विदेशी विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिष्यवृत्तीसह शिक्षण घेण्यासाठी खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत-

युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड इंडिया पदवीपूर्व मेरिट स्कॉलरशिप :
इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्डतर्फे तीन भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :  अर्जदार विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्डमधील कुठल्याही विषयातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा व त्यांच्या अभ्यासक्रमाच्या सत्राची सुरुवात सप्टेंबर २०१३ मध्ये व्हायला हवी.
शिष्यवृत्तीचा तपशील :  या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा सात हजार पाउंड्सची मासिक शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये सवलतही दिली जाईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क :  या शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्डच्या www.niituniversity.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :  विहित नमुन्यातील तपशीलवार अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख २८ जून २०१३.

एनआयआयटी युनिव्हर्सिटीची एमटेक स्कॉलरशिप :
एनआयआयटी युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया येथील जिओग्राफिक इन्फरमेशन सिस्टिममधील एमटेक्. अभ्यासक्रमासाठी भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :  अर्जदार विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञान विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी जीआरई, जीएटीई यांसारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व जीआरई/ गेट प्रवेशपरीक्षेतील गुणांकाच्या आधारे समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीचा तपशील :  निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या एमटेक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्याशिवाय सवलतीच्या शैक्षणिक शुल्काचापण लाभ देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क :  या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एनआयआयटी युनिव्हर्सिटीच्या  www.niituniversity.inया संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :  योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१३.

युनिव्हर्सिटी ऑफ साऊथम्पटनची एमबीए अभ्यासक्रम शिष्यवृत्ती :
इंग्लंडमधील साउथम्पटन विद्यापीठातर्फे निवडक भारतीय विद्यार्थ्यांना एमबीए करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :  अर्जदार विद्यार्थी पदवीधर असावेत, त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीतकमी ६०% असायला हवी व त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ साउथम्पटनच्या एमबीए अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला असावा.
शिष्यवृत्तीचा तपशील :  निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार ते पाच हजार पाउंड्सची शिष्यवृत्ती त्यांच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या कालावधीदरम्यान देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क :  योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती योजनेसंबंधी अधिक माहिती व तपशिलासाठी साउथम्पटन विद्यापीठाच्या www.southampton.ac.uk या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख :  विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख  ३० जून २०१३.
विदेशी विद्यापीठ वा शैक्षणिक संस्थांमध्ये शिष्यवृत्तीसह शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनांसह शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांना या शिष्यवृत्ती योजनांचा फायदा होऊ शकेल.