परीक्षेचा अभ्यास हा कधी संपल्यासारखा वाटत नाही की पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. विशेषत: बोर्ड परीक्षांच्या अथवा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा देताना तर नाहीच नाही. कारण या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये एकेका मार्कासाठी चुरस सुरू असते..
यंदाच्या वर्षांच्या अंतिम परीक्षेपूर्वीचे आता हाती उरलेले दिवस म्हणजे परीक्षेच्या तयारीचा अंतिम टप्पाच म्हणावा लागेल. बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तर सुमारे वर्षभर आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यामुळे परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात केवळ सराव व्हायला हवा. अलीकडच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बघता ‘समज’ आणि ‘सराव’ ही द्विसूत्री विद्यार्थ्यांना चांगले यश देऊ शकते. विशेषत: विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना हे तंत्र चांगलेच उपयोगी ठरते.
यापुढच्या दिवसांत अभ्यास किती केला आणि कसा केला हे महत्त्वाचे ठरेल. अभ्यास करताना काही नाविन्यपूर्ण तंत्रं  अवलंबणे क्रमप्राप्त आहे. कारण ज्याला इतरांहून जास्त आणि इतरांपेक्षा वेगळं असं मिळवायचं असतं, त्याला इतरांहून जास्त प्रयत्न करावे लागतातच. या अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात वेगळा आणि जास्त अभ्यास कसा करता येईल?
अभ्यास करताना सगळी भिस्त पाठांतरावर असणे उपयुक्त नाही. अभ्यासासाठी नवनव्या अभ्यासतंत्रांचा समावेश नक्कीच करता येईल. खरं तर परीक्षेच्या तयारीचा प्रत्येक दिवस हा विशेष न वाटता रोजच्यासारखाच वाटायला हवा. त्यासाठी वेळेचं नियोजन करणं, आरोग्याची काळजी घेणं आणि आत्मविश्वासाने स्वत:शीच स्पर्धा करणं अशा तीनही आघाडय़ांवर अधिक काम करावं लागेल. यातून जी तयारी होते, ती खरी अभ्यासाची तयारी.  
वेळेचे नियोजन- ‘जर तुम्ही नियोजन करण्यात अयशस्वी ठरलात, तर तुम्ही अयशस्वी ठरण्याचे नियोजन करता’ अशा आशयाचे एक वाक्य आहे. अभ्यास करण्यासाठी प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. त्यामुळे योग्य वेळ येण्याची वाट बघत बसण्यात अर्थ नाही. यापुढे परीक्षा संपेपर्यंत तुमचा प्रत्येक दिवस, दिवसातला प्रत्येक तास हा  पूर्वनियोजनाने व्यतीत व्हायला हवा. यामुळे ‘कंटाळा’ हा मोठा शत्रू हद्दपार होतो आणि कंटाळा आणला तर येतो, हाकलला तर
दूर पळतो.
वेळेचा योग्य सदुपयोग होण्यासाठी पुढील  बाबी करता येतील-
* रोज रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी विषयवार करायच्या अभ्यासाची लेखी नोंद करणे. यामुळे कुठल्या विषयाचा अभ्यास करू अन् काय करू हा गोंधळ राहात नाही. संभ्रम संपतो, तिथे शक्तीचा अपव्ययही थांबतो.
६ दिवसभर महाविद्यालयातील अभ्यास, शिकवणी वर्गामधील अभ्यास, प्रॅक्टिकल्स, जर्नल्स पूर्ण करणे या अनिवार्य गोष्टींसाठी लागणारा वेळ लक्षात घेत उर्वरित वेळेत स्वअभ्यासाची परिणामकारकता वाढवायला हवी. त्यासाठी प्रत्येक विषयाचे अगदी ठरवून चार-चार प्रश्न रोज तयार करायचे असा नियम केला तर योग्य दिशेने अभ्यास केल्याचे समाधान मिळते. शिवाय रोजचा अभ्यास रोजच्या रोज हे ध्येय गाठल्यामुळे सकारात्मकता वाढते. नैराश्य, ताण येत नाही.
* हा दिनक्रम सलग अवलंबला तर महिनाअखेर प्रत्येक विषयाचे किमान १०० प्रश्न तरी तयार होतात.  
* वेळ वाचवणे- मोबाइलचा अतिरेकी वापर थांबवा. फेसबुक, वॉटस्अ‍ॅप, मोबाईल गेम्स यांपासून बोर्डाच्या परीक्षेपर्यंत दूर राहण्याचा निर्धार करणे अत्यावश्यक आहे. त्या ऐवजी मित्रमंडळींचा ‘स्टडी ग्रुप’ बनवून रोज संध्याकाळी एकत्रितपणे ठरवलेले रोजचे अभ्यासाचे लक्ष्य साध्य झाले की नाही याची चर्चा करायला हरकत नाही. आपणही कुणाला उत्तर देण्यास बांधील आहोत ही गोष्ट आपल्यावरच एक सकारात्मक मानसिक दडपण आणते. आणि त्यामुळे ध्येयाकडे वाटचाल सुकर होते.

स्पर्धा स्वत:शी- स्पर्धा खरंतर सकारात्मक प्रेरणा म्हणून स्वीकारायला हवी. स्पर्धा आली तिथे तुलना आली. जेव्हा आपण आपली तुलना ‘सर्वोत्तम’ असलेल्यांशी करतो, तिथे ताण जन्म घेतो. म्हणून आपला भर सर्वोत्तम कामगिरीवर असायला हवा. कालच्यापेक्षा मी आज थोडा का होईना, सरस झालो, अशी निकोप स्पर्धा स्वत:शीच करावी. म्हणजे स्वत:ला स्वत:ची चांगली ओळख होईल.
अभ्यासाचे तंत्र निवडा- यशस्वी विद्यार्थी सर्वप्रथम स्वत:चे खूप छान मित्र असतात. आपल्या क्षमतांबद्दल सजग असतात, प्रामाणिक असतात. ते इतर सगळे विद्यार्थी करतात, त्याच अभ्यासाच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. अधिकाधिक परिणामकारकता वाढवण्यावर त्यांचा भर असतो. आत्मविश्वास वाढविण्यासाठी ही काही अभ्यासतंत्रे उपयुक्त पडू शकतील-
* मेमरी मॅपचा वापर – ‘टू रिमेंबर समथिंग, यू मस्ट फरगेट समथिंग.’ हा स्मरणशक्तीचा नियम आहे. मग विसरायचं असेल तर अनावश्यक गोष्टींवरचं लक्ष काढून घेतलं पाहिजे आणि आवश्यक गोष्टींचं मनन, चिंतन वाढवलं पाहिजे. रोज सकाळी उठल्यावर अभ्यासाची सुरुवात एखाद्या प्रकरण/धडय़ातील प्रत्येक टॉपिक आठवून त्याच्याशी निगडित पारिभाषिक शब्दांची (Terminology) उजळणी ट्री डायग्राम, फ्लो चार्ट काढून करावी. लिहून केलेल्या अभ्यासाने मन अधिक केंद्रित होते आणि केंद्रित मनाची ताकद अफाट असते.
* साधारणपणे सारख्या असलेल्या विषयांची निवड-
रोज विषयवार ठरवलेले मोजके प्रश्न नोंदवहीत लिहिताना, निवडतानाही त्या प्रश्नांची ‘संकल्पना’ सारखी असेल तर तुलनात्मक अभ्यासाने गती वाढते. उदा. बारावीच्या भौतिकशास्त्र विषयात ‘टोटल एनर्जी’साठी किमान चार धडय़ांमध्ये  ‘डेरिव्हेशन्स’ आहेत. ते चारही ‘डेरिव्हेशन्स’ एकाच दिवशी तयार केलेत तर तुलना करून दोन ‘डेरिव्हेशन्स’मधील साम्य आणि वेगळेपण लक्षात ठेवणे सोपे जाते व सरावाने ते कायमस्वरूपी लक्षात राहते. शिवाय त्याच सूत्रांवर आधारित गणितेही लगेच सोडवली की चांगली समजतात.
* अनोख्या पद्धतीने उजळणी- आपली दैनंदिन कामे करतानाही डोक्यात सूत्र, व्याख्या, नियम यांची उजळणी करणे सहजशक्य आहे. त्यामुळे अभ्यासाच्या वातावरणात रमायला होते. नुसते ठरवून घडय़ाळी तासांत अभ्यास न करता जमेल तितका जास्त अभ्यास करणे उत्तम.  
* प्रश्नसंचाचा आगळावेगळा उपयोग करा.
साधारणपणे एखाद्या विषयाची चांगली तयारी झाल्यानंतर विद्यार्थी सरावासाठी आधीच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र, असा अभ्यास करताना प्रश्नपत्रिका लिहिण्यास पुरेसा वेळ मिळेलच याची खात्री नसते.
त्याऐवजी ज्या धडय़ाची तयारी त्या दिवशी केली, त्यावर आधारित प्रश्न बोर्डाच्या आजवरच्या प्रश्नपत्रिकांमधून शोधून काढावेत आणि सोडवावेत. खरे तर अनेक पुस्तकांमध्ये धडय़ाखाली आजवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची प्रश्नसूची दिलेली असते. तरीही प्रश्नपत्रिकेतून ते प्रश्न विद्यार्थ्यांने शोधून काढलेले चांगले. त्याचे फायदे पुढीलप्रमाणे होतात-
* अनेक प्रश्नांमधून नेमका त्याच टॉपिकचा प्रश्न ओळखता आल्याने आत्मविश्वास वाढतो आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लक्षात राहते.
* तो टॉपिक साधारणत: किती मार्कासाठी विचारला जातो, साधारणपणे कुठल्या प्रश्न क्रमांकात येण्याची अधिक शक्यता असते याचा अंदाज येतो.
* या पद्धतीमुळे प्रत्येक धडय़ातील प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवून झाल्यामुळे अनेक प्रश्नपत्रिका टप्प्याटप्प्याने पूर्णपणे सोडवून झालेल्या असतात. म्हणजे वर्षांअखेरीस जेव्हा सरावासाठी वेळ लावून बोर्डाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवता, त्या वेळी वेळेचे नियोजनावर भर देता येतो आणि ही पद्धत सगळ्याच विषयांसाठी उपयुक्त ठरते.
* बहुपर्यायी प्रश्न हा प्रश्नपत्रिकेतला अटळ भाग आहे. विद्यार्थी बऱ्याचदा या प्रश्नांना अडखळतात. हे प्रश्न सोडवण्याचे तंत्र वेगळे असते. त्यावर प्रभुत्व मिळवणे आवश्यक असते. सराव अधिक करावा लागतो व वेळेचे व्यवस्थापन नीट व्हावे लागते. त्यामुळे त्याचा रोजच्या रोज सराव अत्यावश्यक आहे.
हे झाले अभ्यासतंत्र विकसित करण्याबाबत. पण याच्या जोडीला शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणेही अत्यावश्यक आहे. अभ्यासाची तयारी करताना मेंदू थकतो. मेंदूचा थकवा घालवण्यासाठी पुरेशी आणि शांत झोप आवश्यक असते. वेळेच्या योग्य नियोजनाने पुरेशी झोप मिळते. शरीर व मन ताजेतवाने राहण्यासाठी सकाळी उठल्यावर पोषक न्याहारी करणे, पचायला हलके, ताजे अन्न खाणे, दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याचाही विचार करावा. दिवसाची सुरुवात हसतमुखाने, आनंदाने करावी. छोटासा एखादा मंत्र म्हणत ‘होय, आजचा हा माझा दिवस यशाचा दिवस आहे’ असे स्वत:ला सांगत दिनक्रम सुरू करावा. कुणाशीही वादविवाद टाळावा. नकारात्मक ताशेरे मारणाऱ्या मित्रमंडळींपासून, नातेवाईकांपासून शक्य तितके लांब राहावे. सकारात्मक घटना आठवाव्यात व आपल्या क्षमतांबद्दल एक कृतज्ञताभाव ठेवावा. कारण कोणाही व्यक्तीचे यश हे अनेक गोष्टींचा एकत्रित परिपाक असतो. यशस्वी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.