‘वायरलेस अ‍ॅण्ड कम्युनिकेशन सिस्टीम लॅब’ या दक्षिण कोरियातील चोसून विद्यापीठातील प्रयोगशाळेतर्फे इलेक्ट्रॉनिक्स अथवा संगणक विज्ञान अभियांत्रिकी क्षेत्रातील देण्यात येणाऱ्या संशोधन शिष्यवृत्तीची माहिती-
दक्षिण कोरियातील चोसून विद्यापीठाच्या ‘वायरलेस अँड कम्युनिकेशन सिस्टीम लॅब’ या प्रयोगशाळेकडून परदेशी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. ‘वायरलेस अँड मोबाइल कम्युनिकेशन सिस्टीम्स’ या क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या या प्रयोगशाळेकडून निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी आणि एकात्मिक पदव्युत्तर-पीएच.डी (Integrated Masters and Ph.D. Program) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व संबंधित कालावधीसाठी शिष्यवृत्ती  दिली जाते. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आणि शिष्यवृत्तीसाठी प्रयोगशाळेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून ३० मे २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल..
चोसून विद्यापीठ हे दक्षिण कोरियातील एक प्रमुख खासगी विद्यापीठ आहे. विद्यापीठाचा परिसर कोरियाच्या नर्ऋत्येस असलेल्या ग्वांग्जू या महानगरामध्ये आहे. हे विद्यापीठ आशियामध्ये २५१ व्या क्रमांकाचे तर दक्षिण कोरियातील पहिल्या ३० विद्यापीठांपकी एक आहे. चोसून विद्यापीठाचे ‘वायरलेस  अँड मोबाइल कम्युनिकेशन सिस्टीम्स’ या प्रगत तंत्रज्ञानातील संशोधन जागतिक पातळीवर नावाजलेले आहे. म्हणूनच या क्षेत्रातील संशोधनाला वाहून घेतलेल्या जागतिक संस्थांपकी एक म्हणजे विद्यापीठातील ‘वायरलेस  अँड कम्युनिकेशन सिस्टीम लॅब’-हटउर छुं ही प्रयोगशाळा होय. या प्रयोगशाळेत सद्धांतिक संशोधनाबरोबरच उपयोजित संशोधनावरही भर दिला जातो. विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेकडून या वर्षी आंतरराष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जात आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पीएच.डी आणि एकात्मिक पदव्युत्तर- पीएच.डी (Integrated Masters and Ph.D. Program)  या दोन पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते.
या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून पदवीच्या कालावधीकरता संशोधन सुविधा, विद्यापीठाच्या आवारात निवासाची सोय तसेच या शिष्यवृत्तीअंतर्गत येणाऱ्या इतर सर्व सुविधा दिल्या जातात.

अर्ज प्रक्रिया
चोसून विद्यापीठातील या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी व शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने प्रयोगशाळेशी (WMCS Lab)) संपर्क साधावा. खाली नमूद केलेल्या संदर्भामध्ये दिलेल्या प्रयोगशाळेच्या वेबसाईटवर किंवा प्रयोगशाळेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जे- यंग प्यून (jypyun@chosun.ac.kr) यांच्याकडे अर्जप्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळेल. अर्जदाराने अर्जासोबत त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल सविस्तर माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., सी.व्ही., त्याने पदवी अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, त्याचे टोफेलचे (किंवा आयईएलटीएसचे) गुणांकन, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जदार त्याचा अर्ज प्रा. जे- यंग प्यून यांच्याकडे किंवा स्वतंत्रपणे प्रयोगशाळेच्या ई-मेलवर जमा करू शकतो.

निवड प्रक्रिया
अर्जदाराची विषयातील गुणवत्ता व संशोधनातील आवड लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड केली जाईल. निवडीनंतर अर्जदाराला वैयक्तिकपणे कळवले जाईल.   

अंतिम मुदत
चोसून विद्यापीठाच्या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० मे २०१५ आहे.

महत्त्वाचा संदर्भ
http://ubicom.chosun.ac.kr/
    
itsprathamesh@gmail.com

आवश्यक अर्हता
या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान या अभियांत्रिकी शाखांमधील पदवीधर असावा. अर्जदाराला पदवीच्या स्तरावर किमान ८५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी टोफेल किंवा आयइएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत अतिशय उत्तम गुण संपादन करणे गरजेचे आहे. यासंबंधीचे तसे निकष  विद्यापीठाने जाहीर केले आहेत. अर्जदाराला टोफेलच्या (आयबीटी) परीक्षेत किमान ८० गुण तर आयईएलटीएसमध्ये किमान ६.५ बँड्स प्राप्त करणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे पदवी स्तरावर संशोधनाचा अनुभव असणे गरजेचे आहे.