आपल्या गुणवत्तेच्या जोरावर वाद्यसंगीतातही वेगळी ओळख निर्माण करणारे एक नाव म्हणजे व्हायोलिनवादक श्रुती भावे. अनेक चित्रपटांच्या पाश्र्वसंगीतातील व्हायोलिनचे सूर छेडणाऱ्या श्रुती यांनी अनेक जाहीर कार्यक्रम आणि रिअ‍ॅलिटी शोसाठीही साथ केली आहे. व्हायोलिनच्या सुरांइतक्याच सुरेल अशा त्यांच्या करिअर प्रवासाबद्दल..

गोड आवाजात स्त्रियांची मक्तेदारी होतीच, पण आता त्या आवाजाला साथ देणाऱ्या वाद्यवृंदातही महिला दिसतात. फक्त दिसतच नव्हेत तर सकारात्मक रीतीने आपले स्थान जाणवून देतात. गुणवत्तेच्या जोरावर वाद्यसंगीतातही आपली ओळख निर्माण करणारे एक नाव म्हणजे व्हायोलिनवादक श्रुती भावे. मराठी/हिंदी चित्रपटांच्या पाश्र्वसंगीतात व्हायोलिनची संगीतसाथ, दूरचित्रवाहिन्यांवर होणारे संगीतविषयक रिअ‍ॅलिटी शो, संगीतविषयक अन्य कार्यक्रमांत (सुगम आणि शास्त्रीय संगीत दोन्ही) संगीतसाथ आणि व्हायोलिनवादनाचे स्वतंत्र कार्यक्रम त्या करतात. गायनात बी.ए.ची पदवी संपादन केलेल्या श्रुती यांनी गाण्यापेक्षा वादनाला अधिक महत्त्व दिले आणि व्हायोलिनवादक म्हणून आपले करिअर घडविले.

भावे कुटुंबीय मूळचे नागपूरचे. घरी संगीताचेच वातावरण. आई सरिता भावे या गायिका. ख्याल, ठुमरी आणि गझल गायकीचे सुरुवातीचे संस्कार त्यांना आईकडून मिळाले. वडील राजेंद्र भावे नोकरी-व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर आणि व्हायोलिनवादकही. तर धाकटा भाऊ श्रीरंग हाही गाणारा. लहानपणी श्रुती यांनी भरनाटय़म् आणि कथ्थक नृत्याचेही प्रशिक्षण घेतले होते. आई-वडिलांनी आग्रह केला म्हणून श्रुती व्हायोलिनकडे वळल्या. वयाच्या सोळाव्या वर्षांनंतर त्यांनी व्हायोलिन शिकायला सुरुवात केली. प्राथमिक धडे वडिलांकडे गिरविल्यानंतर त्यांनी पुढे मिलिंद रायकर, कला रामनाथ आणि पं. डी.के. दातार यांच्याकडेही व्हायोलिनचे शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात सुगम संगीतासह नाटय़संगीतासाठीही त्यांनी व्हायोलिनची संगीतसाथ केली. ‘सूरश्री’, विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठानच्या विविध कार्यक्रमांतूनही त्यांनी व्हायोलिनवादक म्हणून सहभाग नोंदविला. संगीतकार कमलेश भडकमकर यांनी दूरचित्रवाहिनीवरील  एका लोकप्रिय संगीतविषयक रिअ‍ॅलिटी शोसाठी व्हायोलिनवादक म्हणून संधी दिली. हळूहळू व्हायोलिनवादक म्हणून श्रुती यांचे नाव आणि कीर्ती सर्वदूर पसरली.

पाश्चिमात्य आणि भारतीय अशा दोन्ही संगीतांतील सूर त्या व्हायोलिनवर छेडतात. त्यांच्या व्हायोलिन करिअर प्रवासात  ‘इंडिवा’ या सर्व महिलांचा सहभाग असलेल्या बॅण्डला महत्त्वाचे स्थान आहे. व्हायोलिनवादक आणि गायिका म्हणून त्यांना या बॅण्डमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. या बॅण्डमधील अनुभवामुळे त्या फोक फ्यूजन, जागतिक संगीत, पॉप आदी पाश्चिमात्य प्रकारचे संगीतही व्हायोलिनवर वाजवितात. भारतीय शास्त्रीय संगीत तर आहेच आहे.

श्रुती यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरला झाले. पुढे वडिलांची मुंबईत बदली झाल्यामुळे त्या मुंबईला आल्या. वसईची विद्या विकासिनी शाळा, बोरिवलीचे अभिनव विद्या मंदिर आदी शाळांमधून त्यांचे शिक्षण झाले. एसएनडीटी विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (गायन) आणि एम.ए. (व्हायोलिन विषयात) केले. गाण्यात बी.ए. केले असले तरी पुढे त्या आई-वडिलांच्या आग्रहामुळे व्हायोलिनकडे वळल्या. त्यांनाही व्हायोलिनमध्ये गोडी निर्माण झाली, पुढे चांगली संधी, काम मिळत गेले आणि व्हायोलिनवादक म्हणूनच करिअर करण्याचे त्यांनी ठरविले.

श्रुती म्हणतात, अनुभव हा आपला खरा गुरू असतो. त्यातूनच स्वत:ला घडवीत आणि शिकत गेले. हळूहळू प्रगती झाली. व्हायोलिनवादक म्हणून माझी स्वतंत्र ओळख निर्माण झाली. माझे आई-बाबा माझ्यासाठी योग्य समीक्षक आणि टीकाकार आहेत. त्यांना माझ्या व्हायोलिनवादनाचे कौतूक आहेच. पण त्यांच्यातील समीक्षक- टीकाकारामुळे मलाही माझ्यात सुधारणा करता येतात, नवे शिकता येते.

बॉम्बे टॉकीज या बॉलीवूडमधील सिनेमात चार गोष्टी दाखवल्या गेल्या होत्या. या वेगळ्या प्रयोगातील ‘मुरब्बा’ या गोष्टीसाठी दिलेल्या पाश्र्वसंगीतातील व्हायोलिन सुरावटी श्रुतीनी छेडल्या होत्या.  विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या गाजलेल्या एका जाहिरातीत व्हायोलिनचे सूर श्रुती यांनी छेडले होते. ‘टाइमपास’ (एक आणि दोन), ‘यलो’ आदी मराठी चित्रपटांच्या पाश्र्वसंगीतासाठीही त्यांनी व्हायोलिनची संगीतसाथ केली. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेच्या शीर्षकगीतासाठी वैशाली भैसने-माडे यांच्याबरोबर श्रुती यांनीही आपला आवाज दिला.

व्हायोलिनमुळे गाणे कुठेतरी मागे पडले, असे श्रुतीना कुठेतरी नक्कीच वाटते. खरेतर एकाच वेळी गायन आणि वादन करणे हे आव्हानात्मकच आहे. पण आता व्हायोलिनसह गाण्यावरही लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा विचार आहे.

कार्यक्रमात व्यासपीठावर व्हायोलिनवादक म्हणून प्रेक्षक जेव्हा आपल्याला पाहतात तेव्हा अनेकांना शंका येतात, ही काय साथ करणार? पण वादन ऐकल्यावर त्यांचा गैरसमज दूर होतो. पण बरेच प्रेक्षक कौतुकही करतात, असे श्रुती आवर्जून सांगतात.

यशासाठी योग्य गुरू आणि मार्गदर्शनाला पर्याय नाही. आपल्यालाही शिकण्याची जिद्द, ध्यास असायला हवा. प्रचंड मेहनत घेण्याची तयारी हवी. पटकन मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संगीतात करिअर करायचे तर त्याचा पाया पक्का हवाच. शास्त्रशुद्ध शिक्षणही हवेच. – श्रुती भावे, व्हायोलिनवादक

– शेखर जोशी

shekhar.joshi@expressindia.com