स्वातंत्र्यानंतर देशाची पुनर्बाधणी करताना पं. जवाहरलाल नेहरूंनी जी ध्येयधोरणं डोळ्यासमोर ठेवली होती, त्यामधील एक महत्त्वाचं धोरण म्हणजे देशात वैज्ञानिक आणि तांत्रिक कौशल्य असणाऱ्या व्यक्तींची एक मोठी फळी तयार करणं. वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती केल्याशिवाय आपला देश पुढे जाऊ शकणार नाही, हे त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणून देशात विज्ञान संशोधन संस्था उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी मोलाचं कार्य केलं. विज्ञानाचा प्रसार सामान्य लोकांपर्यंत व्हावा, असाही नेहरूंचा आग्रह असे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं ही त्यावेळची मोठी गरज होती. कदाचित या साऱ्यांमधूनच आपल्या देशात विज्ञान केंद्र आणि विज्ञान संग्रहालयं उभारण्याच्या चळवळीला चालना मिळाली, असं म्हणता येईल.
विज्ञान हे केवळ वैज्ञानिक संशोधन संस्था, विद्यापीठं आणि महाविद्यालयं यांच्यापुरतं सीमित न राहता जनसामान्यांपर्यंत रंजकेतेनं पोहोचावं हा विज्ञान संग्रहालयाचा उद्देश असतो. देशातलं पहिलं विज्ञान संग्रहालय १९५४ साली राजस्थानमध्ये बिट्स पिलानीच्या आवरात सुरू झालं. हे विज्ञान संग्रहालय सुरू करण्यात प्रसिद्ध उद्योगपती जी. डी. बिर्ला यांचा पुढाकार होता. या विज्ञान संग्रहालयात कारखान्यांमधून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या औद्योगिक प्रक्रिया प्रदíशत करण्यात आल्या होत्या. कारखान्यांमधून वापरण्यात येणाऱ्या यंत्रांच्या प्रतिकृतीसुद्धा तेथे ठेवण्यात आल्या होत्या. विज्ञान संग्रहालयाच्या माध्यमातून लोकशिक्षण देण्याच्या या पहिल्यावहिल्या प्रयत्नांनी प्रेरित होऊन सुप्रसिद्ध पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ प्रा. कृष्णन यांनी दिल्लीत १९५७ साली आवारात एक विज्ञान संग्रहालय सुरू केलं. सर्वसामान्य लोकांना विज्ञानाची गोडी लागावी अशा तऱ्हेने या संग्रहालयाची मांडणी करण्यात आली होती. या संग्रहालयात वेगवेगळ्या प्रक्रिया प्रत्यक्षात करून दाखवणाऱ्या अनेक त्रिमितीय प्रतिकृतींचा समावेश होता. त्याचबरोबर या संग्रहालयात सर्वसामान्यांच्या कुतूहलाचा विषय असलेल्या वेगवेगळ्या खनिजांचा आणि स्फटिकांच्या प्रतिकृतींचाही समावेश होता. विशेष म्हणजे या सगळ्याबरोबर या विज्ञान केंद्रात तारांगणसुद्धा होतं. हे विज्ञान संग्रहालय अल्पावधीतच लोकांमध्ये प्रसिद्ध झालं आणि या संग्रहालयाला भेट देणाऱ्या लोकांची गर्दी इतकी वाढली की, त्यामुळे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीच्या संशोधन कार्यात अडथळे यायला लागले. त्यामुळे हे विज्ञान संग्रहालय बंद करण्याचा निर्णय नाइलाजाने घ्यावा लागला. पण यातून विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं विज्ञान संग्रहालय हे एक प्रभावी माध्यम आहे, ही गोष्ट मात्र सिद्ध झाली.
१९५९ साली कोलकता इथे बिर्ला औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय सुरू झालं. या विज्ञान संग्रहालयात त्रिमितीय प्रतिकृतींच्या मदतीने अनेक औद्योगिक प्रक्रिया सोप्या भाषेत आणि रंजकेतेने स्पष्ट केल्या होत्या.
१९६० च्या दशकात बंगळूरू इथे विश्वेश्वरय्या विज्ञान संग्रहालयाची स्थापना झाली. या विज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं होतं. सुरुवातीच्या काळात विज्ञान संग्रहालयांचे स्वरूप हे केवळ वैज्ञानिक प्रतिकृती प्रदíशत करण्याचं ठिकाण असे होते. या संग्रहालयांमधून प्रामुख्याने औद्योगिक प्रक्रिया स्पष्ट करण्यावर भर असायचा. पण हळूहळू विज्ञान संग्रहालयाचं रूपांतर विज्ञान केंद्रामध्ये होऊ लागलं. या विज्ञान केंद्रांमधून विज्ञान शिक्षणाविषयी अनेक उपक्रम राबवले जाऊ लागले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रयोगांचा समावेश असलेली व्याख्याने, फिल्म शोज, विज्ञान प्रश्नमंजूषा इत्यादी कार्यक्रमांचा समावेश केला गेला. असे विज्ञान शिक्षणविषयक उपक्रम राबवणारं पहिलं केंद्र म्हणून कोलकात्याच्या बिर्ला विज्ञान संग्रहालयाचा उल्लेख करता येईल. विज्ञान केंद्रात प्रदíशत केल्या जाणाऱ्या प्रतिकृतींमध्ये आणि विषयांमध्ये वैविध्य आलं. बिर्ला विज्ञान केंद्रातले संदेशवहन, वाहतूक व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक्स, धातू विज्ञान हे विभाग आणि कोळशाच्या खाणीतला प्रत्यक्ष अनुभव देणारं दालन अनेकांच्या पसंतीला उतरलं. थोडक्यात, विज्ञान केंद्राचा वापर रंजकतेने आणि अनौपचारिक पद्धतीने विज्ञान शिक्षण देण्याची सुरुवात कोलकात्याच्या बिर्ला विज्ञान केंद्रापासून झाली, असं म्हणावं लागेल.  
मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राची सुरुवात अगदी लहान स्वरूपात १९७७ साली झाली. त्यावेळी केवळ एका दालनात ‘प्रकाश आणि दृष्टी’ या विषयावर अनेक प्रयोग मांडले होते. या प्रयोगांमध्ये प्रकाशाचे गुणधर्म, आपल्या डोळ्यांची रचना, दृष्टीदोष, िभग आणि आरसे यांचं कार्य, दृष्टीभ्रम इत्यादी विषयांवर प्रयोग आणि प्रतिकृती होत्या. याखेरीज विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन तेव्हा केलं जायचं. नेहरू विज्ञान केंद्राचं ‘फिरतं विज्ञान प्रदर्शन’ त्यावेळी अनेकांना आवडायचं. १९७९ साली ‘सायन्स पार्क’ ही अभिनव संकल्पना नेहरू विज्ञान केंद्राने साकारली. सायन्स पार्कमध्ये मोकळ्या मदानात, हिरवळीवर उभारलेल्या मोठय़ा आकाराच्या विज्ञान प्रतिकृती आणि विज्ञान प्रयोगांचा आनंद मुलं घेऊ लागली. ‘सायन्स पार्क’मुळे विज्ञान शिक्षण वर्गाच्या चार िभतींच्या बाहेर आलं आणि मुलं अगदी हसत-खेळत विज्ञान शिकायला लागली, विज्ञानाचा आनंद घ्यायला लागली. खेळता खेळता विज्ञान शिकण्याच्या या अभिनव पद्धतीचं कौतुक अमेरिका, कॅनडा, फ्रान्स अशा विकसित देशांनीही केलं आणि हळूहळू ही संकल्पना इतकी आवडली की जगभरातल्या विज्ञान केंद्रांचं ‘सायन्स पार्क’ हे एक अविभाज्य भाग बनलं.
बदलत्या कालानुरूप नेहरू विज्ञान केंद्रानेही भरपूर उपक्रम राबवायला सुरुवात केली. वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी नेहरू विज्ञान केंद्रात विज्ञान प्रयोग वर्गापासून ते रॉकेट बनवणं, रोबोटिक्स, टेलिस्कोप तयार करणं अशा विविध विषयांवर कार्यशाळांचं आयोजन करण्यात येतं. या विविध कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थी विज्ञानाचे धडे गिरवतात आणि विज्ञानाचं दैनंदिन जीवनातलं उपयोजन प्रत्यक्ष प्रयोग करून अनुभवतात. देशातल्या विविध विज्ञान केंद्रांमधून विज्ञानविषयक अद्ययावत ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी क्लायमेट चेंजपासून ते नॅनोटेक्नॉलॉजीपर्यंत अनेक विषय हाताळले जातात. विज्ञानाचा प्रसार हा केवळ शहरांमधून न होता खेडोपाडीसुद्धा झाला पाहिजे, या दृष्टीनेही नेहरू विज्ञान केंद्रातर्फे ‘मोबाइल व्हॅन’सारखे उपक्रम राबवले जातात.   
देशातल्या आणि देशाबाहेरच्या एकूण पन्नासहून जास्त विज्ञान केंद्रांचं नियंत्रण आणि समन्वय राखण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतली ‘नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझिअम्स’ ही संस्था कार्यरत आहे. देशभरात सुमारे १८ विज्ञान केंद्रं या संस्थेमार्फत स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.  
विज्ञान शिक्षण हे केवळ पाठय़पुस्तकातून किंवा एखाद्या वर्गाच्या चार िभतींमधून होत नाही, असा मतप्रवाह तयार होतो आहे. पण यासाठी विज्ञान शिक्षणाचे अभिनव पर्याय निर्माण होण्याची गरज आहे. मला वाटतं की, विज्ञान केंद्रांमध्ये विज्ञान शिक्षणाची ही गरज पूर्ण करण्याचं सामथ्र्य नक्की आहे. म्हणूनच देशात विज्ञान केंद्रांचं एक मोठं नेटवर्क तयार करून विज्ञान शिक्षणाला पोषक वातावरण निर्माण करणं, विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणं आणि त्यांना मूलभूत विज्ञान शिक्षणाकडे प्रेरित करणं या दृष्टीने ‘नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझिअम्स’तर्फे प्रयत्न केले जात आहेत.                                                
 (लेखक नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझिअम्सचे उपमहासंचालक आहेत.)
(अनुवाद, समन्वयक : हेमंत लागवणकर)