X

विद्यापीठ स्थापनेची मुहूर्तमेढ : कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता

संकुले आणि सुविधा - कोलकाता शहर आणि परिसरामध्ये कलकत्ता विद्यापीठाची अनेक संकुले कार्यरत आहेत.

|| योगेश बोराटे

संस्थेची ओळख – स्वातंत्र्यपूर्वकालीन भारतामध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या पहिल्या तीन विद्यापीठांमध्ये कालानुक्रमे कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या विद्यापीठांचा विचार केला जातो. सध्याच्या कोलकाता शहरामध्ये (त्या काळचे कलकत्ता) २४ जानेवारी, १८५७ साली सुरू झालेले कलकत्ता विद्यापीठ हे त्या अर्थाने भारतातील पहिले विद्यापीठ ठरते. त्यापाठोपाठ देशात मुंबई आणि मद्रास विद्यापीठाची अधिकृत स्थापना आणि त्यांच्या कार्याची सुरुवात झाली. ईस्ट इंडिया कंपनीने, पर्यायाने ब्रिटिशांनी भारतामध्ये विद्यापीठांच्या स्थापनेसाठी सुरू केलेल्या प्रक्रियेच्या आधाराने या विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला युनिव्हर्सटिी ऑफ लंडनमधील कामाच्या स्वरूपानुसार कलकत्ता विद्यापीठाच्या कामाची सुरुवात झाली. त्यामध्ये नंतरच्या काळात कालानुरूप बदल होत गेले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या विद्यापीठाच्या कार्याला सुरुवात झाल्याने, त्या वेळी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार हा सध्याच्या बांगलादेशामध्येही होता. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि बांगलादेशाच्या निर्मितीनंतरच्या टप्प्यावर हा विस्तार देशातील काही राज्यांसाठी विचारात घेतला गेला. आसामसारख्या राज्यांमधून स्वतंत्र विद्यापीठांच्या स्थापनेनंतर हे विद्यापीठ पश्चिम बंगालमधील शिक्षण विस्तारासाठी धोरणे राबवू लागले. सध्या पश्चिम बंगालमधील काही जिल्हे या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा भाग ठरतात. ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे ठरणारे हे विद्यापीठ यंदाच्या  ‘एनआयआरएफ’च्या मानांकनामध्ये देशात चौदाव्या स्थानी आहे. याच क्रमवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये जादवपूर विद्यापीठाखालोखाल कलकत्ता विद्यापीठाचाच क्रमांक लागतो. विशेष म्हणजे ही दोन्ही विद्यापीठे सध्याच्या कोलकाता शहरामध्येच वसलेली आहेत.

संकुले आणि सुविधा – कोलकाता शहर आणि परिसरामध्ये कलकत्ता विद्यापीठाची अनेक संकुले कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक ब्रिटिशकालीन इमारतींच्या आधाराने सुरू असलेली ही संकुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबतच इतरांसाठीही आकर्षणाची केंद्रे ठरतात. आशुतोष शिक्षा प्रांगण अर्थात कॉलेज स्ट्रीट कॅम्पस, रासबिहारी शिक्षा प्रांगण अर्थात राजाबझार सायन्स कॉलेज कॅम्पस, तारकनाथ पलित शिक्षा प्रांगण, बी. टी. रोड कॅम्पस, हजरा रोड अर्थात लॉ कॉलेज कॅम्पस आदी संकुलांमधून विद्यापीठाचे विविध विभाग आणि प्रशासकीय कामकाज चालते. विद्यापीठांतर्गत विविध विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने एकूण १६ वसतिगृहे सुरू केली आहेत. त्या आधारे विद्यापीठाने दीड हजारांवर विद्यार्थ्यांना रहिवासाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर, संशोधन अभ्यासक्रमांसोबतच पदवी पातळीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही वसतिगृहांच्या या सुविधांचा लाभ घेणे शक्य आहे. जवळपास दहा लाख पुस्तकांहून अधिक पुस्तकांचा संग्रह असणारे विद्यापीठाचे मध्यवर्ती ग्रंथालय हे या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सुविधा ठरते. या शिवाय विद्यापीठाच्या २० विभागांमधील विभागीय ग्रंथालयांमधूनही विद्यार्थ्यांसाठी गरजेच्या असणाऱ्या सुविधा पुरविल्या जात आहेत.

विभाग आणि अभ्यासक्रम

कलकत्ता विद्यापीठांतर्गत अ‍ॅग्रिकल्चरल सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, सोशल वेल्फेअर अँड बिझनेस मॅनेजमेंट, एज्युकेशन- जर्नलिझम अँड लायब्ररी सायन्सेस, इंजिनीअिरग अँड टेक्नॉलॉजी, फाइन आर्ट्स- म्युझिक अँड होम सायन्सेस, लॉ आणि सायन्स या विद्याशाखांच्या माध्यमातून विविध विभाग चालविले जातात. या विद्याशाखा आणि विभागांव्यतिरिक्त विशिष्ट विषयांमधील विशेष अभ्यास आणि संशोधनांना वाहिलेल्या केंद्रांमधूनही विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक सुविधा पुरविल्या जातात. त्यामध्ये गांधीयन स्टडीज सेंटर, सेंटर फॉर अर्बन इकोनॉमिक स्टडीज, पीस स्टडीज रिसर्च सेंटर, सेंटर फॉर इलेक्ट्रोफिजिओलॉजी अँड न्युरो इमेजिंग स्टडीज इन्क्ल्युडिंग मॅथेमॅटिकल मॉडेलिंग, सेंटर फॉर मिलिमीटर वेव्ह सेमीकंडक्टर डिव्हायसेस अँड सिस्टीम्स, सेंटर फॉर रिसर्च इन नॅनोसायन्सेस अँड नॅनोटेक्नॉलॉजी, सेंटर फॉर साऊथ अँड साऊथ ईस्ट एशियन स्टडीज, इन्स्टिटय़ुट ऑफ फॉरेन पॉलिसी स्टडीज, कलकत्ता स्टॉक एक्स्चेंजच्या सहकार्याने सुरू झालेले सेंटर ऑफ एक्सेलन्स इन फायनान्शिअल मार्केट्स, नेहरू स्टडीज सेंटर आदी केंद्रांचा समावेश होतो. कला विद्याशाखेंतर्गत या विद्यापीठामध्ये अ‍ॅन्शंट इंडियन हिस्ट्री अँड कल्चर, तसेच इस्लामिक हिस्ट्री अँड कल्चर या विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी आणि संशोधनाचे अभ्यासक्रम चालविले जातात. कला विद्याशाखेंतर्गत भाषांमध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही वेगवेगळे प्रमाणपत्र, पदविका आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तमिळ स्टडीज विभागांतर्गत विद्यार्थ्यांना तमिळ विषयामधील प्रमाणपत्र, पदविका, एम. ए. आणि पीएचडीचे अभ्यासक्रम चालतात. इंजिनीअिरग अँड टेक्नॉलॉजी विद्याशाखेंतर्गत अ‍ॅप्लाइड ऑप्टिक्स अँड फोटोनिक्स विभागामध्ये त्याच विषयामधील बी. टेक. पदवी, एम. टेक. ही पदव्युत्तर पदवी, तसेच या विषयाशी संबंधित संशोधनांसाठीचा पीएचडी अभ्यासक्रम चालतो. रेडिओ फिजिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स विभागामध्येही विद्यापीठाने बी. टेक. आणि एम. टेक. अभ्यासक्रमांसाठीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या विद्यापीठाचे एक वेगळे वैशिष्टय़ ठरणाऱ्या ज्युट अँड फायबर टेक्नॉलॉजी विभागामध्ये विद्यार्थ्यांना बी. टेक. अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणितामध्ये विशेष रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ तीन स्वतंत्र विभाग आणि त्याअंतर्गतचे विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. सायन्स विद्याशाखेंतर्गत असलेल्या प्युअर मॅथेमॅटिक्स, स्टॅटेस्टिक्स आणि अ‍ॅप्लाइड मॅथेमॅटिक्स या तीन स्वतंत्र विभागांमधून त्यासाठीचे अभ्यासक्रम चालविले जातात. तसेच या विद्याशाखेंतर्गत अ‍ॅप्लाइड सायकॉलॉजी आणि मरिन सायन्स विभागांमधूनही करिअरच्या तुलनेने नव्या वाटांचा विचार करणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येतात. अ‍ॅग्रिकल्चर विद्याशाखेंतर्गत शेतीविज्ञानाशी निगडित विविध विषयांमधील एम. एस्सी., तसेच संशोधनासाठीचे पीएचडीचे अभ्यासक्रमही या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत.

borateys@gmail.com