भारतीय विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणासाठी खाली नमूद केल्यानुसार शिष्यवृत्तीच्या अनेक संधी
उपलब्ध आहेत-

लॉरेल युनेस्को स्कॉलरशिप्स
खास महिलांसाठी असणारी ही शिष्यवृत्ती युनेस्को व इंडियन नॅशनल कमिशन फॉर को-ऑपरेशन यांच्या मदतीने विद्यार्थिनींच्या विज्ञान विषयांतर्गत अभ्यासक्रमासाठी देण्यात येते.
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थिनींनी बारावीची परीक्षा विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांची शैक्षणिक कारकीर्द उत्तम असावी. अर्जदारांचे वय १९ वर्षांहून अधिक नसावे.
शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : योजनेअंतर्गत ५० विद्यार्थिनींना अडीच लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : http://www.foryoungwomeninscience.com.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाची ऱ्होडस् स्कॉलरशिप
ही शिष्यवृत्ती इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे जागतिक स्तरावरील उच्च शिक्षणासाठी देण्यात येते. या योजनेअंतर्गत विभिन्न देशांतील विद्यार्थ्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात उपलब्ध असणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी देण्यात येते.
उपलब्ध शिष्यवृत्तीची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत १४ देशांतील ८४ विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवास खर्चाशिवाय वार्षिक १३,३९० डॉलर्सची शिष्यवृत्ती देण्यात येते.
आवश्यक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांचे वय १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असायला हवे. अधिक माहितीसाठी संपर्क : rhodeshouse.ox.ac.vk या संकेतस्थळाला
भेट द्यावी.