अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची तीन वर्षे पूर्ण करणारा एक विद्यार्थी काही व्यक्तिगत कारणामुळे शेवटचे वर्ष पूर्ण करू शकला नाही. असा विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या विज्ञान, कला, वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या थेट तिसऱ्या वर्षांला बसून संबंधित विषयाची पदवी मिळवू शकतो का?
– स्नेहा आगरकर
अशी सुविधा कोणत्याही मुक्त विद्यापीठामार्फत उपलब्ध नाही. या विद्यार्थ्यांस मुक्त विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा लागेल.
मी बी.एस्सी. (भूगर्भशास्त्र, संगणकशास्त्र आणि रसायनशास्त्र ) या विषयात करत आहे. मला भूगर्भशास्त्रात अधिक रस आहे. या विषयातील नोकरीच्या संधी कोणत्या?
– सुशील जंवाजळ.
या क्षेत्रासंबंधित पेट्रोलॉजिस्ट, मरिन जिऑलॉजिस्ट, मिनरलॉजिस्ट, जिओहायड्रोलॉजिस्ट, हायड्रोलॉजिस्ट, पॅलिअन्टोलॉजिस्ट, सेस्मॉलॉजिस्ट, सव्र्हेअर आदी नोकरीच्या संधी मिळू शकतात. या संधी जिऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया, सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, नॅशनल जिओफिजिकल इन्स्टिटय़ूट, वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी, मिनरल्स अॅण्ड मेटल ट्रेिडग कार्पोरेशन, कोल इंडिया, वेस्टर्न कोल फील्ड, हिन्दुस्थान िझक मिनरल्स, मिनरल एक्स्प्लोरेशन अथॉरिटी, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आदी संस्थांमध्ये मिळू शकते. राज्य सरकारमध्ये भूगर्भशास्त्रज्ञांची भरती नियमितरीत्या केली जाते. संघ लोकसेवा आयोगामार्फत जिऑलॉजिस्ट एक्झामिनेशन घेतली जाते. या परीक्षेद्वारे उच्च पदावरील भूगर्भशास्त्रज्ञांची व तंत्रज्ञांची निवड केली जाते. करिअरच्या संधी अधिक विस्तारण्यासाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केल्यास उपयुक्त ठरू शकेल.
मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून इंग्रजी विषयात बी.ए. करत आहे. मला पुढे एमबीए करायचे आहे. ते मला इतर विद्यापीठामधून करता येईल का?
– तुषार कासार
बीए पदवी प्राप्त केल्यानंतर तुला इतर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून एमबीए करता येईल. मात्र त्यासाठी तुला कॅट, मॅट, सी-मॅट, सीईटी अशा प्रवेशपरीक्षा द्याव्या लागतील. राज्यातील वेगवेगळ्या खासगी आणि शासकीय एमबीए महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत सीईटी घेतली जाते.
मी बायोइन्फॉम्रेटिक्सच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. मला या क्षेत्रात कुठल्या संधी उपलब्ध होतील?
– वामन जाधव
तुला या क्षेत्रात पुढीलप्रमाणे संधी मिळू शकते- बायोइन्फॉम्रेटिक्स सॉफ्टवेअर डेव्हपलर, जिन अनॅलिस्ट, फायलोजेनिटिस्ट, सायंटिफिक क्युरेटर, प्रोटिन अॅनालिस्ट, रिसर्च सायंटिस्ट, डाटा बेस प्रोग्रॅमर, कॉम्पुटेशनल बायोलॉजिस्ट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, केमइन्फार्मेटिक्स, फार्माकोजेनेटिशियन, प्रोटिओमिक्स, क्लिनिकल फार्माकॉलॉजिस्ट, बायोअॅनालिस्ट, फार्माकोजेनॉमिक्स आदी. मात्र, त्यासाठी तुला
वृत्तपत्रे व इंटरनेट आदी माध्यमांद्वारे या संधींचा सतत शोध घेता यायला हवा.
मी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि संगणकशास्त्र हे विषय घेऊन बारावी करत आहे. मला वेपन डिझायनर व्हायचे आहे. त्यासाठी मी काय करू? बीएस्सी करताना असा काही अभ्यासक्रम करता येईल का?
– चिन्मय पटवर्धन
वेपन डिझायिनग असा काही अभ्यासक्रम सध्या तरी उपलब्ध नाही. वेपन म्हणजेच शस्त्रे. याची व्याख्या आणि व्याप्ती खूप मोठी आहे. रामपुरी चाकूपासून अग्निबाण ते अणुबाँब या बाबी शस्त्रांमध्ये समाविष्ट होतात. आता इलेक्ट्रॉनिक व्हायरस हेसुद्ध शस्त्र गणले जाऊ शकते, ज्यात बराच गोंधळ उडवू शकण्याची आणि नुकसान करण्याची क्षमता असते. तथापि, तू प्रॉडक्ट डिझाइनचा अभ्यासक्रम केल्यास विविध प्रकारच्या वस्तू, यंत्रसामग्री करण्याची कला आणि कौशल्य प्राप्त होऊ शकते. मात्र, त्यासाठी बारावीनंतर बी. डिझाइन या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागेल.
मी इलेक्ट्रॉनिक सायन्सच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मी वन विभागाची परीक्षा देऊ शकतो का?
– संतोष खंडागळे
तू अशी परीक्षा देऊ शकत नाहीस. मात्र, तू पदवी परीक्षेनंतर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा देऊन भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सíव्हस) आल्यास भविष्यात तुला वन विभागाचे सचिव म्हणजे या विभागाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते.
मी बी.एस्सी. हॉर्टकिल्चरनंतर काय करू? मी एमबीए किंवा स्पर्धा परीक्षांबाबत गोंधळलेलो आहे.
– अक्षय खंदारकर
सर्वात प्रथम तुझ्या मनातील गोंधळ तू काढून टाकायला हवास. अन्यथा, तुला विविध संधींपासून मुकावे लागेल. बी.एस्सी. हॉर्टकिल्चरनंतर तू एम.एस्सी. करू शकतोस. बी.एस्सी. हॉर्टकिल्चर या शैक्षणिक अर्हतेवर तू राज्य व केंद्र शासनाच्या वन विभागाची परीक्षा देऊ शकतोस. सार्वजनिक बँकांचा कृषी विस्तार अधिकारी किंवा क्षेत्रीय अधिकारी म्हणून तुला संधी मिळू शकते. तुला इतर स्पर्धा परीक्षासुद्धा देता येतील. एमबीए करण्यासाठी कॅट अथवा इतर चाळणी परीक्षा द्याव्या लागतील. एमबीए इन अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करता येईल.
मी कृषी-बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. मला एम.एस्सी. करण्यात रस नाही. बी.एस्सी.व्यतिरिक्त ज्या विषयांना करिअर संधी आहे अशा अभ्यासक्रमांची माहिती द्या.
– जान्हवी मोरे
कृषी विषयातील बी.एस्सी. या शैक्षणिक अर्हतेवर तुला कृषी औद्योगिक क्षेत्रात विविध संधी मिळू शकते. खते, बी-बियाणे निर्मिती या क्षेत्रातही नोकरीच्या संधी आहेत. राज्याच्या वन विभागात क्षेत्रीय वनाधिकार व साहाय्यक वनाधिकारी म्हणून थेट प्रवेशासाठी संधी मिळू शकते. भारतीय वन सेवा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास राज्यात तसेच देशाच्या इतर भागांतही उच्च पदावर नोकरी मिळू शकते. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. मात्र, त्यासाठी कॉमन अॅडमिशन टेस्ट द्यावी लागेल. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट इन रुरल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासही प्रवेश मिळू शकतो. या दोन्ही अभ्यासक्रमांना सध्या बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
मी बीसीएच्या तिसऱ्या वर्गाला आहे. मला पोलीस क्षेत्रात काम करायचे आहे. एमपीएससीच्या कोणत्या परीक्षा मला देता येतील?
– अमर जाधव
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा देऊन भारतीय पोलीस सेवेत प्रवेश करता येतो. महाराष्ट्र पोलीस दलात येण्याचे तीन मार्ग आहेत- १) राज्य लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी घेणाऱ्या परीक्षेद्वारे पोलीस उपअधीक्षक किंवा उपपोलीस आयुक्त या पदावर नियुक्ती. २) राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक या पदाची परीक्षा देता येते. ३) पोलीस भरती मंडळामार्फत पोलीस हवालदार या पदाची भरती प्रक्रिया.
मला बारावी विज्ञान परीक्षेत ५८ टक्के गुण मिळाल्याने मी मेकॅनिकल शाखेच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. मला एनआयएसईआरमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे.
– आकाश जामदार
एनआयएसईआर (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च) या संस्थेतील प्रवेशासाठी नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्राचे प्रश्न विचारले जातात. या परीक्षेचा अभ्यासक्रम अकरावी व बारावीच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमावर आधारित असतो.
मी बी.एस्सी. प्रथम वर्षांत शिकत आहे. मला गणित आणि सांख्यिकी हे दोन्ही विषय आवडतात. मला सर्वजण रसायनशास्त्र हा विषय घे असे सुचवतात. त्यामुळे मी खूप गोंधळलेलो आहे. मला तुम्ही योग्य दिशा दाखवावी.
– दत्तात्रय िशदे
तुला गणित आणि सांख्यिकी विषय आवडतात हे तू स्पष्ट केले आहेस. एखाद्याला ज्या विषयात आवड, रस आणि गती असते त्या विषयातच पुढील अभ्यासक्रम केले तर चांगले करिअर घडवणे सुलभ जाते. सध्याच्या काळात चांगले गणितज्ज्ञ आणि सांख्यिकी विषयातील तज्ज्ञ मिळणे दुरापास्त ठरत आहे. त्यामुळे या विषयातील सर्व संकल्पनांसह, स्पष्टतेसह पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
(तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2016 1:08 am