07 July 2020

News Flash

नावडत्या विषयाचा अभ्यास

‘‘असाध्य ते साध्य । करिता सायास । कारण अभ्यास । तुका म्हणे।।’’

| February 17, 2014 07:24 am

‘‘असाध्य ते साध्य । करिता सायास ।
कारण अभ्यास । तुका म्हणे।।’’
संत तुकारामांनी त्यांच्या साध्या सोप्या शैलीत ‘अभ्यास’ या तरल गोष्टीला खूप छान पकडलं आहे. तसं पाहिलं तर सातत्यानं करावी लागणारी प्रत्येकच गोष्ट सुरुवातीला असाध्य वाटत असते. नव्यानं पोहायला शिकताना पहिल्या दिवशी पाण्यात डुबक्या खाताना तरणतलावाची रुंदीची (लहान) बाजू पार करता येणंसुद्धा असाध्यच वाटत असतं. तरीही मनातल्या भीतीला आणि ‘बुडालो तर?’ या आशंकेला दूर सारून रोज जिद्दीनं आपण जेव्हा तलावावर जातो, प्रशिक्षकाची प्रत्येक हालचाल लक्षपूर्वक पाहतो आणि स्वत:त ते रुजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या ‘सायासा’मुळे ते पहिलं ‘असाध्य’ वाटलेलं कौशल्य काही दिवसांनी साध्य होतं.
पोहणे, सायकल चालवणे ही सर्वसामान्यपणे रोजच्या आयुष्यात लागणारी कौशल्यं. गायन, वादन, अभिनय, चित्रकला, मातीकाम, शारीरिक कसरती, घोडेस्वारी, ही कला-कौशल्यं (हुनर) तर वाचणे, लिहिणे, लेखी-तोंडी मांडणी करणे ही काही जीवनावश्यक औपचारिक कौशल्यं. कुठल्याही प्रकारच्या कौशल्यापर्यंत पोहोचण्याच्या चार पायऱ्या असतात- शिकणं, समजणं, सराव आणि आत्मसात होणं. तशी यातली कुठली पायरी कुठे सुरू झाली आणि कुठे संपली असं सांगणं अवघड असतं. पण ही सगळी प्रक्रिया मिळून बनतो तो ‘अभ्यास’. कुठल्याही कौशल्यामध्ये नेमकेपणा अभिप्रेत असतो. विशिष्ट विषयाचं ज्ञान मिळवणं आणि नंतर गरजेनुसार त्यातलं हवं तेव्हा, हवं ते, हवं तसं, हवं तेवढं वेचता, साठवता आणि आठवून वापरता येणं म्हणजे कौशल्य आत्मसात होणं. थोडक्यात, कौशल्यामध्ये विषयावर हुकूमत अपेक्षित असते. त्यासाठी सर्वप्रथम शिकावं लागतं, ते त्या त्या गोष्टीचं तंत्र.
कौशल्यापूर्वीचा ‘आहा क्षण’
कौशल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं तंत्र आत्मसात होणं ही पहिली गरज असते. तंत्र जमणं हा एक ‘आहा क्षण’ असतो. ‘ओह ! हे असं आहे तर!’ असा आपल्या मनाचा त्या क्षणाचा सहजोद्गार असतो. पुन्हा एकदा पोहोण्याचंच उदाहरण घेऊ. पहिला काही काळ वेडेवाकडे हातपाय मारण्यात, गटांगळ्या खाण्यात जातो. तरी आपण धडपड करत राहतो आणि कधीतरी अचानक जाणवतं, ‘अरे, आता धडपड कमी होतेय, आपल्याला ‘ते’ सापडतंय.’ काही जणांना यासाठी दोनच दिवस पुरतात तर काहींना १५ दिवसही लागू शकतात. या टप्प्यावर पाण्याची भीती कमी होते, आपली उमेद वाढते. त्यानंतर एक-दोन दिवसांनी असंच धडपडता-धडपडता आपण आधाराशिवाय काही फूट तरंगत जातो आणि आपलं आपल्यालाच समजतं, ‘येस, जमलं.’ इथे एक सहजता अनुभवायला येते. विनासायास तरंगता येणं गाठल्यानंतर आता बॅक स्ट्रोक, क्रॉल, बटरफ्लायपर्यंत आाणि साध्या उडय़ांपासून समरसॉल्टपर्यंतच्या अनेक अवघड पण सुंदर गोष्टी शिकता येणार असतात. हा ‘आहा’ क्षण कौशल्यातल्या पुढच्या असंख्य टप्प्यांची अलिबाबाची गुहा उघडतो.
सायकल चालवण्याच्या कौशल्याच्या बाबतीत ‘बॅलन्स जमून काही फूट पुढे जाता येणं’ हा तो ‘आहा’ क्षण. गाण्याबाबत तंबोऱ्यासारखा लख्ख स्वर आपल्या गळ्यातून वाजणं आणि स्थिर होणं हा तो ‘सूर गवसण्याचा’ क्षण असतो तर मातीकामात कुंभाराचं चाक फिरतं राहून मातीच्या गोळ्यावर हात ठरणं ही असते मातीकामाचं तंत्र जमण्याची सुरुवात. हा ‘खुल जा सिमसिम’ क्षण प्रत्येक शिकण्यात असतो. तो क्षण एक सहजता घेऊन येतो. आत्तापर्यंत शिकण्याशी चालू असलेली झटापट तिथे एकदम थांबते. आपल्याला हे जमणार आहे, याची खात्री होते. आत्तापर्यंत असाध्य वाटलेल्या तिथपर्यंत आपण पोहोचतो आहात असं आपल्या मनाला लख्ख दिसतं, तिथून सहज शिक्षणाची खरी सुरुवात होते.
अभ्यासाचा ‘आहा क्षण’
शिकण्याच्या प्रक्रियेच्या या टप्प्यांकडे एवढं तपशिलात पाहणं महत्त्वाचं अशासाठी की, ‘अभ्यास करता येणं हेदेखील एक कौशल्यच आहे. औपचारिक शिक्षणातही हीच प्रक्रिया घडते. अभ्यासाशी झटापट करता करताच नकळत कधीतरी विषय ‘आतून समजायला’ लागतो. हळूहळू त्यात मजा यायला लागते आणि त्यानंतर वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या कौशल्याच्या पातळ्या आपण गाठू शकतो. ‘अरे हां! हे असं आहे तर!’ असे उद्गार अभ्यास विषयाबाबत मनात उमटणं हा अभ्यासाचं तंत्र जमण्याचा ‘आहा क्षण’ असतो. कुठल्याही विषयाचा अभ्यास करायला शिकताना ध्येयाचा पहिला टप्पा हवा- तो फक्त या ‘युरेका, मला सापडलं’च्या क्षणापर्यंत पोहोचण्याचा. एकदा कुठल्यातरी विषयात तो सापडला की, ती प्रक्रिया समजून डोळसपणे वापरता येऊ शकते. अभ्यास करता येणं हे कौशल्य आत्मसात व्हायला लागतं.
आपल्याला आवडत्या विषयात हा क्षण लवकर येतो. थोडय़ा धडपडीनंतर समजणं, सराव घडत जातं. परीक्षा जवळ आल्यानंतर आपला समजण्याचा आणि साठवण्याचा वेग वाढत जातो, सहजता येते, आत्मविश्वास वाढत जातो. पुढे मात्र आठवणीत राहतं ते फटाफट समजणं, शेवटचे वेगवान दिवस आणि तो आत्मविश्वास. सहजता सवयीची झाली की, आपण पहिले धडपडीचे टप्पे सहसा विसरूनच जातो. आवडता विषय जमतोच, असं मनात पक्कं होतं. मग धडपड जाणवत नाही.  
नावडत्या विषयाबाबत अनेकदा घडतं असं की, वरवर पाहता आपण खूप धडपड करत असतो, पण आपल्या मनानं मात्र ठरवलेलं असतं की, ‘हा माझा विषय नाही, मला मुळीच आवडत नाही, यामध्ये मला कुठे पोहोचायचंच नाहीये’. त्यामुळे तिथे आवडत्या विषयाचं होतं तसं ‘खुल जा सिमसिम’ होत नाही आणि त्या विषयाचा दरवाजा बंदच राहतो. आपल्याला अडकल्यासारखं, कोंडल्यासारखं बंद-बंद वाटतं, धसका बसतो आणि नावडता विषय जास्त नावडता होत जातो. तो करायला घेतला की आवडत्या विषयाशी तुलना होते. तो वेग, तो आत्मविश्वास येत नाहीये हे जाणवतं, त्यामुळे आपण खचत जातो आणि खचवणारा विषय आणखी नकोसा होतो, शक्य तोवर शेवटच्या क्षणापर्यंत टाळला जातो.
इंग्रजी-गणितासारखे विषय तर सार्वत्रिक बदनाम. त्यांची भीतीच असते. अनेकदा त्या अभ्यासाचा प्रत्यक्ष आयुष्यात मला काही उपयोग होणार नाही, अशी खात्री वाटली तरी तो अनावश्यक वाटतो. इथे एक गोष्ट मान्य करायची, की प्रत्येकाला प्रत्येक विषय आवडू शकत नाही, ज्याचा त्याचा विशिष्ट प्राधान्यक्रम असणारच. पण जेव्हा ते केल्याशिवाय पर्यायच नसतो तेव्हा आपल्या मनातला त्या विषयाबाबतचा ब्लॉक काढून त्यामध्ये किमान प्रावीण्य (पास होण्यापुरतं किंवा थोडं जास्त) मिळवावंच लागेल. त्यासाठी दोस्तीच्या नजरेनं त्या विषयाकडे बघावं लागेल, त्याला थोडंथोडं जवळ करावं लागेल. टाळत राहिलं तर तो आणखी दूर जाईल.  
म्हणून आवडता विषय करताना पाहायची ती शिकण्याची संपूर्ण प्रक्रिया. आवडता विषय असूनही अगदी सुरुवातीला नीट लक्ष द्यावं लागलं होतं, समजून घ्यावं लागलं होतं  हे लक्षात ठेवायचं. टप्प्याटप्प्यानं पुढे जातो तसा आपला आत्मविश्वास कसा वाढतो, याकडे लक्ष ठेवायचं. नावडत्या विषयाबाबतही हेच होणार आहे, फक्त वेळ आणि प्रयत्न थोडे जास्त लागतील हे समजून घ्यायचं. नावडत्या विषयाबाबत आपण ‘नो मॅन्स लँडवर’ पोहोचलेलो असतो, तिथून ‘आहा क्षणा’पर्यंत पोहोचायला सुरुवातीला जरा जास्त वेळ लागणारच असतो. तो द्यायला हवा. या टप्प्यापर्यंत लागतं ते शांतपण आणि सातत्य. आपल्याला सगळे अडथळे पार करण्याची कितीही घाई असली तरी अभ्यासात गोडी वाटायला लागल्यानंतरच पुढचा दरवाजा उघडणार आहे, पहिल्या टप्प्यावरचे प्रयत्न हे विषयात गोडी वाटण्यासाठी आहेत, ताबडतोब फटाफट समजायला लागण्यासाठी किंवा दणादण मार्क मिळवण्यासाठी नाहीत, हे नीट समजून घेऊन मान्य करायचं.
स्वत:चा आत्मसन्मान तिथं जोडायचा. ‘गणितात ४० मार्क मिळवणंही जमत नाही, हे मला शोभत नाही. कसं जमत नाही, ते पाहूच आता.’ असं स्वत:ला सांगायचं. मग ‘मला कुठे पोहोचायचंच नाहीये’ ही मनाची भुणभुण थांबते. त्याला पोहोचण्यासाठी एक ‘छोटं ध्येय’ मिळतं. तो ब्लॉक निघतो. त्यापुढची पायरी असते ती सहजता आणि आत्मविश्वासाची. स्वत:च्या मनाचा सहभाग मिळाला की रस्ता सापडत जातो. आपल्या आकलनाच्या टप्प्यावर येऊन मदत करू शकणारे मित्र-मत्रिणी, परिचित, शिक्षक भेटतात. ‘अभ्यास’ ही प्रक्रिया आवडायला लागते. हो, खरंच, हे घडू शकतं.                    
neelima.kirane1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2014 7:24 am

Web Title: study of dislike subjects
टॅग Sant Tukaram,Study
Next Stories
1 ठिणगी विझू देऊ नका..
2 उपयुक्त तंत्रज्ञानाच्या निर्मितीला उधाण
3 दृष्टिकोन
Just Now!
X