07 December 2019

News Flash

स्पगेटी फोंतानेला

स्पगेटी हा तसा अगोड पदार्थ, पण तो ज्या हॉटेलमध्ये गेला होता तेथे तिचा समावेश डेझर्टमध्ये केला होता.

(संग्रहित छायाचित्र)

सुकन्या ओळकर

एका देशात अमुक एक चवीचा म्हणून प्रसिद्ध असलेला पदार्थ कधी कधी दुसऱ्या देशात वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध होऊ शकतो. त्या एकाहून अधिक पदार्थाचे एकत्रीकरण असू शकते. अशीच काहीशी गोष्ट स्पगेटी आईस्क्रीमबाबत झाली आहे. मारिओ फोंतानेला हा तीसच्या दशकात इटालीहून जर्मनीत स्थायिक झाला. इटलीत आईस्क्रीम प्रसिद्ध आहे. मारिओने ‘आईस फोंतानेला’ (जर्मनीत आईस म्हणजे आईस्क्रीम) या नावाने कॅफे सुरू करून, त्यामध्ये इटालियन आईस्क्रीम जर्मनीत विकायला सुरुवात केली. त्याच्या नावीन्यपूर्ण चवीमुळे तो अल्पावधीत लोकप्रियदेखील झाला. तीस एक वर्षांनी त्याचा मुलगा दारिओ हादेखील त्याच्या मदतीस आला. कॅफेच्या स्वयंपाकघरात नवनवीन प्रयोग करायची त्याला भारी आवड. एकदा त्याच्या भटकंतीमध्ये त्याला असाच एक नवीन पदार्थ दिसला. मूळ पदार्थ स्पगेटी हा जरी त्याच्यासारख्या इटालियनला नवीन नसला तरी डेझर्टमध्ये स्पगेटी त्याने पहिल्यांदाचा पाहिली.

स्पगेटी हा तसा अगोड पदार्थ, पण तो ज्या हॉटेलमध्ये गेला होता तेथे तिचा समावेश डेझर्टमध्ये केला होता. त्याला एकूणच ते प्रकरण भारी आवडले. भटकंती संपवून परत आल्यावर स्पगेटीला आईस्क्रीमची जोड देण्याबाबत त्याची चक्रे फिरू लागली. त्यातूनच स्पगेटी आईस्क्रीमचा जन्म झाला. साधारण १९६९ मध्ये त्याच्या कॅफेच्या मेन्यूवर ‘स्पगेटी फोंतानेला’ विराजमान झाले ते आज जर्मनीतील इतर कॅफेमध्येदेखील दिसते. सर्वात खाली आईस्क्रीमचा बेस, त्यावर स्पगेटी, त्यावर स्ट्रॉबेरी सॉस, त्यावर व्हाइट चॉकलेट किसून टाकायचा आणि सर्वात वर व्ॉफलसारखी बिस्किटाती सजावट. गेली ५० वर्षे हे आईस्क्रीम याच पद्धतीने तयार केले जाते. खच्चून गोड असलेला हा अनोखा पदार्थ जर्मन भटकंतीत एकदा तरी चाखून पाहावाच.

First Published on November 1, 2019 12:22 am

Web Title: spaghetti ice cream fontanella abn 97
Just Now!
X