आशिया खंडामधील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून जागतिक स्तरावर मान्यता पावलेले ‘नॅॅशनल युनिव्हर्सटिी ऑफ सिंगापूर’ (एनयूएस) हे विद्यापीठ मूलभूत विज्ञानांसाठी, आंतरविद्याशाखीय संशोधनांसाठी आणि उपयोजित संशोधनात अग्रेसर आहे. या विद्यापीठाच्या एकात्मिक विज्ञान व अभियांत्रिकी या विभागांच्या वतीने वर उल्लेखलेल्या क्षेत्रांमध्ये अद्ययावत संशोधन व्हावे, याकरता पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती देण्यात येते. एकात्मिक विज्ञान व अभियांत्रिकी या विद्याशाखांशी संबंधित पदव्युत्तर पदवी प्राप्त असणाऱ्या अर्जदारांना पीएच.डी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी १५ मे २०१६ पूर्वी अर्ज करता येतील.
शिष्यवृत्तीबद्दल : सिंगापूरमध्ये असलेले ‘नॅॅशनल युनिव्हर्सटिी ऑफ सिंगापूर (एनयूएस)’ हे विद्यापीठ सिंगापूरमधील सर्वात मोठे स्वायत्त व शासकीय विद्यापीठ आहे. १९०५ साली स्थापना झालेले हे विद्यापीठ सिंगापूरमधील जुनेजाणते विद्यापीठ तर आहेच, त्याशिवाय आशिया खंडामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे. शैक्षणिक क्षेत्रातील क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंग्ज आणि टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग्ज, या दोन्ही संस्थांनी गेली अनेक वष्रे या विद्यापीठाला आशिया खंडामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून गौरवले आहे. ‘क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंग्ज’नुसार (२०१५-१६ ) या वर्षी एनयूएस हे जगातील बारावे तर ‘टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग्ज’च्या यादीत या विद्यापीठाला जगात २६वे स्थान प्राप्त झाले आहे. प्रत्येक विषयाच्या भरपूर उपशाखा आणि त्यामध्ये सुरू असलेले दर्जेदार व अद्ययावत असे संशोधन, उत्कृष्ट प्राध्यापकवर्ग, सुसज्ज अशा आधुनिक संगणकीकृत प्रयोगशाळा आणि प्रत्येक पदवीनंतर विद्यार्थ्यांना जगातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम करण्याची मिळणारी संधी यामुळे हे विद्यापीठ जागतिक दर्जाचे बनले आहे. एनयूएस विद्यापीठात विविध विभागांचे पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम राबवण्यात येतात. संबंधित शिष्यवृत्ती ही विद्यापीठाच्या एकात्मिक विज्ञान विभागांतर्फे आणि अभियांत्रिकी विभागांच्या वतीने (NUS Graduate School for Integrative Sciences and Engineering) विद्यार्थ्यांना बहाल करण्यात येते. आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता या विभागाकडे आकृष्ट करता यावी याकरता विद्यापीठाने ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या पीएच.डी. संशोधनाचा कालावधी चार वर्षांचा असेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून या चार वर्षांसाठी मासिक भत्ता दिला जाईल तसेच पीएच.डी.च्या कालावधीकरता संपूर्ण शिकवणी शुल्क दिले जाईल. शिष्यवृत्तीधारकाला दरमहा तीन हजार सिंगापूर डॉलर्सएवढा निवासी भत्ता व वेतन भत्ता देण्यात येईल. याव्यतिरिक्त त्याला विमा भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या इतर सुविधा देण्यात येतील. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीत त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. शिष्यवृत्तीधारकाला ही शिष्यवृत्ती पीएच.डी. संशोधन अभ्यासक्रमाच्या केवळ चार वर्षांसाठीच उपलब्ध असेल. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणाकडेही हस्तांतरित करता येणार नाही तसेच अध्र्यातच त्याला ही शिष्यवृत्ती सोडून देता येणार नाही. त्याला पीएच.डी. पूर्ण करणे बंधनकारक राहील.
आवश्यक अर्हता : ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. तो ज्या विषयात पीएच.डी. करणार असेल त्या विषयातील किंवा त्या विषयाशी संबंधित पदव्युत्तर पदवी अर्जदाराकडे असावी. पदव्युत्तर स्तरावर अर्जदाराकडे किमान उच्च द्वितीय श्रेणी असणे विद्यापीठाला अपेक्षित आहे. असे असले तरीही या शिष्यवृत्तीसाठीची चुरस लक्षात घेता अर्जदाराची पदवी-पदव्युत्तर स्तरावरील शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असली आणि अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधन अनुभव असल्यास त्याला पीएच.डी.साठी प्राधान्य दिले जाते. अर्जदाराने अर्जासोबत संशोधनाचे किंवा अनुभवाचे प्रशस्तिपत्र जोडावे. आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी जीआरई व टोफेल या परीक्षा दिलेल्या असाव्यात. या शिष्यवृत्तीसाठी जीआरई व टोफेल या परीक्षांचे गुण विद्यापीठाला कळवणे अर्जदारावर बंधनकारक आहे. उमेदवाराचे इंग्रजीवर प्रभुत्व असावे. अर्जदाराने त्याच्या संशोधनाच्या विषयाची उपलब्धता विद्यापीठाच्या वेबसाइटवर तपासावी.
अर्ज प्रक्रिया : या शिष्यवृत्तीसाठी उमेदवाराने त्याचा अर्ज विहित नमुन्यात ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या विद्यापीठाच्या वेबसाइटवर अंतिम मुदतीपूर्वी जमा करावा.
अर्ज जमा करताना उमेदवाराने अर्जासोबत त्याचे जीआरईचे गुण, तसेच टोफेल किंवा आयईएलटीएस या दोन्हींपकी कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेले गुण किंवा बॅण्डस्, त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही.,लघु संशोधन अहवाल, प्रकाशित झाले असल्यास शोधनिबंधांच्या प्रती, तज्ज्ञांची शिफारसपत्रे, ट्रान्सक्रिप्ट्स् व कार्य अनुभवाचे प्रशस्तिपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने पूर्ण केलेल्या अर्जाची िपट्र घेऊन त्याबरोबर वरील सर्व कागदपत्रांच्या प्रती स्वतंत्रपणे विद्यापीठाकडे टपालाने किंवा आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेने जमा करावीत.
निवड प्रक्रिया : अर्जदाराची संबंधित विषयातील गुणवत्ता व त्याची संशोधनाची आवड लक्षात घेऊन निवड समितीकडून त्याची अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत ई-मेलद्वारे कळवले जाईल. उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम अधिकार विद्यापीठाकडे असेल.
अंतिम मुदत : या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १५ मे २०१६ आहे.
महत्त्वाचा दुवा :
http://www.nus.edu.sg
itsprathamesh@gmail.com