केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत असणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संपर्कविषयक राष्ट्रीय परिषदेद्वारा देण्यात येणाऱ्या रजत जयंती विज्ञान सुसंवादक फेलोशिपसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
फेलोशिपची संख्या : या फेलोशिप योजनेअंतर्गत उपलब्ध फेलोशिपची संख्या २० आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, कृषी, माहिती तंत्रज्ञान, मास कम्युनिकेशन यासारख्या विषयातील पदवी अथवा पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय ३१-१२-२०१३ रोजी ३५ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट महिला उमेदवारांसाठी ५ वर्षांनी शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया :  अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्या आधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल. विज्ञान सुसंवादकांना प्रामुख्याने शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने उच्च असणाऱ्या आणि निवडक वैज्ञानिक संस्था, विद्यापीठे आणि वरिष्ठ विज्ञान सुसंवादकाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित स्वयंसेवी संस्था यामधील सृजनात्मक कामाला सहाय्य आणि प्रोत्साहन देण्यासाठी समन्वय-संवादकाचे काम करावे लागेल.
फेलोशिपचा कालावधी व तपशील : वरील फेलोशिपचा कालावधी १ वर्षांचा असेल. त्यादरम्यान निवड झालेल्या संवादकांना दरमहा १२००० रु. फेलोशिप देण्यात येईल. संबंधित विषयात पीएच.डी. पात्रताधारकांसाठी फेलोशिपची राशी दरमहा १६००० रु. असेल. याशिवाय सुसंवादकांना ३०००० रु. वार्षिक अनुषंगिक खर्च व १५००० रु. वार्षिक प्रवासभत्ता देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ६६६.२ि३.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज विभागप्रमुख, (एनसीएसटीसी), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, तंत्रज्ञान भवन, नवीन मेहरोली रोड, नवी दिल्ली ११००१६ या पत्त्यावर १५ सप्टेंबर २०१३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.