ज्ञान संपादन करण्यासाठी फक्त परीक्षार्थी असणं पुरत नाही. काय शिकायचंय, तेही स्पष्ट जाणवावं लागतं. करिअरचा ‘टेक ऑफ’ घेताना स्वत:ला सिद्ध करावं लागतं. त्यासाठी पात्रतेला क्षमतेमध्ये बदलण्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि केलेला अभ्यास व्यक्त करण्याची हातोटी असावी लागते.

‘तुम्ही सगळे आता कॉलेजात गेला आहात. कॉलेजमधली मुलं जशी वागतात तसे वागत आहात,’ संमोहकाने आज्ञा दिली. संमोहनाचा (हिप्नॉटिझम) प्रयोग पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमधलेच सात-आठ जण संमोहित होण्यासाठी स्वेच्छेनं व्यासपीठावर गेले होते. त्यांच्यात लहान-मोठे सर्व वयांचे स्त्री-पुरुष होते. संमोहकाच्या आज्ञेनंतर कुणी अचानक त्याच्या काळातली गाणी म्हणायला लागला, कुणी पुस्तक वाचायला लागली, कुणी कबड्डी खेळू लागला, असं प्रत्येक जण काही ना काही करत होता.
 महाविद्यालयीन आयुष्यातल्या एकेकाच्या कल्पना आणि आठवणी त्यांच्या वागण्यातून व्यक्त होत होत्या. प्रेक्षागृह धोधो हसत होतं. सर्वात मजा आली, ती एका १०-११ वर्षांच्या छोटय़ा मुलाची. संमोहकानं आज्ञा दिल्याबरोबर मुलानं एकदम सिनेमातल्या रुबाबदार हीरोसारखी पोझ घेतली आणि सिगारेट ओढण्याची आणि धूर सोडण्याची अ‍ॅक्शन तो न थांबता करत राहिला. ‘महाविद्यालय म्हणजे रुबाबात सिगारेट ओढण्याचं स्वातंत्र्य’ अशा स्वत:च्याच कल्पनेत तो दंग होता, ते स्पष्ट दिसत होतं.     
‘महाविद्यालय’ या एकाच शब्दानं प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं होतं. आम्हा प्रेक्षकांच्या धोधो हसण्यामागे, धमाल वाटण्यासोबत आणखी एक वेगळी जाणीव होती, ती न अनुभवलेल्या विश्वाबद्दलच्या आपल्या अव्यक्त रोमँटिक कल्पनांची. एखाद्या विषयाबद्दल प्रत्येकाच्या मनातली धारणा (पस्रेप्शन) किती वेगवेगळ्या असू शकतात, याचं ते एक प्रात्यक्षिकच होतं.
कुठल्याही नव्या ठिकाणच्या पदार्पणात आपल्यासोबत अशा काही धारणा असतात. दहावी, बारावी किंवा पदवीची परीक्षा होते. आपण आपल्या अपेक्षेप्रमाणे किंवा थोडय़ाफार कमी-जास्त गुणांनी तो पडाव पार करून पुढच्या वेगळ्या विश्वात प्रवेश करतो. दहावीनंतर महाविद्यालय, बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम आणि पदवीनंतर नवीन नोकरी-व्यवसाय हे तीनही टप्पे असेच असतात. तोपर्यंत अनेक वेळा आपण त्या अनोळखी जगताबद्दल विचार केलेला असतो, स्वप्नं पाहिलेली असतात. कधी चित्रपटांतून, कधी संबंधितांकडून ऐकून, तर कधी वाचनातून, इकडून तिकडून मिळालेल्या माहितीतून आपल्या काही धारणा बनलेल्या असतात. मनात कुतूहल घेऊन उत्सुकतेनं नव्या जगात आपण पाऊल टाकतो आणि आपल्या कल्पनेपेक्षा वास्तव बरंच वेगळं असलेलं जाणवतं. कालपर्यंतच्या आपल्या मानसिकतेत, विचारांत, आचारांत या टप्प्यांवर मूलभूत बदल घडतात. मनात सांभाळलेल्या अनेक कल्पनांना ‘वल्ल’ि करत करत पुढे जावं लागतं, वास्तव समजून घेत आत्मसात करावं लागतं, नव्या ठिकाणी रुळावं लागतं.
नवख्या टप्प्यावरची प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी असते. उत्सुकता असते, उत्साह असतो, पण गोंधळलेपणही असतं. आनंदासोबतच ‘आपल्याला जमेल ना?’ अशी हुरहुर लावणारी भीतीही असते. नवखेपणातून बाहेर येऊन आपण या माहोलामध्ये लवकरात लवकर रुळायला शिकणं हा पुढे जाण्याचा रस्ता असतो.
 हे रुळणं सगळ्या विषयांबाबत असतं. समजा, आपण पोहायला शिकतो आहोत. पहिल्या दिवशी आपण तलावाच्या काठावर उभे असतो. समोरच्या पाण्याकडे, पट्टीच्या पोहणाऱ्यांकडे, त्यांच्या सहज हालचाली, सराईत कौशल्यांकडे आपण डोळे विस्फारून पाहात असतो. ‘इथपर्यंत कुठले आपण पोहोचायला?’ असं मनात येतं. पाण्यात चांगलीच थंडी वाजणार असंही वाटतं. तोपर्यंत आपल्याबरोबरचे एक-दोघं फटाफट उडय़ा मारतात. आपल्याला आणखीनच भीती वाटते. नकळत आपला पाय मागे सरकतो आणि अचानक, आपला एखादा मित्र/मैत्रीण आपल्याला मागून पाण्यात ढकलतात. क्षणभर ब्रह्मांड आठवतं. पाण्याच्या अनपेक्षित थंड स्पर्शानं शिरशिरी येते, पण पाण्यात पडल्यावर हातपाय आपोआप हलायला लागतात. तोपर्यंत प्रशिक्षक दिसतो किंवा त्याचा आवाज ऐकू येतो, पायही खाली टेकतात. आपल्याला कळतं, ‘एवढंही अवघड नाही हे. जमेल आपल्याला’. पुढच्या वेळी कुणी ढकलावं लागत नाही. उलट चांगल्या उडय़ा मारणाऱ्यांच्या पोझचं आपण निरीक्षण करायला लागतो. एकदा भिजल्यावर पाण्यात उबदार वाटतं आणि बाहेर थंडी वाजते हे सत्य तेव्हाच उलगडतं. तसंच, आपणहून उडी मारण्याचा आपला स्वभाव नसेल तर योग्य वेळी मागून पाण्यात ढकलणारा मित्र असावा लागतो, हेही सत्य उमगतं. थोडय़ाच दिवसांनी, काठावर उभे असलेले नवखे आता आपल्याकडे डोळे विस्फारून पाहात असतात, तेही आपल्याला जाणवत नाही.
शिकायचं असेल तर लवकरात लवकर प्रवाहात शिरायचं हे एक सार्वत्रिक तत्त्व आहे. कुठल्याही नवख्या माहौलमध्ये शिरताना ते उपयोगी पडतं. त्याचं तंत्र सोपं आहे. महाविद्यालयीन वयात विविध प्रकारच्या स्पर्धा असोत किंवा कामाच्या ठिकाणी नवं प्रोजेक्ट जाहीर झालेलं असो, आपला हात ताबडतोब वर व्हायला हवा. ‘मला हे जमेल का?’ या भीतीला आपल्यावर स्वार व्हायची संधीच द्यायची नाही. एकदा उडी मारलीच आहे म्हटल्यावर भीतीची जागा आपोआप जबाबदारी घेते. त्या पात्रतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण नियोजन करायला लागतो. प्रयत्नांना लागल्यानंतर त्याच नव्या माहोलामध्ये आपण सराईतासारखे कधी वावरायला लागलो, ते आपल्यालासुद्धा कळत नाही.
हे का घडतं? तर काहीतरी लक्ष्य ठरवल्यामुळे आपल्याला फोकस मिळतो. फोकसमध्ये नेमकेपणा आणि निरीक्षण असतंच, पण फोकस म्हणजे आपल्याला नको असेल ते निवडून गाळायला शिकणं आणि जे हवं आहे त्यावर सर्व शक्ती केंद्रित करणं. हे दोन्ही साधणं फोकस मिळवण्यामध्ये आहे, हे आपल्याला अनेकदा लक्षात येत नाही. कधी आपला फोकस आपल्याच आतून ऊर्मीसारखा येतो, कधी आईवडील, मित्र आपल्याला दिशा देतात, तर कधी एखादा गुरू भेटतो.
आजपर्यंत मिळालेल्या अनुभवांच्या प्रतलाप्रमाणे बहुतेकांची स्वप्रतिमा बनलेली असते. तिला डोळसपणे तपासून पाहणंही आपल्याला अनेकदा पुढचा रस्ता दाखवत असतं.
तालुक्याच्या गावातून शहरात आलेल्या एका मुलीचा अनुभव मला या संदर्भात शेअर करावासा वाटतो. ती म्हणाली, ‘मी गावात असताना गाण्याच्या तीन परीक्षा दिल्या होत्या. रागांचे आरोह-अवरोह, पकड-विस्तार, आलाप-ताना पाठ करायच्या, त्यातला एक राग जास्त चांगला करायचा, तेवढय़ावर प्रथम श्रेणी मिळायची. मात्र गावात शास्त्रीय संगीताचं मुळीच वातावरण नव्हतं. त्यामुळे फारसं काही ऐकलंही नव्हतं. रागविस्तार पाठ करायचा नसतो, आपण करायचा असतो हेसुद्धा माहीत नव्हतं. तबला फक्त परीक्षेच्या आधी आठवडाभर मिळायचा, पण गावात तेवढंच होतं. त्यामुळे त्या वेळी त्यात काही कमी वाटायचं नाही. शिवाय शाळेत माझी खूप वट होती. माझ्याशिवाय स्नेहसंमेलन पूर्णच व्हायचं नाही. या सगळ्यातून गर्व नसला तरी ‘आपण चांगलं गातो’ एवढं तर स्वत:बद्दल वाटतच होतं. शिकण्यासाठी शहरात आल्यावर मी उत्साहानं एका प्रथितयश गायिकेकडे गाणं शिकण्यासाठी गेले. पाचवी-सहावीतल्या छोटय़ा मुलींना त्या शिकवत होत्या. अजून परीक्षेलापण न बसलेल्या त्या विद्याíथनींची गाण्याची समज आणि तयारी पाहिल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्याला तर काहीच येत नाही, बाई आपल्याला स्वीकारणारच नाहीत याची खात्री झाली; पण त्या म्हणाल्या, तुला सुराची जाण आहे. तुझ्या गाण्याच्या परीक्षा झाल्यात किंवा पुढे आणखी द्यायच्यात, हे थोडे दिवस विसरून जा. नव्यानं शीक. त्यांनी थोडे दिवस फक्त स्वर लावण्यावर भर दिला. एखादाच स्वरसमूह त्या तासभर गायला द्यायच्या. मीही स्वत:ला सात स्वरांवर एकाग्र केलं आणि एके दिवशी तानपुऱ्याच्या तारेतून वाजतो तसा लखलखीत पंचम माझ्या गळ्यातून निघतोय, हे माझं मलाच जाणवलं. तो क्षण साक्षात्काराचा होता. मी कुठे आहे आणि कुठे पोहोचायचं आहे ते मला स्पष्ट दिसलं. आत्तापर्यंत केली ती नुसतीच मुशाफिरी होती. गाण्याच्या तेजाला स्पर्श करण्याची पात्रता आज माझ्यात आली होती. त्या दिवशी मला गाणं दिसलं. खरा प्रवास तिथून सुरू झाला..’
ज्ञानाचं असं असतं. फक्त परीक्षार्थी असणं पुरत नाही. काय शिकायचंय, तेही स्पष्ट दिसावं लागतं. त्यासाठी आपली क्षमता समजणारा आणि शांतपणे तिथे जायला मदत करणारा गुरू भेटला तर ही वाट सुकर आणि आनंदाची होते. गुरू भेटलेलादेखील आपल्याला समजावा लागतो. त्यांचं म्हणणं समजून, स्वीकारून त्याप्रमाणे प्रयत्न करण्याची आपली तयारी असावी लागते. या सगळ्यातून हळूहळू पात्रता निर्माण होते. जेवढय़ा जास्त जणांकडून आपण त्याची दृष्टी घेतो आणि तिला परिश्रमांची जोड देतो तेवढे आपण वाढत जातो. गुरू कोणीही असू शकतं. खूप गुरू असणं याचाच अर्थ आपण अनुभवांना शिकण्यासाठी वापरत आहोत असा असतो.
या गोष्टी अनुभवातूनच कळतात. नवीन टप्प्यावर उभं असताना नवखेपणाच्या अस्वस्थतेमुळे आणि गोंधळल्यामुळे अनेकदा आपण खोलवराचं भान घेतच नाही. ‘एवढे दिवस वाट पाहात होतो त्या टप्प्यापर्यंत पोहोचलो. आता आपण अमुक करू, तमुक करू’ असे अनंत विचार मनात उलटसुलट फिरत असतात.
आपल्या मनाला आकाशाकडे झेपावणारा विमानाचा थेट ‘टेक ऑफ’च दिसत असतो. विमानतळावर थांबलेल्या स्थितीपासून टेक ऑफपर्यंतच्या पायऱ्यांचा आपण विचार केलेला नसतो. हळूहळू वळणं घेत रन-वेची दिशा धरणं, संथपणे चालत रन-वेपर्यंत पोहोचणं, मग शून्य वेगापासून धुमधुम धावत टेक-ऑफसाठी आवश्यक असणाऱ्या वेगापर्यंत पोहोचणं आणि बरोब्बर त्या क्षणाला जमीन सोडून अवकाशात झेपावत योग्य उंचीवर स्थिरावणं हे सगळे टप्पे मुक्त अवकाशात विहरण्यापूवी विमानानं घेतले असणार याचा अंदाज असला तरी प्रत्यक्ष अनुभवल्यानंतरच ते नीट समजतं. माहोलाशी परिचित होणं, झटकन पुढे व्हायला शिकणं, मित्र आणि गुरू मिळवणं या बाजूबाजूच्या गोष्टी सुरुवात करताना महत्त्वाच्या असतात, कारण त्या आपल्या मनातल्या अस्वस्थतेला स्थिरता देतात, पात्रतेकडे नेणारी वाट दाखवतात. टेक ऑफसाठी पुढची पायरी असते ती सिद्धतेची. पात्रतेला क्षमतेमध्ये बदलण्याची, ज्यासाठी अभ्यास लागतो आणि केलेला अभ्यास व्यक्त करण्याची हातोटी.