१६ सप्टेंबरच्या ‘करिअर वृत्तान्त’मध्ये ‘अभियांत्रिकीचे वर्ष वाया जाते तेव्हा’ हा एका विद्यार्थ्यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. अभियांत्रिकी शिक्षणातील एटीकेटी आणि वायडी या व्याधीने अभियांत्रिकीचे असंख्य विद्यार्थी किती त्रस्त झाले आहेत, याचे सोदाहरण चित्र त्यातून स्पष्ट झाले होते. उद्भवलेल्या या परिस्थितीच्या कारणांची व त्यावरील उपायांची चर्चा करणारा हा प्रतिसादात्मक लेख..
एकंदरीतच आपल्या देशात प्राथमिक, माध्यमिक/ उच्च माध्यमिक व (अभियांत्रिकी) पदवी/ पदविका या शिक्षणपद्धतीचा साकल्याने व सलगतेने विचार केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्याकडील  शिक्षणपद्धतीमध्ये  दहावी/ बारावीपर्यंत पाठांतर या एकाच गोष्टीवर सर्वाधिक भर दिला जातो. निरीक्षण, कुतूहल, जिज्ञासा, शंका येणे, कल्पना सुचणे, प्रश्न उद्भवणे व त्यांचे योग्य समाधान होणे, विषय समजणे, त्यावर अधिक विचार करणे, सखोल व बहुआयामी विचार करणे, तर्काने विचार करणे, छोटय़ा छोटय़ा प्रयोगांतून शिकणे, छोटे प्रकल्प स्वत: तयार करून मिळवलेले ज्ञान पक्के करणे ही एक गोडी निर्माण करून सहजपणे ज्ञान संपादन करण्याची योग्य पद्धत होय. शांतिनिकेतन हा आपल्याच देशातला यशस्वी प्रयोग. आनंदनिर्मित शिक्षण आणि विकास ह्य़ा यात जोपासलेल्या हेतूला आजही सार्वत्रिक रूप आलेले नाही. राजकीय व सामाजिक इच्छाशक्तीचा अभाव व दूरदृष्टीची वानवा ही यामागची कारणे आहेत.
जिथे बुद्धीचा सर्वागीण विकास करण्याचा विचार होतो तिथे तो काही मोजक्या शिक्षकांच्या शिक्षकीतून धोरण म्हणून वरच्या स्तरांवर हा विचार बिलकूल आढळून येत नाही. अभ्यासक्रम तयार करणारे तथाकथित शिक्षणतज्ज्ञ अभ्यासक्रमात न पेलणारे वरच्या इयत्तांचे अभ्यासक्रम खालच्या इयत्तेत अंतर्भूत करतात. ते शिकवायला जाणकार, अनुभवी व कळकळीचे शिक्षक नसतात, असलेल्या शिक्षकांना आपल्या अज्ञानाचे काय करावे ते सुचत नाही, त्यामुळे परत एकदा विद्यार्थ्यांपुढे न समजणारे विषय व अभ्यासक्रम समजून न घेता केवळ पाठ करण्याशिवाय व त्याआधारे मार्क मिळवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही.
परीक्षापद्धतीमध्येही परीक्षकांना तपासायला सोपे जावे म्हणून अनेकदा बदल केले जातात. बहुपर्यायी प्रश्न विचारणे, जोडय़ा जुळवा, खरे-खोटे ओळखा किंवा गाळलेल्या जागा भरा या व अशा प्रश्नांमुळे लॉटरी पद्धत बऱ्याच विद्यार्थ्यांकडून वापरली जाते किंवा पाठांतर या एकमेव गोष्टीचा अवलंब अभ्यासात केला जातो. या प्रश्नांना लिहिलेली उत्तरे पेपर तपासायला, मार्क्‍स द्यायला सोपी असतात, पण त्यामध्ये विद्यार्थ्यांला त्या विषयाचे आकलन किती झाले आहे ते कळण्याची शक्यता फारशी नसते. वारंवार केलेले परीक्षापद्धतीतले बदल, मार्क्‍स/ ग्रेड्स/ क्रमांक यांना आलेले अनन्यसाधारण महत्त्व, पालकांमधली अलिखित पण जीवघेणी स्पर्धा, शिक्षकांच्या खासगी व प्रचंड नफेखोरीच्या शिकवण्या, शिक्षकांची नोकरीबाबतची अनिश्चितता व मिळणारे अल्प वेतन, कंत्राटी शिक्षकांची वाढती संख्या या सर्वाची परिणती एकाच गोष्टीत होते ती म्हणजे विद्यार्थ्यांचे फक्त अंध पाठांतर.
सध्या इंग्रजी माध्यमाचा जोर भरपूर वाढला आहे. मराठी निम्न/ उच्च मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय सधन कुटुंबे आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून कृतार्थ होतात. घरात व व्यवहारात भाषा मराठी व शाळेत, अभ्यासात इंग्रजी अशा खेचाताणीत त्या लहान विद्यार्थ्यांचे हालच होतात. एकतर पालकांना वेळ नसणे, गम्य नसणे किंवा क्षमताच नसणे अशा अनेकविध कारणांमुळे पाल्याला शाळेतील शिक्षकांच्या खासगी शिकवण्यांमध्ये घालणे किंवा ते शक्य नसेल तर सतत घोकंपट्टी करून घेणे हा पर्यायच वापरला जातो. खासगी शिकवण्या घेणारेही बहुतांश वेळा पाठांतरच करून घेतात, कारण त्यांनाही सर्व विषय येतातच अशी बाब नसते.
थोडक्यात घरीदारी, शाळेत, शिकवणीवर्गात घोकंपट्टी/ पाठांतर, तेही न समजलेल्या विषयांचे, यावर जोर दिला जातो. याचे दुष्परिणाम त्या विद्यार्थ्यांला पुढे भोगावे लागतील याचा विचार करायची कोणाची इच्छा नसते व तेवढी दूरदृष्टीही नसते. बरे, हे न समजलेले भरताड विषय, अगदी गणित, विज्ञान यांसकट, मेंदूच्या त्या स्मरणपेटीत कोंबून कोंबून भरलेले असतात, ज्याचा त्याला कधीच पुढे उपयोग होणार नसतो. ‘वर्षभर घोका आणि परीक्षेच्या वेळी ओका’ यामुळे बऱ्याच वेळा ही स्मरणपेटी थोडीफार रिकामी होत असावी. पण मग ही पेटी पुढच्या वर्षी अधिक गोष्टींनी (कचराच तो) भरायची, यातच दहावी/ बारावी उत्तीर्ण झाल्याचे सुख प्राप्त होते.
सारांश, दहावी/ बारावीमध्ये पाठांतर शक्ती व त्याआधारे मिळवलेले गुण हे बुद्धी विकसित झाल्याचे लक्षण मानता येत नाही. पाठांतर आवश्यक आहे, पण वरील ज्ञानप्रक्रिया झाल्यानंतर ते सहजपणे होणारे पाठांतर असावे. स्वाभाविकपणे अभियांत्रिकी अभ्यासक्रम (अथवा कोणतेही पदवी अभ्यासक्रम) यांना प्रवेश घेतला की, पाठांतर हा गुण मागे पडतो व बुद्धीचे अन्य पलू आवश्यक ठरतात. व्हीजेटीआय या संस्थेतील माझा अनुभव असा की, अत्यंत हुशार समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सोप्या सोप्या सामान्य प्रश्नांची उत्तरे यायची नाहीत. सोपी उदाहरणे सोडवता यायची नाहीत. वर्गात जे शिक्षक तयार नोट्स देतील ते शिक्षक यांचे प्रिय शिक्षक. याचा दोष पूर्वीच्या शिक्षणपद्धतीमध्ये पाठांतर या एकाच पलूवर दिलेला अतोनात भर व त्या आधारे मिळालेल्या यशाला दिलेली राजमान्यता. १०-१२ वर्षांत जर हाच गुण जोपासला गेला असेल तर पदवी/ पदविकेला येईपर्यंत अनेक दृष्टीने अविकसित बुद्धी असलेला हा विद्यार्थी बदलणार कसा, हा खरा प्रश्न आहे व जर त्याला पाठांतर हीच एक जादूची कांडी स्वानुभवाने माहीत असेल तर तो तीच वापरणार. म्हणूनच प्रथम सत्रात अनेकजण गटांगळ्या खातात हे अन्य अनेक कारणांमधील मुख्य कारण आहे. ज्यांच्या बुद्धीचे  अन्य पलू थोडे फार विकसित झालेले असतात ते मात्र पुढेही बऱ्या मार्कानी उत्तीर्ण होतात. तेव्हा एटीकेटी किंवा वायडी अशा गोष्टींच्या मुळाशी जायचे असेल तर त्या आधीच्या शिक्षणपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे.
योग्य शिक्षक/ प्राध्यापकांची उणीव
अजून एका गोष्टीचा ऊहापोह करणे योग्य राहील. केवळ पाठांतरगुणात विकास पावलेला हा विद्यार्थी जेव्हा अभियांत्रिकी पदवी किंवा पदविकेला प्रवेश घेतो तेव्हा या विद्यार्थ्यांमध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये काही बदल घडवले पाहिजेत, अविकसित पलूंचा विकास केला पाहिजे, निदान त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत असे महाविद्यालयाचे व्यवस्थापक, संचालक/ प्राचार्य व शिक्षक/ प्राध्यापक यांना मनापासून वाटले पाहिजे. त्यांनाही रोगाची खरी कारणे माहीत असतात ना? मग आपापल्या स्तरांवर त्यांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक नाही का? प्राध्यापकांनी विषयाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा सर्वागीण विकास कसा करता येईल याबाबतीत विचारपूर्वक काही प्रयोग राबवायला नको का? आपला विषय अधिक रोचक, रंजक व जिज्ञासा निर्माण करणारा कसा मांडता येईल. विद्यार्थ्यांनी शिकण्यातील आव्हाने स्वीकारावीत, कूटप्रश्न सोडवावेत- निदान त्या दिशेने प्रयत्न करावेत- त्यांचा नवे नवे शिकण्यातील रस वाढेल व त्याबरोबरच आत्मविश्वास वाढेल या दृष्टीने काही प्रयोग करावेत याबाबत प्राध्यापकांना मुभा असते. पण असे काही घडत नाही. आपल्या विषयाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांचा आंतरिक विकास थोडय़ाफार प्रमाणात करता येऊ शकतो, हीच संकल्पना मुळात बहुसंख्य शिक्षकांना ठाऊक नसते. कोणीतरी जाब विचारेल म्हणून पाटय़ा टाकणाऱ्या प्राध्यापकांची संख्या कमी नाही. त्यात सहाव्या वेतन आयोगाने पगार चांगला केला आहे. तेव्हा जमेल तशी नोकरी टिकवायची, अधिकाऱ्यांची खुशामत करायची, जमेल तसे शिकवायचे आणि पगार पदरात पाडून घ्यायचा.
यालाही अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या अभियांत्रिकीमधील शिक्षकीसाठी उमेदवारांपकी बरेच जण हा पवित्र पेशा आहे, यामध्ये आपल्याला आदर्श शिक्षक म्हणून घडायचे आहे व त्याच प्रवासात विद्यार्थ्यांच्या मानस/ बौद्धिक जगतात प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे, अशा विचारांनी येतात. त्याचे उत्तर दुर्दैवाने ‘फार थोडे’ असे आहे. थोडाफार सन्मान/ प्रतिष्ठा, भरपूर सुट्टय़ा, पदाचा मान, आíथकदृष्टय़ा बऱ्यापकी पगार, विद्यार्थ्यांवर वापरण्यासाठीचा मोठा अधिकार, शिकवण्याबाबत कोणाचाही नसलेला हस्तक्षेप व थोडीफार शिकवण्याची हातोटी असेल तर खाजगी शिकवण्या करून अल्पावधीत मिळणारा भरपूर पसा या गोष्टींचा विचार अधिक असतो. दुसरे काही मिळत नाही म्हणूनही ह्या पेशाकडे वळणाऱ्यांची संख्या कमी नाही. निवड समिती ‘सदर उमेदवाराला शिकवता येते का?’ किंवा ‘शिकायची आवड तरी आहे का?’ हे बघायचे सोडून बाकी सर्व तपासते. बहुसंख्य कंत्राटी शिक्षक नेमणे व ते ११ महिन्यांनी वा आपल्याला वाटेल तेव्हा बदलाने, कोणालाही कोणताही विषय देणे हे उद्योग तर संस्थाचालक व प्राचार्य/ संचालक/ विभागप्रमुख सतत करीत असतात. हे सार्वत्रिक चित्र आहे.
भरती केलेले असे अननुभवी व शिकवण्यास अनुत्सुक शिक्षक जेव्हा शिकवायला सुरुवात करतात तेव्हा जर आपल्या शिकवण्याविषयी वा अज्ञानाविषयी विद्यार्थ्यांनी तक्रार केलीच तर ती करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात दमदाटी करणे, त्यांना अंतर्गत गुण कमी देणे वा अन्य छळप्रकार वापरणे अशा गोष्टी सुरू होतात. जोडीला आपली खासगी शिकवणी लावणाऱ्या विद्यार्थ्यांवर मात्र मेहेरनजर दाखवली जाते. आणि विशेष म्हणजे कोणताही अनुभव नसताना हे परीक्षक होतात व जो विषय आपल्यालाच कळला नाही व जर आपण त्या परीक्षेला बसलो तर पास होऊ ही ज्यांना खात्री नाही ते शेकडो विद्यार्थ्यांचे पेपर तपासतात. त्यामुळे चांगले विद्यार्थीही नापास होतील यात नवल ते काय?
शालेय शिक्षणात निदान बी.एड./ एम.एड. करावे लागते, शिकवावे कसे याची प्रात्याक्षिके घोटून घेतली जातात. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये असे काही नसते. शैक्षणिक पदवीची अर्हता असली की संपले. सुमारे दीड लाख प्रवेशसंख्या प्रत्येकी पदवी व पदविकेकडे आहे. तेव्हा एवढय़ा मोठय़ा संख्येला आवश्यक असे शिक्षक प्रशिक्षित करणे हे महत्त्वाचे काम नाही का? नवीन प्राध्यापक वर्गात जातो व त्याला येईल तसे तो बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच न समजलेला विषय तो कसाबसा मांडतो, ना कोणा अनुभवी प्राध्यापकाचे मार्गदर्शन मिळते, ना तशी त्याला इच्छा असते. काही दिवस असे गेल्यानंतर त्याला वाटते की बरे आहे, आपण शिकवतो तीच एकमेव खरी, योग्य पद्धत. फीडबॅक हा प्रकार नसतो. आणि असलाच तर तो आपल्याला हवा तसा मिळवता येतो याचे ज्ञान त्याला अल्पावधीतच झालेले असते. परीक्षक बनणे व परीक्षेचे काम करणे यातही योग्य मार्गदर्शन मिळण्याची वा मिळवण्याची आवश्यकता नसते. पोहता न येणाऱ्याला पाण्यात ढकलले की तो जीव वाचवायला हातपाय झाडतो व त्यात तो जीव वाचवण्यात यशस्वी झालाच तर त्याचे ते हातपाय झाडणे हेच खरे पोहणे असा निष्कर्ष काढणे जसे चूक तसेच त्या नवीन प्राध्यापकाच्या शिकवण्याबद्दल म्हणता येईल.
बरे, प्राध्यापकांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे, रिफ्रेशर कोस्रेस म्हणजे पगार- पदोन्नती- स्वयंमूल्यमापन इ. गोष्टींशी निगडित असलेले उपक्रम. त्यामुळे स्वत:मध्ये ज्ञानविषयक सुधारणा व नवीन काही शिकणे यापेक्षा केवळ उपस्थिती भरून अटी पूर्ण करणे व अधिकृत प्रमाणपत्र मिळवणे हाच भाग उरतो. तेव्हा आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार? आपला विषय माहीत नाही, त्याचे सखोल ज्ञान व्हावे असा जाणीवपूर्वक प्रयत्न नाही. विषयमांडणी करता करता विद्यार्थ्यांचा आंतरिक विकास करणे तर दूरच राहिले.
अशा वेळी विद्यार्थी आतून निराश होतो. आपण काय करावे हे न सुचून एकतर तो खासगी क्लासेस, महाविद्यालयातील शिक्षकांचे वा अन्य शिकवणी वर्ग लावतो व ते शक्य न झाल्यास मार्क्‍स मिळवण्याचे शॉर्टकट्स शोधतो. खासगी नामवंत क्लासेसमध्ये १००-१२० विद्यार्थी एका एसी रूममध्ये बसवले जातात व त्यांची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करून घेतली जाते. प्रचंड नफा हाच हेतू असणारे लोक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष पुरवतील हा भाबडा विश्वास झाला, आणि दुसरे म्हणजे तिथेही केवळ पाठांतर हाच गुण वाढवला जातो. गणितेसुद्धा पाठ करणारे विद्यार्थी मला आढळले आहेत. तेव्हा या क्लासेसकडून विद्यार्थ्यांचा आंतरिक विकास होण्याची गोष्ट दूरच राहिली. महाविद्यालय, क्लासेस यांमध्ये धावपळ करून विद्यार्थी हैराण होतात. स्वत: अभ्यास कधी करणार आणि कसा करणार हा प्रश्नच आहे. आंतरिक विकास ही गोष्ट तर दूरच राहिली.
माझ्या मते, जीव ओतून आपला विषय अत्यंत चांगल्या प्रकारे शिकवला, विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतला, त्या विषयाचा इतिहास, त्याचे वर्तमानकालीन जीवनातील उपयोग, त्यातील शास्त्रज्ञांची चरित्रात्मक माहिती, सामान्यत्वातून असामान्य असा त्यांचा जीवनप्रवास, त्यात चालू असलेले संशोधन व संभाव्यता आणि प्रत्यक्ष उत्पादन ठिकाणी शक्य असेल तेव्हा भेटी यातून तो विषय सहजपणे कळतोच, पण बुद्धीचे विविध पलू जागे होतात. त्यातून स्वत:लाही आनंद प्राप्त होतो व विद्यार्थ्यांनाही आत्मविकासाचा आनंद मिळतो. पण यासाठी शिक्षकी या पेशाविषयी तीव्र व विशुद्ध अशी तळमळ हवी. आपल्या समíपत भावनेने विद्यार्थ्यांच्या पिढय़ा घडवायला मदत होणार आहेत अशी मनापासून भावना पाहिजे व स्वत:च्या जीवनात आत्मपरीक्षणाची जोडही हवी.
शिकवण्यातील अशा प्रयोगांबरोबर विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची आवड निर्माण व्हावी, नियमित अभ्यासाची सवय लागावी, वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास व छंद या दोन्ही गोष्टींना न्याय मिळेल असे मार्गदर्शन मिळावे यासाठीही प्राध्यापकांनी परिश्रम घेण्याची गरज आहे. तसे विद्यार्थ्यांच्या मनावर पहिल्याच वर्षी िबबवणे महत्त्वाचे आहे. परीक्षेआधी व परीक्षेपुरता अभ्यास हे अभियांत्रिकी अभ्यासक्रमात उपयोगी ठरत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. नियमित थोडा थोडा अभ्यास केल्याने विषय नीट कळतात, रुचतात व पचतात. वेगवेगळ्या कल्पना सुचणे, त्याआधारे उदाहरणे सोडवणे, परिसंवादाची तयारी करण्यास उद्युक्त होणे, छोटे प्रकल्प तयार करणे इ. गोष्टी करायला वेळही मिळतो व तशी मनोभूमिकाही तयार होते.
यासाठी पालकवर्गानेही सजगता ठेवली पाहिजे. पाल्याच्या विकासामधील आपली जबाबदारी ओळखून आपल्यामध्ये बदल घडवले पाहिजेत. त्याला महाविद्यालयात व एखाद्या क्लासमध्ये प्रवेश मिळाला म्हणजे आपले काम झाले, अशी भूमिका योग्य नव्हे. त्याला अभ्यासास योग्य वातावरण मिळवून देणे, त्याचा उत्साह कायम राखणे, त्याने नियमित अभ्यास करण्यासाठी त्याला प्रेमाने व विश्वासाने उद्युक्त करणे, त्याचा विकास योग्य रीतीने होतो आहे की नाही याची परस्परांत चर्चा करणे, योग्य समुपदेशनाची आवश्यकता असेल तर ते वेळीच मिळवून देणे, त्याची संगती योग्य आहे ना यावर लक्ष देणे ही जबाबदारी पालकांचीच आहे. त्याचा अभ्यास तो करील, आपण होम थिएटरचा आस्वाद घेऊ अशी भूमिका पाल्याचेच नुकसान करील. वायडी मिळाल्यावर त्यास आपण किती जबाबदार आहोत याचाही विचार झाला पाहिजे. आम्ही पाहिजे तेवढे पसे ओतले ही भावना अयोग्यच.   
तेव्हा थोडक्यात, म्हणजे समग्र शिक्षणपद्धतीत सुसंगतता, सहज शिक्षणाच्या प्रक्रियेचा अवलंब, विद्यार्थ्यांच्या समग्र आंतरिक विकासाला सर्व स्तरांवर प्राधान्य, अभियांत्रिकी शिक्षकांचे नियमित प्रशिक्षण, त्यांच्या गुणात्मक विकासाकडे अधिकारीवर्गाचे वैयक्तिक लक्ष. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होईल याकडे सर्वानीच लक्ष पुरवणे, त्यांनीही अभ्यासात शिस्त व नियमितपणा अंगी बाणवणे, स्वयंअध्ययनावर भर देणे (वाचन, लिखाण, चिंतन इ.) या मूलभूत गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर उत्तम डोळस व खऱ्या अर्थाने विकसित असे अभियंते उद्योगाला, पर्यायाने देशाला उपलब्ध होतील.
अर्थात एटीकेटी किंवा वायडी या व्याधींवर प्रभावी इलाजही होणार हे सुज्ञास सांगणे नलगे.                
snn1952@gmail.com

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी