आनंदी जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी व्यक्तीमध्ये बुद्धिमत्तेसोबत भावनिक संतुलन असावे लागते. सुखाने जगण्यासाठी ही भावनिक बुद्धिमत्ता स्वत:त आणि आपल्या मुलांमध्येही जोपासणे किती आवश्यक असते, याचा समग्र विचार डॉ. संदीप केळकर यांच्या ‘जावे भावनांच्या गावा’ या पुस्तकात करण्यात आला आहे. एक संवेदनक्षम व्यक्ती घडवण्यासाठी आणि पर्यायाने सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी मुलांमध्ये भावनिक आत्मभान निर्माण करणे किती आवश्यक असते, याचा चौफेर विचार या पुस्तकात करण्यात आला आहे.
आज बदलत्या वातावरणात सारेच अस्वस्थ आहेत- पालकही आणि मुलंही! पालकत्व निभावताना पालकांपुढील आव्हानांची यादी लांबत जातेय आणि मुलांसमोरील अनुत्तरित प्रश्नांची संख्याही! बदललेली कुटुंबव्यवस्था, प्रसारमाध्यमांचा वाढता प्रभाव, वाढलेली जीवघेणी स्पर्धा या साऱ्यामुळे मुलामुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय. शिस्त, मोकळीक, गॅजेट्स, मूल्यव्यवस्था यासंदर्भात पालकांच्या मनात संदेह आहे. अशा वेळेस पालकांनी काय करायला हवं, त्याहीपेक्षा कसं करायला हवं, हे नेमकेपणाने डॉ. केळकर यांच्या ‘जावे भावनांच्या गावा’ या पुस्तकात सांगितले आहे. या पुस्तकातील चार विभागांमध्ये भावना, भावनिक बुद्धिमत्ता या महत्त्वपूर्ण संकल्पना विशद केल्या आहेत आणि त्यांना पालकत्व निभावताना कसा उपयोग करायचा, हेही सांगितले आहे.
आजची मुलं स्मार्ट आहेत, हे जसं अभिमानाने सांगितलं जातं, तसंच त्यांच्यात भावनिक उद्रेक वाढत चालला आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. भोवतालची परिस्थिती, आयुष्यातील ताणतणाव, वाटय़ाला येणारे चढ-उतार यांना तोंड देण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी पालक म्हणून आपण काय करू शकतो, याचा विचार या पुस्तकात करण्यात आला आहे. मुलं जबाबदार आणि आनंदी होण्यासाठी त्यांचा भावनांक वाढवण्याचं महत्त्व डॉ. केळकर यांनी या पुस्तकात अधोरेखित केलं आहे. या पुस्तकातील भावनांच्या भाषेची मशागत, भावनिक सुजाण पालकत्व, टीन एजर्सच्या विश्वात आणि जग भावनांचं, बुद्धय़ांकापलीकडचं या चार स्वतंत्र विभागांत भावना आणि भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पना पालकत्व निभावताना दैनंदिन आयुष्यात कशा उपयोगात आणता येतील, हे सुलभरीत्या स्पष्ट केले आहे. मुलांच्या भावनांगणात प्रवेश मिळवण्यासाठी, त्यांचं भावनिक विश्व समजून घेण्यासाठी आणि त्यांना भावनिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी हे पुस्तक वाचणं ‘मस्ट’ ठरतं.
जावे भावनांच्या गावा – डॉ. संदीप केळकर, राजहंस प्रकाशन, पृष्ठे -१९२, किंमत – १५० रु.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2012 10:54 am