कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारच्या विविध कार्यालय आस्थापनांमध्ये स्टेनोग्राफर्सची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्टेनोग्राफर निवड परीक्षा-२०१३ साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे.
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय २७ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २९ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
निवड परीक्षेत लघुलेखनाचा १०० शब्द प्रतिमिनिट या पात्रता निकषाचा समावेश असेल. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून १०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत भरावेत अथवा निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी केंद्र सरकारची रिक्रूटमेंट तिकिटे लावावीत.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ सप्टेंबर- ४ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा कर्मचारी निवड आयोगाच्या http://ssc.online.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि टपाल-तिकिटांसह असणारे अर्ज महाराष्ट्रातील उमेदवारांनी क्षेत्रीय निदेशक- पश्चिम क्षेत्र, कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई – ४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०१३.
बारावी उत्तीर्ण, लघुलेखन व संगणक पात्रताधारक उमेदवारांना केंद्र सरकारच्या सेवेत दाखल होण्यासाठी या निवड परीक्षेचा लाभ होऊ शकतो.