळ, काम व वेग, खरेदी-विक्री, दशांश अपूर्णाक इ.
* बेरीज- यात दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी संख्यांची बेरीज, बेरजेवर आधारित समीकरणे, वर्ग व वर्गाची बेरीज, सम-विषम संख्यांची बेरीज, सरळ रूप द्या इत्यादी अभ्यास करावा.

* वजाबाकी– तीन अंकी किंवा चार अंकी किंवा पाच अंकी संख्येची वजाबाकी, अपूर्णाकाची वजाबाकी, वर्ग किंवा वर्गमूळांची वजाबाकी यावर आधारित प्रश्न विचारले जातात.

* गुणाकार- दोन किंवा तीन अंकी संख्येचा गुणाकार, घन संख्या किंवा वर्ग संख्या किंवा वर्गमूळ यांचा गुणाकार, पदावलीचा विस्तार, अपूर्णाकाच्या पदावलीस सरळ रूप देणे, गुणक किंवा पटींवर आधारित प्रश्न, संख्यांची टक्केवारी यावर आधारित प्रश्न.

* भागाकार- दोन किंवा तीन अंकी संख्येचा भागाकार, वर्गमूळ किंवा घनसंख्या यांचा भागाकार, भागाकारावर आधारित अपूर्णाकाच्या पदावलीला सरळ रूप देणे, विशिष्ट संख्येने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या यांवर आधारित प्रश्न.

* सरासरी- वय, तापमान, वजन, किंमत, गुणसंख्या, क्रिकेटपटूंच्या धावा यावर आधारित गणिते.

* भूमिती- त्रिकोणाचे कोन, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, गोलाचे घनफळ, आयताची परिमिती व क्षेत्रफळ, दंडगोल व शंकूचे आकारमान यांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

* काळ, काम व वेग- एखाद्या बसने अथवा रेल्वेने ठरावीक वेळेत कापलेले अंतर, एका स्थानकावरून एकाच दिशेने किंवा विरुद्ध दिशेने सुटलेली रेल्वे किंवा बस यांना परस्परांना भेटण्यास लागणारा वेळ, यावर आधारित प्रश्न तसेच एखादे काम, ठरावीक व्यक्तीने ठरावीक वेळेत पूर्ण केले असेल व तेच काम व्यक्तींची संख्या वाढवली किंवा कमी केली किंवा फक्त वेळ वाढवली किंवा कमी केली तर ते काम कसे होईल यावर आधारित प्रश्न.

* खरेदी-विक्री – नफा-तोटा, खरेदी-विक्री, छापील किंमत यावर आधारित प्रश्न याशिवाय इतर घटकात विशिष्ट क्रमाने आलेली मालिका, शेकडेवारी इ. घटकांचा अभ्यास करावा.
(बुद्धिमत्ता घटकाचा अभ्यास कसा करावा? .. पुढच्या भागात)
grpatil2020@gmail.com