रशियातील स्कॉलटेक विद्यापीठातर्फे माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा विज्ञान व तंत्रज्ञान, जीव वैद्यकीय तंत्रज्ञान आदी विषयांतील एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी अर्ज  मागवण्यात आले आहेत.
मूलभूत व उपयोजित विज्ञानासहित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियातील स्कॉलटेक विद्यापीठाकडून माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा विज्ञान व तंत्रज्ञान, जैववैद्यक तंत्रज्ञान आदी विषयांतील एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी २०१४ साठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाश्र्वभूमी
स्कॉलटेक विद्यापीठ म्हणजेच ‘स्कॉलकोव्हो इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ हे रशियातील एक नामांकित खासगी विद्यापीठ आहे. स्कॉलटेकचे नाव दोन गोष्टींमुळे झाले, एक म्हणजे अमेरिकेतील ‘एमआयटी’ विद्यापीठाच्या सहकार्याने २०११ मध्ये हे विद्यापीठ सुरू करण्यात आले. दुसरे कारण म्हणजे इथले वातावरण उपयोजित संशोधन व उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणारे आहे.
हे विद्यापीठ राजधानी मॉस्कोजवळ असलेल्या स्कॉलकोव्हो या उपनगरात आहे. नव्या पिढय़ांना तंत्रज्ञानाच्या मदतीने मूलभूत व उपयोजित संशोधनासाठी तयार करणे व त्यातून उद्योजकतेसाठी प्रेरित करणे या हेतूने स्कॉलटेक काम करत आहे.  एकविसाव्या शतकात एका नव्या वैज्ञानिक युगाची लहर तयार करून रशियासह जगाला या संशोधनाचा लाभ करून देणे हे या विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. जगातील अनेक समस्यांवर तंत्रज्ञानावर आधारित सर्जनशील  उत्तरे शोधता यावीत, हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.
शिष्यवृत्तीबद्दल..
रशियातील स्कॉलटेक विद्यापीठाकडून माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा विज्ञान व तंत्रज्ञान, जीव वैद्यकीय तंत्रज्ञान आदी विषयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी म्हणजेच एम. एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दर वर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. येत्या काही वर्षांत अणु विज्ञान व अंतराळ तंत्रज्ञान या क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम व त्यासाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. शिष्यवृत्तीद्वारे प्रवेश मिळालेल्या अर्जदाराला विद्यापीठाकडून टय़ुशन वेव्हर, अल्प दरात निवासाची सोय, इतर खर्चासाठी आवश्यक मासिक भत्ता तसेच वैद्यकीय विमा दिला जातो. ही शिष्यवृत्ती आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. स्कॉलटेक विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याने या शिष्यवृत्तीसाठी चांगलीच स्पर्धा असते.
आवश्यक अर्हता –
शिष्यवृत्तीसाठी अर्जदार किमान पदवीधर असावा. मात्र, त्याची पदवी अभियांत्रिकी, गणित, उपयोजित विज्ञान (applied sciences)भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र इत्यादी विषयांमध्ये किंवा या विषयांशी संबंधित असावी. पदवी स्तरावर अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदार टोफेल अथवा IELTS या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे. अर्जदाराने जीआरई परीक्षा दिली असेल तर त्याविषयी विद्यापीठाला माहिती द्यावी.
अर्ज प्रक्रिया
 स्कॉलटेक विद्यापीठाची अर्जप्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये असते. पहिल्या टप्प्यात, अर्जदाराने शिष्यवृत्तीसाठी त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून विद्यापीठाच्या वेबसाइटवर जमा करावा. त्या अर्जाबरोबर अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल सविस्तर माहिती देणारे त्याचे एसओ. पी. (Statement of Purposeत्याचा  सीव्ही, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी मेल कराव्यात.
प्रवेश किंवा शिष्यवृत्तीशी संबंधित कोणत्याही चौकशीसाठी admissions@skoltech.ru या पत्त्यावर ई-मेल करावा. अर्जदाराला त्याच्या निवडीबद्दल मार्च २०१४ च्या दरम्यान कळवले जाईल.
अंतिम मुदत- या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत जानेवारी २०१४ पर्यंत आहे.
महत्त्वाचा दुवा- http://www.skoltech.ru