|| डॉ. श्रीराम गीत

  • रुईया महाविद्यालयात तिसऱ्या वर्षांला इंग्रजी माध्यमातून बीए अर्थशास्त्र शिकत आहे. मला स्पर्धा परीक्षा किंवा अध्यापनात रस नाही. अर्थशास्त्र या विषयातून कोणते पर्याय उपलब्ध असतील? – अचित हरड
  • मी गोंदिया येथे असतो. इतिहास, भूगोल व अर्थशास्त्र हे विषय अकरावीला घेतले आहेत. प्राध्यापक किंवा यूपीएससी याखेरीज मला काय संधी आहेत? – जय प्रकाश काचे
  • मी ११ वी कलाशाखेमध्ये शिकते आहे. सध्या गणित विषय घेतलेला नाही. नंतर अर्थशास्त्र हा विषय घेणार आहे. समजा, आता गणित नसेल तर पदवीला संख्याशास्त्र विषय घेता येतो का? गणित, संख्याशास्त्र, अर्थशास्त्र यातून खरंच मोठा वाव आहे का? तो विषय नसला तरी नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात का? – कल्याणी जगड
  • मी एमए इकॉनॉमिक्स करत आहे. त्यात मला पुढे कोणकोणते मार्ग आहेत? – उमेश कोपूरवाड

अचित, जय, कल्याणी व उमेश यांच्या अर्थशास्त्रविषयक प्रश्नांना एकत्रित नव्हे तर समग्र उत्तर देत आहे. चौघांची शैक्षणिक पातळी अकरावी ते एमएपर्यंत जरी पसरलेली असली तरी चौघांच्या मनात एक यक्षप्रश्न उभा आहे, तो मात्र सारखाच कॉमन आहे. ‘या अर्थशास्त्राचे करायचे काय?’

शालेय शिक्षणादरम्यान या विषयाची तोंडओळख होते. अकरावीला त्याची सुरुवात कॉमर्समधून आवश्यक विषय म्हणून होते. पुढे पाच र्वष विद्यार्थी तो शिकत राहतात. फारच थोडे आवडीने शिकतात. अन्यथा इतर सारे पास होणे गरजेचे म्हणून. त्यापैकी सहसा कोणाला या चौघांसारखा प्रश्नच पडत नाही. कारण आर्ट्सला जाणाऱ्यांनी अर्थशास्त्र हा विषय एक तर आवडीने निवडलेला असतो किंवा त्यात काहीतरी छान छान आहे असे त्यांना वाटलेले असते किंवा कुणीतरी सांगते, त्यात ना खूप स्कोप असतो म्हणून घेतलेला असतो.

मग गंमत अशी होते की बीए झाले. अजून काही नीट कळत नाही अन् नोकरी मिळत नाही म्हणून एमए करून टाकू यात अशी वेळ येते. अजूनच गोंधळ वाढत जातो.

आता या चौघांच्या प्रश्नाकडे पाहू यात. उमेश एमएला असून, त्याला थेट संशोधनाचा रस्ता उपलब्ध आहे. मात्र तो खडतर आहे. त्यासाठी एम.फिल वा नेटची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. हे करायचे नसेल तर बीए काय आणि एमए काय, दोन्हीची किंमत नोकरीच्या बाजारात गेली पंचवीस वर्षे एकच आहे. हे प्रखर सत्य त्याला स्वीकारावे लागेल.

अचितला स्पर्धा परीक्षा किंवा अध्यापनात रस नाही असे तो सांगतो, पण अध्यापनासाठी सध्या नोकरीच उपलब्ध नाही हे तो कधी जाणून घेणार? सर्व महाविद्यालयातून आहेत त्यांच्या नोकऱ्या टिकणे हे कठीण झाले आहे, हे वास्तव मागणी व पुरवठा याचा आधार असलेला अर्थशास्त्र विषय शिकणारा कधी शिकणार?

जय आणि कल्याणी यांची आता अर्थशास्त्राशी फक्त तोंडओळख झाली आहे. इयत्ता १३ वीनंतर त्यांना त्या विषयातून पदवी घ्यायची की नाही हे ठरवायचे आहे. त्या दृष्टीने त्यांनी विचार करावा. गणित नसेल तर संख्याशास्त्र जड जाते हे मात्र कल्याणीने विसरू नये. तिला येणारी शंका मात्र बोलकी आहे. यातून खरंच मोठा वाव आहे का?

मुळात अर्थशास्त्राचा आधार घेऊनच खूप सारे विषय शिकावे लागतात. उपयोजित शाखांतून अर्थशास्त्र शिकणारा विद्यार्थी भरपूर वाव असलेल्या रस्त्याकडे सुरुवात करतो. मात्र निव्वळ अर्थशास्त्री पंडित व्हायच्या रस्त्याची वाट धरतो. यातून जे खरोखर पंडित होतात, त्यांचे अनेकांना ऐकावे लागते. अशा पंडितांची म्हणजेच अर्थतज्ज्ञांची पंतप्रधानांपासून ते प्रत्येक उद्योगपतींपर्यंत प्रत्येकाला गरज असते. अर्थातच संशोधनोत्तर डॉक्टरेट करून याची सुरुवात होते किंवा नोकरी व आर्थिक विश्लेषण करणाऱ्या संस्थेत काम करताना डॉक्टरेट मिळवून हा प्रवास होतो.

या चौघांना अन्य मार्ग आहेत. बँकांच्या विविध परीक्षा देणे, एमबीए करणे, नोकरी करताना पी.जी.डी.बी.एम. पूर्ण करणे, स्वयंसेवी संस्थांना फंडिंग करणाऱ्या संस्थेत उमेदवारी करणे, पत्रकारितेचा कोर्स पूर्ण करून अर्थविषयक क्षेत्रात पत्रकार बनणे, अर्थ विश्लेषक बनून डिजिटल मीडियात जाणे, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड या क्षेत्रांत उमेदवारी करून स्वत:चा व्यवसाय सुरू करणे हे ते काही मार्ग आहेत. मात्र एकानेही शैक्षणिक पाश्र्वभूमी न कळवल्याने त्याबद्दल जास्त नेमकी माहिती देणे मला शक्य नाही. दुर्दैवाने करिअर मंत्रसाठी प्रश्न पाठवणाऱ्यांनी ती पुरवावी अशी तळटीप सातत्याने असूनही पुरवली जात नाही. खरे तर करिअर मंत्राला प्रश्न पाठवणाऱ्यांनी संपूर्ण करिअर वृत्तान्त सलग महिनाभर वाचला व फक्त ६० दिवस पान दोनवरचा ‘यशाचा मार्ग’ या सदराचे कात्रण कापून ठेवले तरी त्यांना भरपूर माहिती मिळू शकते. त्यामुळे करिअर कोणतेही असेल तरी वाचन आवश्यकच आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यावी.

विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो, करिअर मंत्र या सदरासाठीचा ई-मेल आयडी बदललेला आहे. यापुढे आपले प्रश्न  career.mantra@expressindia.com येथे पाठवावेत. प्रश्नामध्ये आपली शैक्षणिक पात्रता जरूर नमूद करावी. त्यामुळे उत्तरामध्ये अधिक स्पष्टता आणता येईल.