केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत आणि कार्यालयांमध्ये नेमणूक करण्यासाठी कर्मचारी निवड आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या संयुक्त पदवीस्तरीय निवड परीक्षा- २०१५साठी  अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
जागांचा तपशील
या निवड परीक्षेद्वारे नेमणूक करण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या यशावकाश निश्चित केली जाणार असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव असतील.

शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा
उमेदवारांचे वय २० ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.

निवड प्रक्रिया
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर ९ व १६ ऑगस्ट २०१५ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, अकोला व जळगाव या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे निवड करण्यात येईल.

वेतनश्रेणी व लाभ
निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये दरमहा ९,३०० – ३४८०० + ४६०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.
या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदेही देय असतील.

अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १०० रु.ची निर्धारित टपालतिकिटे अर्जावर लावणे आवश्यक आहे.

अर्जाचा तपशील
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ मे २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याची मुदत
महाराष्ट्रातील अर्जदारांनी विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि टपाल-तिकिटांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई- ४०००२०. या पत्त्यावर १ जून २०१५ पर्यंत पाठवावे.