25 February 2021

News Flash

ज्ञानाची पंढरी ऑक्सफर्ड विद्यापीठ

ऑक्सफर्ड विद्यापीठाला स्वतंत्रपणे ओळखीची गरज नाही. कारण हे विद्यापीठ माहिती नाही, अशी व्यक्तीच विरळा.

|| प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख

ऑक्सफर्ड विद्यापीठाला स्वतंत्रपणे ओळखीची गरज नाही. कारण हे विद्यापीठ माहिती नाही, अशी व्यक्तीच विरळा. इंग्रजी भाषेमध्ये सर्व अभ्यासक्रम चालणाऱ्या विद्यापीठांपकी सर्वात प्राचीन असलेले हे जगद्विख्यात विद्यापीठ २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले पाचव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. इंग्लंडमध्ये असलेल्या या विद्यापीठामध्ये प्रचलित पद्धतीच्या अध्ययन-अध्यापन सुमारे एक हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १०९६ साली होत असल्याचे काही पुरावे अस्तित्वात आहेत. मात्र विद्यापीठाच्या स्थापनेबाबत वादविवाद आहेत. तेराव्या शतकात ऑक्सफर्ड विद्यापीठातील विद्यार्थी व तेथील रहिवासी यांच्यात झालेल्या वादामुळे दुसरे एक ऐतिहासिक विद्यापीठ ‘केम्ब्रिज विद्यापीठ’ हे आकारास आले. ऑक्सफर्ड हे एक खासगी विद्यापीठ असूनही संस्थेस शासकीय निधी मिळतो. साहित्य व इंग्रजी भाषा यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ ओळखले जाते आणि म्हणूनच जगभरातील प्रमुख पाच विद्यापीठांमध्ये ऑक्सफर्डला स्थान देण्यात आले आहे. ‘द लॉर्ड इज माय लाईट’ हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ ३८ घटक महाविद्यालये आणि चार प्रमुख शैक्षणिक विभाग मिळून बनलेले आहे. विद्यापीठातील ही सर्व महाविद्यालये स्वयंशासित असून प्रत्येक महाविद्यालय स्वत:च्या अंतर्गत शैक्षणिक व संशोधन रचना नियंत्रित करते.

दक्षिण-मध्य इंग्लंडमध्ये असलेल्या ऑक्सफर्ड शहरातील या विद्यापीठाला मुख्य कॅम्पस नाही मात्र शहरभर विद्यापीठाच्या इतर कॅम्पसमध्ये विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, महाविद्यालये, निवासी व्यवस्था इत्यादी गोष्टी पसरलेल्या आहेत. सध्या ऑक्सफर्डमध्ये जवळपास १८०० तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास पंचवीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम

ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम तीन वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी कला, विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. ऑक्सफर्डमध्ये एकूण चार शैक्षणिक विभाग आहेत. विद्यापीठातील ह्य़ुमॅनिटीज, मॅथेमॅटिकल फिजिकल अ‍ॅण्ड लाइफ सायन्सेस, मेडिकल सायन्सेस आणि सोशल सायन्सेस या चार प्रमुख विभागांमार्फत संस्थेतील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा

ऑक्सफर्ड विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, निवास व भोजन सुविधा विविध निकषांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अत्यंत अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा काही अटींवर विद्यापीठाकडून दिल्या जातात. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून अ‍ॅशमोलन म्युझियम या सतराव्या शतकातील संग्रहालयाचे व्यवस्थापन केले जाते. तसेच विद्यापीठाशी संबंधित डझनभर ऐतिहासिक वास्तू, शेल्डोनियन थिएटर इत्यादी वास्तूंची देखभाल घेतली जाते.

संकेतस्थळ  http://www.ox.ac.uk/

वैशिष्टय़े

ऑक्सफर्ड विद्यापीठाने जगाला दिलेली एक मोठी देणगी म्हणजे जागतिक नेतृत्व. इंग्लंडसहित जगातील विविध देशांचे नेतृत्व ज्यांनी केले आहे त्यापकी कित्येक नेते या विद्यापीठामध्ये शिकलेले आहेत. केवळ इंग्लंडमधील २७ पंतप्रधान ऑक्सफर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी राहिलेले आहेत. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन, स्टीफन हॉकिंग्ज, अमर्त्य सेन यांसारखे संशोधक तर ऑस्कर वाइल्ड, टी. एस. इलियट, व्ही. एस. नायपॉल इत्यादी लेखक, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आदी राजकारणी हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. जागतिक दर्जाचे अनेक कायदेतज्ज्ञ, संशोधक-प्राध्यापक, गणितज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, लेखक, संगीतकार, तत्त्वज्ञ या विद्यापीठाने घडवलेले आहेत. आतापर्यंतच्या उपलब्ध सांख्यिकीनुसार, विद्यापीठातील एकूण ६९ माजी विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते आणि सहा टय़ुरिंग पुरस्कार विजेते आहेत. या नोबेल विजेत्यांमध्ये सर्व सहा गटातील विजेत्यांचा समावेश आहे.

itsprathamesh@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 12:22 am

Web Title: university of oxford
Next Stories
1 ‘वृत्ती’ विषयक प्रश्नांचा आढावा
2 प्रश्नवेध यूपीएससी : भारतीय चित्रकला
3 एमपीएससी मंत्र : चालू घडामोडींचे सर्वव्यापी स्वरूप
Just Now!
X