टोरन्टो विद्यापीठ, कॅनडा

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख – टोरन्टो शहरामध्ये असलेले ‘युनिव्हर्सिटी ऑफ टोरन्टो’ (टोरन्टो विद्यापीठ) हे कॅनडामधील पहिल्या क्रमांकाचे तर जागतिक स्तरावरील एक अग्रणी संशोधन विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार टोरन्टो विद्यापीठ हे जगातले एकोणतिसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.

या विद्यापीठाची स्थापना १८२७ साली झालेली आहे. हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. शांघाय रँकिंग कन्सल्टन्सीच्या अहवालानुसार विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व विषयांपैकी नऊ विषय हे विषयांच्या क्रमवारीनुसार जगातील ‘पहिल्या दहा’ क्रमांकामध्ये आहेत. टोरन्टो विद्यापीठाचे डाऊनटाऊन टोरन्टो (सेंट जॉर्ज), पश्चिमेतील मिसीसोगा आणि पूर्वेकडील स्काबरेरो असे तीन कॅम्पस आहेत.

विद्यापीठामध्ये सध्या जवळपास पंधरा हजार (फॉल २०१७ च्या आकडेवारीनुसार) तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून नव्वद हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. दीर्घ आणि सखोल संशोधनामुळे विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले आहे. टोरन्टो विद्यापीठ हे संशोधनातून अभिनवता साकारणारे विद्यापीठ आहे. इन्सुलिन आणि स्टेम सेलसारख्या महत्त्वाच्या विषयांमधील संशोधनाची सुरुवातच या विद्यापीठामधून झाली आहे.

अभ्यासक्रम – टोरन्टो विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम हे चार वर्षांचे संशोधन अभ्यासक्रम आहेत. विद्यापीठातील सर्व विभागांमधून एकूण सातशे पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पदवी अभ्याक्रमांसाठी विद्यार्थ्यांकडून कला आणि विज्ञान शाखांना प्राधान्य दिले जाते. आपल्याकडील कित्येक भारतीय विद्यापीठांसारखे अनेक महाविद्यालये जशी विद्यापीठाशी संलग्न असतात तशीच टोरन्टो विद्यापीठाची एकंदरीत रचना आहे. या विद्यापीठाशी संलग्न नोंदणीकृत महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयातील वर्गाना हजर राहू शकतात आणि महाविद्यालयाचे वाचनालय वापरू शकतात. विद्यापीठातील बहुतांश पदव्युत्तर अभ्यासक्रम हे दोन वर्षांचे आहेत. टोरन्टो विद्यापीठात एकूण दोनशे पदव्युत्तर अभ्यासक्रमांची उपलब्धता आहे. विद्यापीठामधील प्रमुख विभागांमध्ये अप्लाईड सायन्सेस अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, लँडस्केप अ‍ॅण्ड डिझाइन, आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स, कंटिन्यूइंग स्टडीज, डेंटीस्ट्री, एज्युकेशन, फॉरेस्ट्री, ग्रॅज्युएट स्टडीज, इन्फोम्रेशन, कायनेसिओलॉजी अ‍ॅण्ड फिजिकल एज्युकेशन, लॉ, मॅनेजमेंट, मेडिसिन, म्युझिक, नìसग, फार्मसी, पब्लिक हेल्थ, सोशल वर्क इत्यादी विभागांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठातील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी GRE/ GMAT, TOEFL/IELTS, SAT किंवा ACT या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

सुविधा – टोरन्टो विद्यापीठास आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. जगातील १५७ देशांमधून विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येतात. २०१८-१९ मध्ये एकवीस हजार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला होता. टोरन्टो विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय व चिनी विद्यार्थ्यांचे प्रमाण जास आहे. विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व टय़ुशन फी वेव्हर यांसारखी आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, कॅफेटेरिया, आंतरराष्ट्रीय हेल्थ इन्शुरन्स, क्रीडा आणि करिअर मार्गदर्शन यांसारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. टोरन्टो विद्यापीठामध्ये एकूण ८०० विद्यार्थी क्लब्स आहेत.

टोरन्टो विद्यापीठामधून मी नुकतीच एअरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. विद्यापीठातील प्राध्यापक अतिशय सहकार्य करणारे आहेत. जवळपास प्रत्येक अभ्यासक्रमातील बरेचसे विषय हे संशोधनावर आधारित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना  स्व-अध्ययनावर विशेष भर द्यावा लागतो. त्यामुळेच तुमच्या प्रत्येक विषयाच्या गुणांमध्ये प्रकल्पांचा वाटा ६५ टक्के तर परीक्षेतील गुणांचा वाटा ३५ टक्के असतो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना संधी निवडण्यासाठी मदत केली जाते.   विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या गटांचे   उत्कृष्ट संघटन (Alumni Network) जपलेले आहे. भविष्यातील संधी मिळवण्याकरिता याचा उत्तम उपयोग होतो.’’

 – शिल्पा डीसुझा, एअरोस्पेस इंजिनीअर टोरन्टो विद्यापीठ, कॅनडा.

संकेतस्थळ  https://www.utoronto.ca/