इंडियन काऊन्सिल ऑफ सोशल सायन्स, नवी दिल्लीतर्फे सामाजिक विज्ञान व अर्थशास्त्र विषयांतर्गत विशेष उल्लेखनीय संशोधनपर काम करणाऱ्या व्यक्तींना अमर्त्यसेन-सामाजिक संशोधन पुरस्कार-२०१३ दिले जातात. या योजनेअंतर्गत खाली नमूद केल्यानुसार पात्रताधारक संशोधकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुरस्कारांची संख्या- या योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या संशोधनपर पुरस्कारांची संख्या १० आहे.
समाविष्ट करण्यात आलेले विषय – अमर्त्यसेन पुरस्कार योजनेअंतर्गत अर्थशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, समाजशास्त्र, सामाजिक कार्य, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, लोक-प्रशासन, भूगोल, शैक्षणिक व्यवस्थापन, विधीविषयक हक्क, मानव अधिकार, इतिहास, सांस्कृतिक संदर्भ व अभ्यास यासारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
निवडपद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक संशोधकांना सादरीकरण व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची या पुरस्कारांसाठी अंतिम निवड करण्यात येईल.
पुरस्कारांची संख्या व रक्कम – निवड झालेल्या १० संशोधक उमेदवारांना ‘अमर्त्य सेन पुरस्कारा’अंतर्गत १० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. याशिवाय त्यांना इंडियन काऊन्सिल ऑफ सोशल सायन्सतर्फे स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील –  योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ सोशल सायन्सच्या http://www.icssr.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
प्रवेशिका पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख :
तपशीलवार व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणाऱ्या प्रवेशिका दि मेंबर सेक्रेटरी, इंडियन काऊन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, अरुणा असफअली मार्ग, नवी दिल्ली या पत्त्यावर ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात.
अर्थशास्त्र, समाजिक विज्ञान व संबंधित विषयात विशेष उल्लेखनीय संशोधनपर काम करणाऱ्या संशोधकांना या प्रतिष्ठित पुरस्कार योजनेचा विचार करता येईल.