डॉ. सिद्धीविनायक बर्वे

एकविसाव्या शतकाचे शास्त्र म्हणून गणल्या गेलेल्या जीवतंत्रज्ञानाची प्रगती अचंबित करणारी आहे.. जैविक क्रियांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करून घेणारे शास्त्र म्हणून जीवतंत्रज्ञान विकसित होते आहे..मानवी जीवनाशी निगडित जवळपास प्रत्येक क्षेत्रात जीवतंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. जैविक क्रियांची उकल करताना जीवतंत्रज्ञानाने जवळपास सजीव सृष्टीवर नियंत्रण मिळविण्यात यश संपादन केले आहे, असे म्हणता येईल.

जीवनाचा मूलाधार असलेल्या डीएनए रेणूच्या अंतरंगाची उकल, रेणवीय जीवतंत्रज्ञानाव्दारे डीएनए रेणूची जोडतोड करून नवीन प्रकारच्या सजीवांची निर्मिती करणे, डीएनए रेणूतील घटक जीनोमिक्स तंत्रज्ञानाव्दारे जाणून घेत सजीवांच्या जीनोम आराखडय़ाची मांडणी, जैवमाहिती शास्त्राद्वारे या माहितीचे पृथ:करण करणारे तंत्रज्ञान अन् यावर कळस म्हणजे निसर्गाची अनमोल निर्मिती असणाऱ्या सजीवांची प्रतिरुप तंत्राव्दारे निर्मिती अशा चढय़ा क्रमाने जीवतंत्रज्ञानाने सजीव सृष्टीचे अंतरंग स्पष्ट करत जीवनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे, अन् या साऱ्यांवर कळस ठरणारे तंत्रज्ञान आहे – स्टेम सेल किंवा मूळ पेशी तंत्रज्ञान..

स्टेम सेलचे तंत्रज्ञान हे जीवतंत्रज्ञानातील अलीकडच्या काळातील अत्यंत झपाटय़ाने वाढणारे तंत्रज्ञान आहे. हे आंतरशाखीय तंत्रज्ञान असल्यामुळे अनेक ज्ञानशाखांच्या एकत्रीकरणातून स्टेम सेल तंत्रज्ञान विकसित होते आहे. सजीवांची जडणघडण कशी होते याची उकल स्टेम सेल तंत्राव्दारे करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. सजीवांच्या शरीरातील विविध अवयवांची निर्मिती ज्या मूळ पेशीपासून होते त्या पेशीला स्टेम सेल असे संबोधण्यात येते. या स्टेम सेल किंवा मूळ पेशीपासून सजीवांतील विविध अवयवांची निर्मिती होते.  मानवी गर्भाची वाढ होत असताना विविध अवयवांची वाढ होते. यात हात, पाय, डोळे आणि हृदय अशा विविध अवयवांची निर्मिती होते. ही निर्मिती गर्भातील विशिष्ट पेशीव्दारे केली जाते. ही वाढ ज्या पेशीपासून होते त्या पेशीला त्या विशिष्ट अवयवाची मूळ पेशी किंवा स्टेम सेल असे मानले जाते. प्रतिरूप सजीव तंत्रज्ञानपेक्षा हे तंत्र अधिक प्रगत आहे कारण या तंत्रामुळे सजीवांतील विशिष्ट अवयवांची निर्मिती करता येणे शक्य होणार आहे. स्टेम सेल तंत्रज्ञान मूळ पेशी तंत्रज्ञान किंवा स्तंभ पेशी तंत्र म्हणूनही ओळखलं जातं.

स्टेम सेल तंत्रज्ञान अगदी अलीकडे विकसित झालेले तंत्र आहे. मानवी गर्भपेशीतून १९८१ साली मार्क ईव्हान्स व मॅथ्यू कॉफमन या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम मानवी स्टेम सेल्स अर्थात मूळ पेशींचा शोध लावला. मानवी शरीरात दोन प्रकारच्या मूळ पेशी अस्तित्वात असतात असा शोध त्यांनी लावला. गर्भात असणाऱ्या मूळ पेशींपासून एकदाच हात, पाय, डोळे तसेच हृदय अशा अवयवांची निर्मिती केली जाते. या अवयवांची निर्मिती केल्यानंतर गर्भातील मूळ पेशी सुप्तावस्थेत जातात. या पेशींबरोबर मानवी शरीरात आणखी एक प्रकारच्या मूळ पेशी अस्तित्वात असतात.. या पेशींव्दारे मानवी शरीरातील त्वचा, रक्त, केस अशा घटकांची निर्मिती केली जाते. मानवी शरीरातील या दोन प्रकारच्या पेशींपासून मानवातील विविध अवयव व इतर घटकांची निर्मिती केली जाते. या स्टेम सेल तंत्राद्वारे सजीव सृष्टीवर मानवाला जणू नियंत्रण मिळाले आहे.

जेम्स थॉमसन या अमेरिकन शास्त्रज्ञाने १९८६ साली मानवी गर्भपेशीतील स्टेम सेल्स  विभक्त करण्यात यश संपादन केले. यापुढे जात जपानी शास्त्रज्ञ शिन्या यामानाका यांनी मूळ पेशीतील जनुकात बदल करुन एकाच मूळ पेशीपासून कुठल्याही प्रकारच्या अवयवांची निर्मिती करता येणे शक्य असलेले तंत्र विकसीत केले. शिन्या यामानाका यांच्या या क्रांतीकारी शोधाचा २०१२साली नोबेल पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या शोधामुळे एखाद्या व्यक्तीच्या मानवी मूळ पेशींपासून त्यांच्या अवयवांची निर्मिती करता येणे शक्य होणार आहे. मानवी जीवनावर जणू नियंत्रण मिळविणाऱ्या या तंत्राचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात येतोय. या तंत्राद्वारे मानवी शरीरातील अनेक दुर्धर व्याधींवर मात करता येणे आता शक्य होणार आहे. या तंत्राचा वापर डायबेटिस, पार्किंन्सन्स अल्झायमर किंवा स्मृतीभ्रंशासारख्या दुर्धर व्याधींवर मात करण्यासाठी करण्यात येतो. मूळ पेशी तंत्राद्वारे सुदृढ पेशींची वाढ करुन या पेशी रुग्णाच्या शरीरात संक्रमित करण्यात येतात. हे तंत्र आहे स्टेम सेल थेरपीचे. जगभरात या तंत्राचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतोय. स्टेम सेल थेरपी जरी वैद्यकीय क्षेत्राशी संलग्न असली तरी संशोधन तसेच मूळ पेशीची वाढ करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावार करिअरची संधी या क्षेत्रात उपलब्ध आहे.

त्वचा व केस प्रत्यारोपणात मोठय़ा प्रमाणावर स्टेम सेल थेरपीचा वापर केला जातो. मूळ पेशींचा वापर अलीकडे हृदयविकारावरील उपचारांमध्येही करण्यात येत आहे. हृदयातील अंतर्गत ऊती बळकट करण्यासाठी तसेच वंध्यत्व निवरणासाठीही स्टेम सेल थेरपीचा वापर करण्यात येतो.

मानवी शरीरातील मूळ पेशी गर्भाच्या नाळेपासून आणि मानवी शरीरातील इतर मूळपेशी अस्थिमज्जा तसेच गर्भजलापासून विभक्त करता येणे आता शक्य झाले आहे. या मूळपेशी संग्रहित करुन ठेवण्यात येतात. अशा प्रकारे जतन केलेल्या मूळपेशींचा वापर भविष्यात रोगनिवारणासाठी करता येणे शक्य होणार आहे.

भारतात स्टेम सेल थेरपीचा वापर वाढतो आहे. भारतातील अनेक संस्थात स्टेमसेल थेरपीचे अभ्यासक्रम राबविले जातात.

बंगळूरु येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स (https://www.ncbs.res.in/) तसेच पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (https://www.nccs.res.in/) यासारख्या प्रगत संस्थात स्टेम सेल थेरपीचे अभ्यासक्रम चालविले जातात. देशातील काही महाविद्यालयातूनही हा अभ्यासक्रम राबविला जातो.

लेखक केळकर शिक्षण संस्थेच्या सायंटिफिक रिसर्च सेंटर, मुलुंड येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.