31 March 2020

News Flash

यूपीएससीची तयारी : तंत्रज्ञान

या घटकाअंतर्गत आपणाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास, उपयोजन, त्याचे सर्वसामान्याच्या जीवनावर होणारे परिणाम याचा विचार करावा लागतो.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील अभ्यासक्रमामध्ये नमूद तंत्रज्ञान या घटकाची एकत्रित परीक्षाभिमुख तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत.

हा घटक जरी तंत्रज्ञान या नावाने अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेला असला तरी यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून अभ्यास करावा लागतो. या घटकाअंतर्गत आपणाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास, उपयोजन, त्याचे सर्वसामान्याच्या जीवनावर होणारे परिणाम याचा विचार करावा लागतो. तसेच भारतीयांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात मिळवलेले यश, नवीन तंत्रज्ञानाचा विकास याचबरोबर माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संगणक, रोबोटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकार व संबंधित मुद्दे इत्यादी क्षेत्रामधील घडणाऱ्या घडामोडी या सगळ्याचाही अभ्यास आणि त्यासंदर्भातील मुद्दे अभ्यासक्रमात नमूद करण्यात आले आहेत.

भारताची स्वत:च्या अवकाश स्थानकाची योजना काय आहे आणि हे आपल्या अवकाश कार्यक्रमाला कशा प्रकारे फायद्याचे ठरेल? (२०१९)

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जैवतंत्रज्ञान कसे साहाय्यकारी ठरू शकते? (२०१९)

कोणते कारण आहे की, आपल्या देशात जैव तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अधिक सक्रियता आहे? या सक्रियतेने बायोफार्म क्षेत्राला कशा प्रकारे फायदा पोहोचवलेला आहे? (२०१८)

प्रो. सत्येंद्र नाथ बोसद्वारे करण्यात आलेल्या ‘बोस-आइनस्टाईन सांख्यिकी’ कार्याची चर्चा करा आणि दाखवा की कशा प्रकारे याने भौतिकशास्त्र या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. (२०१८)

भारतातील आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञानची वाढ आणि विकास याचा वृत्तांत द्या. भारतात फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर प्रोग्रामचा (fast breeder reactor programme) काय फायदा आहे? (२०१७)

भारताने अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मिळवलेल्या उपलब्धीची चर्चा करा. कशा प्रकारे या तंत्रज्ञानाच्या प्रयोगाने भारतातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला मदत केलेली आहे? (२०१६)

प्रतिबंधित श्रमाची कोणती क्षेत्रे आहेत जी यंत्रमानवाद्वारे (Robots) सातत्याने व्यवस्थापित केली जाऊ शकतात? अशा उपक्रमांची चर्चा करा जे प्रमुख संशोधन संस्थांमध्ये स्वतंत्र आणि नावीन्यपूर्ण लाभदायक संशोधनासाठी चालना देतील. (२०१५)

जागतिकीकरण झालेल्या जगात बौद्धिक संपदा अधिकार यांना विशेष महत्त्व आहे. कॉपीराइट, पेटंट्स आणि व्यापार गुपिते यामध्ये सामन्यत: काय फरक आहे? (२०१४)

भारतातील विद्यापीठामधील वैज्ञानिक संशोधन घटत आहे, कारण विज्ञानामधील करिअर हे व्यापार व्यवसाय, अभियांत्रिकी किंवा प्रशासन यामधील करिअरइतके आकर्षक नाही. तसेच विद्यापीठे हे उपभोक्ताभिमुख होत चाललेली आहेत. समीक्षात्मक टिप्पणी करा. (२०१४)

निश्चित मात्रा औषध संयोग (FDCs) यावरून काय समजते? त्याच्या गुण आणि दोषांची चर्चा करा. (२०१३)

उपरोक्त प्रश्नाची आपण थोडक्यात चर्चा करू. बहुतांशी प्रश्न हे संकल्पना व त्यांचे आणि त्यामधील तांत्रिक बाबी यांचा एकत्रितपणे विचार करून विचारण्यात आलेले आहेत. २०१३ मधील जवळपास सर्व प्रश्न हे तंत्रज्ञामधील संकल्पना, या संकल्पनांचा अर्थ, आणि यांची असणारी वैशिष्टय़े अशा पलूंवर विचारण्यात आलेली आहेत. निश्चित मात्रा औषध संयोग (FDCs), डिजीटल स्वाक्षरी (Digital Signature) आणि ३ आयामी मुद्रण (3D Printing) तंत्रज्ञान यासारख्या संकल्पना या वस्तुनिष्ठ पद्धतीच्या असतात. त्याची माहिती असल्याशिवाय उत्तरे लिहिता येत नाहीत.

२०१४ मधील प्रश्न हे संकल्पना आणि संशोधनातील स्थिती यांसारख्या मुद्दय़ावर विचारण्यात आलेले होते. उदारणार्थ विद्यापीठामध्ये संशोधनात होणारी घट यासारख्या महत्त्वाच्या पलूवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. थोडक्यात या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी संशोधन म्हणजे काय? त्याकडे उत्तम करिअर म्हणून का पाहिले जात नाही?  इतर क्षेत्रांच्या तुलनेत या क्षेत्रातील आर्थिक लाभ, करिअरची उपलब्धता तसेच सुरक्षितता नेमकी किती आहे? त्यातील सद्य:स्थिती निर्माण होण्याचे कारण काय आहे, त्याला कोणते घटक जबाबदार आहेत अशा विविध बाबींचा विचार करून उत्तर लिहावे लागते. सोबतच विद्यापीठामधील संशोधनाच्या आकडेवारीचीही जोड द्यावी लागते. हे सगळे मुद्दे आले तरच या प्रश्नाचे उत्तर अधिक समर्पकपणे लिहिता येऊ शकते.

२०१५मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचेही स्वरूप संकल्पनाधारित होते तसेच याच्या जोडीला या तंत्रज्ञानामुळे होणारे परिणाम, तंत्रज्ञानाची उपयुक्तता इत्यादी बाबी गृहीत धरून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

२०१६ मध्ये नॅनो तंत्रज्ञान यावरही प्रश्न विचारण्यात आलेला होता, तसेच २०१७ मध्ये चांद्रयान आणि मार्स ऑर्बटिर मिशन आणि स्टेम सेल थेरपी इत्यादीशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. २०१८ आणि २०१९ मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पारंपरिक आणि समकालीन घटनांची सांगड घालून विचारण्यात आलेले होते.

थोडय़ाफार फरकाने प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे स्वरूप सारखेच आहे, कारण हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने अधिक वस्तुनिष्ठ आहे. त्यामुळे संबंधित संकल्पना, या संकल्पनांची वैशिष्टय़े आणि उपयुक्तता इत्यादी बाबींची माहिती असणे अपरिहार्य ठरते. उपरोक्त प्रश्नांवरून आपण हे समजून घेऊ शकतो.

हा घटक अभ्यासताना आपणाला दोन बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पहिली बाब या घटकामध्ये संकल्पनांवर आधारित प्रश्न अधिक प्रमाणात विचारले जातात. दुसरी बाब, या घटकावर विचारण्यात येणारे जवळपास सर्व प्रश्न हे या घटकासंबंधित घडणाऱ्या चालू घडामोडींवर विचारले जातात.

या घटकाचा अभ्यास करण्यासाठी त्याची मूलभूत माहिती देणारी गाइड्स स्वरूपात लिहिलेली अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. (उदा. TMH, SPECTRUM ची पुस्तके) या घटकाच्या मूलभूत अभ्यासासाठी यांचा वापर करता येऊ शकतो. कारण ही पुस्तके नमूद अभ्यासक्रमानुसार लिहिलेली असतात, त्यामुळे  आपल्याला प्रत्येक नमूद मुद्दय़ाची मूलभूत माहिती मिळते.

या घटकाशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करण्यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ ही इंग्रजी दैनिके, सायन्स रिपोर्टर, डाऊन टू अर्थ ही मासिके, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानसंबंधित संस्था, मंत्रालय यांची संकेतस्थळे इत्यादींचा उपयोग करता येऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 12:01 am

Web Title: technology upsc preparation abn 97
Next Stories
1 विद्यापीठ विश्व : संगणक विज्ञानातील अग्रेसर कार्नेजी मेलन विद्यापीठ, अमेरिका
2 प्रश्नवेध एमपीएससी : चालू घडामोडींविषयक सराव प्रश्न
3 चालू घडामोडी
Just Now!
X