विद्यापीठ विश्व : प्रथमेश आडविलकर

वैशिष्टय़:- यूसीएसडीच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये सत्तावीस नोबेल पुरस्कार विजेते, तीन फिल्ड पदकविजेते, दोन पुलित्झर पुरस्कार विजेते आणि आठ मॅकआर्थर पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. विद्यापीठातील सध्याचे काही प्राध्यापक हे त्यांच्या संशोधन क्षेत्रातील नोबेल विजेते आहेत. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये जगभरातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये लेखक खालिद हुसनी, गो प्रोचे संस्थापक निक वुडमन, तवानमधील राजकारणी-प्राध्यापक कुआन चुंग मिंग इत्यादींचा समावेश आहे.

विद्यापीठाची ओळख – अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामधील सॅन दिएगो शहरामधील युनिव्हर्सटिी ऑफ कॅलिफोर्निया- सॅन दिएगो (यूसीएसडी) हे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले एकेचाळीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. यूसीएसडी हे एक शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना इसवी सन १९६० साली झाली. ‘लेट देअर बी लाइट’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. यूसीएसडी विद्यापीठाचा कॅम्पस दोन हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या परिसरामध्ये स्थित आहे. यूसीएसडीमध्ये अडीच हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास चाळीस हजार पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी त्यांचे शिक्षण येथे पूर्ण करत आहेत. यूसीएसडीच्या एकूण शैक्षणिक संरचनेमध्ये पदवी अभ्यासक्रम बहाल करणारी सहा निवासी महाविद्यालये, पाच प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग आणि सहा पदव्युत्तर व व्यावसायिक स्कूल्स यांचा समावेश आहे. सर्व विद्याशाखांमधील मिळून तयार होणाऱ्या या वेगवेगळ्या स्तरांवरील विभागांकडून विद्यार्थ्यांसाठी एकूण दोनशे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध केले गेले आहेत.

अभ्यासक्रम – यूसीएसडी विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत. यूसीएसडीमधील सर्व शैक्षणिक स्तरांवर असलेल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये पदवी अभ्यासक्रम उत्कृष्टपणे राबवणारी रेव्हील, जॉन मुइर, मार्शल, वॉरन, रुज्वेल्ट आणि सिक्स्थ ही सहा निवासी महाविद्यालये, तर आर्ट्स अ‍ॅण्ड ह्य़ूमॅनिटीज, बायोलॉजिकल सायन्सेस, जेकब्स स्कूल ऑफ इंजिनीअिरग, फिजिकल सायन्सेस आणि सोशल सायन्सेस हे पाच प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग आहेत. रेडी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, स्क्रिप्स इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी, स्कूल ऑफ ग्लोबल पॉलिसी अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजी, स्कूल ऑफ मेडिसिन, स्कॅग्ज स्कूल ऑफ फार्मसी अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल, स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ ही सहा पदव्युत्तर व व्यावसायिक स्कूल्स आहेत.

पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरल अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (प्रोफेशनल ग्रॅज्युएट डिग्रीज) विद्यापीठातील शेकडो शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत. यूसीएसडीमधील सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन, समर सेशन यांसारखे पर्यायही उपलब्ध करून दिलेले आहेत.

यूसीएसडीमधील सर्व शैक्षणिक आणि संशोधन विभागांमध्ये समाविष्ट होणाऱ्या विषयांमध्ये प्रामुख्याने अंतरिक्ष संशोधन, खगोलभौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र, जैवअभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य आणि पर्यावरणीय अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अंतराळ अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, अभियांत्रिकीय भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, विदा विज्ञान, मानववंश अभ्यास, अर्थशास्त्र, इतिहास, साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगीत, नृत्य, इंग्रजी, चायनीज अभ्यास, मानसशास्त्र, पर्यावरणीय संस्था, पृथ्वीचा अभ्यास, सागरविज्ञान, समुद्री जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि ओशनिक अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्सेस, व्यवस्थापनशास्त्र यांसारख्या शेकडो आंतरविद्याशाखीय आणि बहुआयामी विषयांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेतील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक पाश्र्वभूमीसह सॅट व टोफेल या दोन परीक्षा, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी जीआरई आणि टोफेल या प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

सुविधा – यूसीएसडी विद्यापीठात प्रथम वर्षांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपकी बहुतांश विद्यार्थी कॅम्पसमधील वसतिगृहांमध्ये राहतात. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपकी अध्र्याहून अधिक विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून कोणत्याही स्वरूपाची आíथक मदत केली जाते. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कॅफे व खाद्यपदार्थाच्या इतर अद्ययावत सोयी उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रासहित विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले पाचशेपेक्षाही अधिक क्लब्स आहेत. विद्यापीठामध्ये होणाऱ्या सर्व कार्यशाळा व समारंभांची माहिती प्रत्येक क्लबकडून संकेतस्थळावर दिलेली आहे. विद्यापीठाचा परिसर एकदम सुरक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यूसीएसडीने ‘स्टुडंट हेल्थ इन्शुरन्स प्लान्स’अंतर्गत वैद्यकीय आणि समुपदेशनासारख्या सोयी विद्यापीठाच्या आवारातच उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

संकेतस्थळ  https://ucsd.edu/ – itsprathamesh@gmail.com