News Flash

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : जर्मनीमध्ये पीएच.डीसाठी शिष्यवृत्ती

बॉन विद्यापीठ हे जर्मनीतील प्राचीन व प्रमुख शैक्षणिक संस्थांपकी एक आहे.

बॉन विद्यापीठ हे जर्मनीतील आघाडीचे विद्यापीठ आहे. बॉन विद्यापीठ  मूलभूत विज्ञान, कलाशाखेतील विविध विषय, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, व्यवस्थापन आदी विषयांतील संशोधन व अध्यापनात अव्वल मानले जाते.  या विद्यापीठाच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च या विभागाच्या वतीने वर उल्लेखलेल्या विविध क्षेत्रांमध्ये अद्ययावत संशोधन होण्याकरता पीएच.डीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.

२०१७ मधील पीएच.डीच्या शिष्यवृत्तीसहित प्रवेशासाठी अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र किंवा सामाजिक शास्त्रे या विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांकरता दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.

शिष्यवृत्तीविषयी..

सुमारे दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे १८१८ साली स्थापना झालेले बॉन विद्यापीठ हे जर्मनीतील प्राचीन व प्रमुख शैक्षणिक संस्थांपकी एक आहे. विद्यापीठाच्या काही माजी विद्यार्थ्यांनी नोबेल पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे, तर इतर काही नावांमध्ये पोप बेनेडिक्ट, कार्ल मार्क्‍स, फ्रेडरिक नित्शे अशा व्यक्तींचा समावेश आहे.  पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये उपलब्ध असणारे विविध पर्याय आणि ५० लाखांहून अधिक पुस्तके असलेले समृद्ध ग्रंथदालन ही या विद्यापीठाची वैशिष्टय़े! विद्यापीठाचा सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च हा विभाग १९९७ साली सुरू करण्यात आलेला आहे. या विभागाच्या वतीने अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, कृषी, भूविज्ञान, जीवशास्त्र, गणित व मूलभूत विज्ञान इत्यादी विषयांत संशोधन करण्यात येते. विद्यापीठाच्या या विभागाच्या वतीने वर उल्लेखलेल्या  क्षेत्रांत अद्ययावत संशोधन व्हावे याकरता पीएच.डीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या संशोधनाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. या अंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठातर्फे तीन वर्षांसाठी मासिक भत्ता मिळू शकतो तसेच पीएच.डीच्या या कालावधीकरता शिकवणी शुल्क माफ असते. याव्यतिरिक्त त्याला विमा भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या इतर सुविधा देण्यात येतात. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी प्राप्त करणे अपेक्षित आहे.

अर्हता : ही शिष्यवृत्ती देशोदेशींच्या उमेदवारांसाठी खुली आहे. अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र किंवा सामाजिक शास्त्रे यांपकी ज्या विषयात अर्जदार पीएच.डी करणार असेल त्या विषयातील किंवा त्या विषयाशी संबंधित पदव्युत्तर पदवी असावी. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. अमेरिकन मूल्यांकन पद्धतीनुसार त्याचा जीपीए ३.० एवढा किंवा जर्मन मूल्यांकनानुसार जीपीए २.० एवढा असावा. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधन अनुभव असावा. एवढेच नव्हे, तर त्याच्याकडे त्याच्या विषयाशी संबंधित संशोधनातील नावीन्यपूर्ण कल्पना असाव्यात. या शिष्यवृत्तीच्या प्रवेशासाठी संस्थेचा हा एक प्रमुख निकष आहे. अर्जासोबत संशोधनातील अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. संपूर्ण डॉक्टरल अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये असून उमेदवाराचे इंग्रजीचे ज्ञान उत्तम असणे आवश्यक आहे. त्याचे इंग्रजीवरील प्रभुत्व अर्थातच त्याच्या टोफेल किंवा आयईएलटीएसच्या गुणांवरून ठरवले जाईल. आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी जीआरई व टोफेल या परीक्षा दिलेल्या असाव्यात. संस्थेच्या या पीएच.डी अभ्यासक्रमाला अर्ज करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही, मात्र अर्जदाराला त्याची अंतिम पदवी मिळून सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटलेला नसावा.

अर्ज प्रक्रिया : या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराला दोन टप्प्यांमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यातील पहिल्या टप्प्यात ऑनलाइन नोंदणी करून स्वत:ची संपूर्ण माहिती सादर करावी. पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर अर्जदाराला एक नोंदणी क्रमांक मिळेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये हा नोंदणी क्रमांक वापरून अर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. दुसऱ्या टप्प्यामध्ये अर्ज विहित नमुन्यात ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये नमूद केलेल्या विद्यापीठाच्या वेबसाइटवर  जमा करावा. अर्जासोबत त्याचे जीआरईचे गुण तसेच टोफेल किंवा आयइएलटीएस या दोन्हींपकी कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेले गुण किंवा बॅण्डस्, त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., लघु संशोधन अहवाल, प्रकाशित झाला असल्यास शोधनिबंधांच्या प्रती, तज्ज्ञांची शिफारसपत्रे, ट्रान्सक्रिप्ट्स् व कार्य अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच, अर्जदाराने पूर्ण झालेल्या अर्जाची िपट्र घेऊन त्याबरोबर वरील कागदपत्रांच्या प्रती स्वतंत्रपणे विद्यापीठाकडे टपालाने किंवा आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेने जमा करावीत.

निवड प्रक्रिया : अर्जदाराची विषयातील गुणवत्ता व त्याची संशोधनातील आवड लक्षात घेऊन निवड समितीकडून त्याची अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत ई-मेलने कळवले जाईल.

अंतिम मुदत : या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०१६ आहे.

महत्त्वाचा दुवा :  www.zef.de

itsprathamesh@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 1:02 am

Web Title: scholarships university in all over world
टॅग : Scholarships
Next Stories
1 नोकरीची संधी
2 यूपीएससीची तयारी : सामाजिक न्याय
3 एमपीएससी मंत्र : मराठी व इंग्रजीची तयारी
Just Now!
X