News Flash

विद्यापीठ विश्व : कॅनडातील शिक्षणकेंद्र ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ

ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या दोन्ही कॅम्पसमध्ये विविध प्रकारच्या सुविधांची रेलचेल आहे.

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख – कॅनडामधील तीन प्रमुख राष्ट्रीय विद्यापीठांपैकी एक असलेले ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ (युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया-यूबीसी) हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले सत्तेचाळिसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील व्हॅनकुवर आणि केलोना या दोन शहरांमध्ये या विद्यापीठाचे मुख्य कॅम्पस स्थित आहेत. या विद्यापीठाची स्थापना १९०८ साली करण्यात आली. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. विद्यापीठामध्ये सध्या पाच हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास ६५ हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या व्हॅनकुवर कॅम्पसमध्ये एकूण १२ तर केलोना कॅम्पसमध्ये सात प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग आहेत. सध्या १४० देशांमधून आलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी या विद्यापीठामध्ये शिकत आहेत.

अभ्यासक्रम –  ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील बहुतांश पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे पूर्णवेळ आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम आहेत तर पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. विद्यापीठाच्या दोन्ही कॅम्पसमध्ये वेगवेगळे शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत. केलोना कॅम्पसमधील विभागांमध्ये क्रिएटिव्ह अ‍ॅण्ड क्रिटिकल स्टडीज, एज्युकेशन, इंजिनीअरिंग, हेल्थ अ‍ॅण्ड सोशल डेव्हलपमेंट, आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, मॅनेजमेंट, मेडिसिन आणि ग्रॅज्युएट स्टडीज या प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. तर व्हॅनकुवर कॅम्पसमध्ये अ‍ॅप्लाइड सायन्सेस, आर्किटेक्चर अ‍ॅण्ड लँडस्केप आर्किटेक्चर, आर्ट्स, ऑडिओलॉजी अ‍ॅण्ड स्पीच सायन्सेस, बिझनेस, कम्युनिटी अ‍ॅण्ड रिजनल प्लानिंग, डेंटिस्ट्री, फॉरेस्ट्री, जर्नलिझम, फूड सिस्टम्स, मेडिसिन, नìसग, मिड वाईफरी अ‍ॅण्ड सोशल वर्क, ऑप्टॉमेट्री अ‍ॅण्ड ऑप्थॅल्मॉलॉजी, फार्मसी, सायकोलॉजी, स्पीच अ‍ॅण्ड लँग्वेज थेरपी, सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, अर्थ अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल सायन्स, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग, लॉ, सोशल सायन्सेस, एन्व्हायर्नमेंट, एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट यांसारख्या अनेक विभागांचा समावेश आहे. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील पदव्युत्तर स्तरावरील प्रवेश आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अतिशय स्पर्धात्मक आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी येथील पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी त्या-त्या स्तराप्रमाणे द्याव्या लागणाऱ्या परीक्षा वेगवेगळ्या असतील. येथे प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षांसह विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही उत्कृष्ट असणे आवश्यक आहे.

सुविधा – ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या दोन्ही कॅम्पसमध्ये विविध प्रकारच्या सुविधांची रेलचेल आहे. विद्यापीठाच्या व्हॅनकुवर कॅम्पसमध्ये यूबीसी पॉइंट ग्रे वसतिगृहामध्ये दहा हजारांहूनही अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय केलेली आहे. विद्यापीठाच्या दोन्ही कॅम्पसमधील ग्रंथालये व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच कॅफेटेरिया व रेस्टॉरंट्स आहेत. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाकडून विविध स्वरुपात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी युबीसी बुकस्टोअर, युबीसी एक्स्टेंडेड लìनग सेंटर, जपानी बगीचे, म्युझियम्स याशिवाय हेल्थ सर्व्हिस सेंटर व विद्यापीठाचे रुग्णालय, आंतरराष्ट्रीय हेल्थ इन्शुरन्स, पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीपूर्व तयारी अभ्यासक्रम, करिअर सपोर्ट सुविधा आणि वर्क परमिट यांसारख्या इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. ‘थंडरबर्ड’ आणि ‘हिट व्हर्सटिी’ या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धामुळे क्रीडा क्षेत्रातही विद्यापीठाचा दबदबा आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या सर्व गोष्टींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या दोन्ही आवारात मिळून एकूण ३७० क्लब्ज वा रिक्रिएशन्स आहेत.

वैशिष्टय़

ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या विद्यार्थी व प्राध्यापकवर्गामध्ये आठ नोबेल पुरस्कार विजेते आहेत. कॅनडाचे सध्याचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्यासहित कॅनडाचे एकूण तीन पंतप्रधान या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. याशिवाय माजी विद्यार्थ्यांमध्ये ७ ऱ्होडस स्कॉलर्स, ६५ऑलिम्पिकविजेते आणि रॉयल सोसायटीमधील दहा फेलोजचा समावेश आहे. या विद्यापीठात होणाऱ्या पाणी आणि पर्यावरणाशी संबंधित संशोधनाला जागतिक स्तरावर गौरवले गेले आहे.

संकेतस्थळ : https://www.ubc.ca/

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 3:18 am

Web Title: university of british columbia canada india education council zws 70
Next Stories
1 व्यक्तिविशेष सराव प्रश्न
2 पंचायत राज
3 महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा पूर्व परीक्षा
Just Now!
X