सेवाक्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेता सामाजिक गरजांच्या पूर्ततेतून अर्थार्जन करत या क्षेत्रात  स्वयंरोजगाराची संकल्पना साकारता येऊ शकते. त्याविषयी..
सध्या संपूर्ण जग एका मोठय़ा आर्थिक मंदीला सामोरे जात आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशासमोरदेखील मोठी आव्हाने उभी आहेत. यांपैकी सर्वात मोठे आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे. व्यक्तिगत जीवनावरही आर्थिक, सामाजिक व राजकीय समस्यांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत- मूलभूत गरजा व त्यांची बदललेली व्याख्या, कालानुरूप प्रचंड प्रमाणात वाढलेल्या गरजा, संघर्षमय व वेगवान झालेले जीवन,  भौतिक साधनांची वाढलेली मागणी, मनोरंजनाच्या साधनांचा विकास व त्याचा जीवनावर पडलेला प्रभाव,  जाहिरातींमुळे निर्माण झालेली अवास्तव प्रलोभने, भौतिक गरजांचे मूलभूत गरजांमध्ये होत असलेले परिवर्तन व त्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयींचा व व्यवस्थांचा अभाव.
या पाश्र्वभूमीवर सेवा बाजारपेठेची संकल्पना आधारलेली आहे. कमी गुंतवणूक, परिश्रम व सामाजिक गरजांच्या पूर्ततेतून अर्थार्जन यावर स्वयंरोजगाराची संकल्पना आधारलेली आहे. सेवा बाजारपेठेचे क्षेत्र अमर्याद आहे. कमी खर्चात उत्कृष्ट सेवा वेळेवर प्राप्त होत असल्यास शहरी माणूस अशा सेवायोजकांच्या प्रतिष्ठानाला निश्चितच मागणी घालतील यात तिळमात्र शंका नाही. समाजातील वाढत्या गरजा व त्याची परिणामकारक पूर्ती करणाऱ्या प्रातिनिधिक संस्थांकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मुलकी व शहरी समाजाच्या गरजांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. प्रत्येक नवीन सेवांची केंद्र सरकारला पूर्ती करणे व व्यवस्था निर्माण करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. राज्य सरकारलाही समाजाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करता करता नाकी नऊ येताना दिसतात. सातत्याने अपुऱ्या व अकार्यक्षम सेवा मिळत असल्याने समाजाचा कल पर्यायी व्यवस्था शोधण्याकडे दिसून येतो. या संधीचे सोने युवावर्गाला करता येईल.
या संधीचा लाभ सर्जनशील युवावर्गाने उचलणे ही आजच्या काळाची गरज आहे. भारतातील विस्तृत ग्राहकवर्ग, बाजारपेठेतील ग्राहकांची वाढती संख्या, अनिवार्य गरजा पूर्ण करण्याची अपरिहार्यता, सेवांच्या पुरवठय़ाची माहिती व उपलब्धतेचा अभाव या बाबी वैयक्तिक सेवांना उपयुक्त वस्तू म्हणून स्वीकारण्यास कारणीभूत होत आहेत. वैयक्तिक सेवांचे क्षेत्र अमर्याद आहे व त्याचे मूळ मानवी गरजांमध्ये आहे. मानवी गरजा अमर्याद असल्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या विविध सेवा व त्यांच्या पुरवठाव्यवस्थेला अंत नाही. या क्षेत्रात संशोधनालाही बराच वाव आहे. त्यातून नवनवीन संकल्पना, नवीन विचार, समाजाची आवश्यकता व गरजा लक्षात येऊन विविध सेवा क्षेत्रांची निर्मिती करता येऊ शकते.
या लेखात सामान्यपणे ज्ञात असणाऱ्या काही व काही नवीन संकल्पनांचा ऊहापोह केला आहे. त्यासाठी फक्त क्षेत्र निवडले आहे ते खासगी सेवांचे क्षेत्र आहे. त्यातही घरगुती व दैनंदिन गरजांच्या सेवाक्षेत्रांवर भर दिला आहे. कारण त्याचा प्रत्येक संबंध वाढत्या बेरोजगारीशी आहे. प्रचंड मानवी श्रम उपलब्ध असल्यामुळे व्यक्तिगत परिश्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सेवाक्षेत्रांमुळे श्रमाची प्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल व हे सेवाक्षेत्र जास्तीत जास्त किफायतशीर कसे असेल, यावर भर दिला गेला आहे. सेवाक्षेत्राला पुढील चार प्रकारांत विभाजित केले आहे.
दैनंदिन गरजांचे सेवाक्षेत्र
घर स्वच्छ करून देणे, पोळ्या, पराठे, पुरी विक्री, भाजीपाला विक्री, खाण्याचे डबे पुरवणे, बागेची देखभाल, घरपोच किराणा, विचारा व समस्या सोडवा.
घरगुती उपयोगाचे सेवाक्षेत्र
मालीश करणे, शुश्रूषा सेवा, फ्लॉवर अरेंजमेंट, भित्तीचित्रे लावणे, घरी जाऊन स्कूटर/ कार देखभाल, फवारणी करून देणे, स्वयंपाक करून देणे, स्वच्छता सेवा, गृहसजावट, जुन्या कपडय़ांची दुरुस्ती व विक्री, इलेक्ट्रिक/ पाणी/ फोन बिल भरणे, मोबाइल रिचार्ज/ रेल्वे आरक्षण, मत्स्यालय निर्मिती व संगोपन.
समूहांच्या उपयोगाचे सेवाक्षेत्र
मृत्यूनंतरच्या सेवांची पूर्तता, घरगुती समारंभाचे आयोजन, नाल्यांची स्वच्छता व फवारणी, विजेची उपकरणे, दृक्श्राव्य साधने, कुलर, फ्रीज इत्यादीची देखभाल, घाण पाण्याचे व्यवस्थापन, स्थानिक कुरियर सेवा, व्यायामशाळा संचालन, रोपवाटिका संचालन.
सल्लामसलत सेवाक्षेत्र
 खरेदी-विक्रीसंदर्भातील सल्ला, विपणन सल्ला, बाजारपेठ संशोधन, इमेज बिल्डिंग कन्सल्टन्सी, आहार व व्यायाम सल्ला, विवाहपूर्व व विवाहपश्चात मार्गदर्शन, करिअर कन्सल्टन्सी, प्रॉपर्टी, म्युच्युअल फंड, विमा, शेअर्स व इतर संपूर्ण आर्थिक गुंतवणूक सल्ला, निवड व शर्ती प्रक्रिया सल्ला, ब्युटीशियन व मेक-अप सल्ला, वास्तुशास्त्र सल्लागार, कौटुंबिक समस्या सल्लागार.
खासगी सेवाक्षेत्राचे आर्थिक परिणाम
व्यक्तिगत आर्थिक विकासाला चालना मिळेल. दरडोई उत्पन्नात वाढ होईल. नवीन व्यवसाय क्षेत्रामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल. सेवाक्षेत्राला आर्थिक महत्त्व प्राप्त होईल. संसाधनांचा पुरेपूर उपयोग होईल.
खासगी सेवाक्षेत्राचे सामाजिक परिणाम
रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्याने युवकांचा आत्मविश्वास वाढून समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढेल व सामाजिक कार्यातील त्यांचा सहभागही वाढेल. सेवा बाजारपेठेत किफायतशीर दरात समाजसेवा केल्याचे समाधान प्राप्त होईल. सर्जनशील समाजाची निर्मिती, तसेच सामंजस्य व एकात्मतेचे वातावरण निर्माण होईल.
समाजाचे सेवाक्षेत्रावरील अवलंबन दिवसेंदिवस वाढत आहे. या देशात वाढणाऱ्या गरजांमुळे नवीन उद्योजकतेला निश्चितच चालना मिळणार आहे. महत्त्वाकांक्षी शिक्षित व कल्पक उद्योजक यातूनच आपल्या उदरनिर्वाहाचे साधन आगामी काळात यशस्वीरीत्या शोधू शकतो.
सर्व दृष्टिकोनातून विचार केल्यास कमी भांडवल, भरपूर मागणी, खूप परिश्रम करण्यासाठी साहसी व्यक्तीला या नवीन व्यवसायातून उदरनिर्वाहाचे साधन मिळू शकते.
अभ्यासक्रमात अशा प्रकारच्या व्यवसायाची स्वतंत्र माहिती देऊन या व्यवसायाकडे जाण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करता येऊ शकते. सरकारी स्तरावर उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत या व्यवसायाचा प्राधान्याने समावेश करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात.            
ravi_stax@rediffmail.com