राज्य सरकारची अल्पसंख्याक  विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती
राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील मुस्लीम, ख्रिस्ती, शीख, बुद्ध, पारशी आणि जैन धर्मातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि व्यवसाय-व्यवस्थापन विषयांतर्गत शिक्षण घेण्यासाठी २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांसाठी खालील शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत-
शिष्यवृत्ती योजनेंतर्गत समाविष्ट विषय आणि अभ्यासक्रम : या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अथवा विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या अभियांत्रिकी-तंत्रज्ञान विषयातील पदवी-पदविका, एमई/ एमटेक, बीफार्म-एमफार्म, आर्किटेक्चर व टाऊन प्लॅनिंग, हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, अप्लाइड आर्टस् आणि क्राफ्टस्, एमसीए, एमबीए/ एमएमएस, बीटेक-कृषी विज्ञान यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत-
० अर्जदार महाराष्ट्राचे निवासी असावेत आणि त्यांनी राज्यातून शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
० अर्जदार विद्यार्थी दुसऱ्या कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावेत.
० अर्जदारांच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांहून
अधिक नसावे.
एकूण उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तीपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती  अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी राखीव असून, पात्रताधारक विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज करावेत. नूतनीकरणासाठी वेगळे अर्ज करणे अपेक्षित आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी. राज्य सरकार तंत्रशिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, मुंबई- ४०० ००१ येथील दूरध्वनी क्र.
०२२- २२६१७९६९ वर संपर्क साधावा अथवा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.dte.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने राज्य सरकारच्या http://www.dtemaharashtra.gov.in/scholarships या संकेतस्थळावर पात्रताधारक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख
२० सप्टेंबर २०१४ आहे.     

केंद्र सरकारची महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
राज्य सरकारचे उच्च शिक्षण निर्देशालय, पुणे आणि केंद्र सरकार यांच्यातर्फे राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेनंतरच्या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१४-२०१५ या शैक्षणिक सत्रासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेंतर्गत समाविष्ट विषय आणि अभ्यासक्रम : या योजनेंतर्गत अकरावीच्या परीक्षेपासून पीएच.डी.पर्यंतच्या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.
शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या शिष्यवृत्ती राज्यातील मुस्लीम, ख्रिस्ती, बौद्ध, पारशी व जैन या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
अर्जदारांनी नव्याने शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी तसेच सध्या त्यांना मिळत असणाऱ्या शिष्यवृत्तींचे नूतनीकरण करण्यासाठी वेगवेगळे अर्ज करणे अपेक्षित आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत-
० ते महाराष्ट्राचे निवासी असावेत.
० त्यांच्या पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी कमीत कमी ५० टक्के असावी.
० ते सध्या अन्य कुठल्याही शैक्षणिक शिष्यवृत्तीचे लाभार्थी नसावेत.
० पात्रताधारक अर्जदार विद्यार्थ्यांनी अकरावी वा त्यानंतरच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
० अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक एकत्रित उत्पन्न दोन लाख रुपयांहून अधिक नसावे.
० एका कुटुंबातून केवळ दोनच विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी http://www.momascholarsip.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करता येईल. सध्या मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे नूतनीकरण करण्यासाठी संगणकीय पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१४ आहे.