29 February 2020

News Flash

विद्यापीठ विश्व : अक्षरविश्वातील अव्वल शिक्षणकेंद्र

पीएसएल - पॅरिस सायन्स अ‍ॅण्ड लेटर्स युनिव्हर्सिटी

पीएसएल – पॅरिस सायन्स अ‍ॅण्ड लेटर्स युनिव्हर्सिटी

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख

साहित्य आणि शास्त्रातील शिक्षण-संशोधनासाठी जागतिक स्तरावर परिचित असलेले फ्रान्समधील पॅरिस सायन्स अ‍ॅण्ड लेटर्स हे विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ पीएसएल या आद्याक्षरांद्वारेही ओळखले जाते. राजधानी पॅरिसमधील ते एक प्रमुख शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जागतिक क्रमवारीत या विद्यापीठाचा पन्नासवा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना अगदी अलीकडे  म्हणजे २०१० साली झालेली आहे. पीएसएल हे संशोधन आणि उच्चशिक्षण प्रदान करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे. सध्या येथे साडेचार हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास वीस हजार पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास २२ टक्के विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत.

अभ्यासक्रम

या विद्यापीठात सध्या नऊ प्रमुख शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत. पुढील काळात अजून दहा विभाग वाढण्याची शक्यता आहे. पीएसएलच्या स्वतंत्रपणे कार्यरत असलेल्या १८१ संशोधन प्रयोगशाळा आहेत. याशिवाय विद्यापीठाकडे युरोपियन रिसर्च कौन्सिलच्या १०१ विषयांचा राखीव संशोधन निधी उपलब्ध आहे. विद्यापीठामध्ये असलेल्या विविध विभागांमध्ये अभियांत्रिकी, विज्ञान, कला, मानवता, नाटक, पृथ्वी विज्ञान, धार्मिक अभ्यास आणि संशोधन आदी विभाग आहेत. या विभागांमध्ये मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, अर्थशास्त्रीय इतिहास, फ्रेंच संस्कृती, भूगोल, पर्यावरण, जागतिक घडामोडी, प्रशासन, आरोग्यविषयक धोरणे, जागतिक इतिहास, वैश्विक विकास, वैश्विक संबंध, भाषा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, माध्यमे आणि संप्रेषण, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, सामाजिक धोरणे, सार्वजनिक धोरणे, समाजशास्त्र अशा ठरावीक विषयांचा समावेश आहे.

पीएसएलच्या पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी तीन ते चार वर्षांचा आहे तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा कालावधी वेगवेगळा आहे. विद्यापीठ या सर्व विभागांच्या माध्यमातून सर्व पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रम चालवते. याशिवाय पीएसएलकडे प्रोफेशनल आणि ऑनलाइन सर्टििफकेट कोर्स यांसारख्या अभ्यासक्रम पर्यायांची उपलब्धता आहे. पदवी वा पदव्युत्तर स्तरावर विषय निवडीसाठी विद्यापीठाचे स्वतंत्र कार्यालय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आयईएलटीएस, जीआरई, टोफेल, सॅट,जीमॅट यांसारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

सुविधा

पीएसएलकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. या विद्यापीठातील विविध विभागांकडून विद्यार्थ्यांना अर्धवेळ कामाच्या अनेक संधी विद्यापीठाच्या आवारातच उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत. तसेच संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा विद्यापीठाने आवारात तयार केलेल्या आहेत. विद्यापीठाच्या आवारातच एकूण ९५ ग्रंथालये आणि म्युझियम्स आहेत. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकूण ६८,००० रिसर्च जर्नल्स वापरण्याची सुविधा आहे. विद्यापीठाने आपल्या परिसरात विद्यार्थ्यांना विविध दरांमध्ये वेगवेगळ्या सोयींसह वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय विद्यार्थी खासगी निवासाचा पर्यायही निवडू शकतात. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी करिअर मार्गदर्शन केले जाते. विद्यापीठाच्या आवारात उपाहारगृह, वैद्यकीय केंद्र आणि इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याशिवाय कॅम्पसमध्येच व्यायामशाळा, विविध क्लब्स इत्यादी सोयींसह सर्व खेळांच्या सुविधा स्थित आहेत.

वैशिष्टय़

या विद्यापीठामधील प्राध्यापक वर्ग हा जागतिक दर्जाचा आहे. प्राध्यापक वर्गामध्ये एकूण सव्वीस नोबेल विजेत्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ७५ मॉलियर पुरस्कार विजेते तर ४४ सिसर पुरस्कार विजेते या विद्यापीठाने तयार केलेले आहेत. संशोधनावर सातत्याने लक्ष केंद्रित असल्याने येथील विद्यार्थी-प्राध्यापक वर्गाने आतापर्यंत ३८४ पेटंट मिळवले आहेत. विद्यापीठ अगदी नवीन असून शिवाय मर्यादित संख्या असूनही विद्यापीठातील सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी माजी विद्यार्थी पुढाकार घेत आहेत. त्यामुळेच विद्यापीठातील विविध विभाग जवळपास अडीच हजार औद्योगिक कंपन्यांशी जोडले गेलेले आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत १३७ स्टार्टअप्स सुरू केली आहेत.

संकेतस्थळ https://www.psl.eu/en

First Published on December 17, 2019 2:31 am

Web Title: university information psl research university paris sciences and letters zws 70
Next Stories
1 महाराष्ट्र विधानसभा चालू घडामोडी
2 एमपीएससी मंत्र : कृषी सेवा परीक्षा सामान्य अध्ययन प्रश्न विश्लेषण
3 उपयुक्ततावाद आणि त्यातील बारकावे
X
Just Now!
X