स्वप्न जेवढे मोठे असेल तेवढय़ा अधिक अडथळ्यांना, संकटांना तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही जेवढा उंच जाण्याचा प्रयत्न कराल तेवढय़ा उंचीच्या अग्निदिव्यातून जावे लागेल. लक्षात ठेवा, एखाद्या ध्येयाचा पाठपुरावा करताना, सर्व प्रयत्न करूनही अपयशी ठरलात तर वाईट वाटण्यासारखे काही नाही. कारण जीवनाच्या या पटावर हार-जीत असणारच आहे. मात्र, आपल्या ध्येयासाठी तुम्ही प्रयत्नच केले नाहीत तर त्यासारखी दुर्दैवी गोष्ट या जगात कोणतीच नाही. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करतानाही तुमच्या जीवनात निराशेचे अनेक क्षण येतील. या वाटेवर अनेक संकटांचा सामना तुम्हांला करावा लागेल, मात्र स्वप्नांवर विश्वास ठेवून तुमचे सारे लक्ष ध्येयावर केंद्रित करून वाटचाल करत राहिल्यास तुम्हालाच लक्षात येईल की, चालताना सहजता निर्माण झाली आहे. पाय रस्त्यावर आत्मविश्वासाने रोवतपडू लागले आहेत..

आज आपण पूर्वपरीक्षेच्या पेपर – २ (सीसॅट २)बद्दल माहिती घेणार आहोत, २०११च्या पूर्वपरीक्षेत ऐच्छिक विषयाच्या जागी सीसॅट ( Civil Services Apptitude Test) पेपर २ हा अंतर्भूत केला आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे शास्त्रशुद्ध चाचण्यांद्वारे विश्लेषण करून तुमच्या गुणांबद्दल सांगणाऱ्या चाचण्या म्हणजे अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टस् होय. यूपीएससीने हा पेपर पूर्वपरीक्षेसाठी अंतर्भूत करण्याआधीदेखील या प्रकारच्या चाचण्या एमबीए, बँकिंग, विविध विदेशी विद्यापीठात घेतल्याच जात होत्या. या वर्षीपासून एमपीएससीने देखील सीसॅट – पेपर २ याच अभ्यासक्रमावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पेपरमध्ये ८० प्रश्न २०० गुणांसाठी दोन तासांत सोडवायचे असतात. संघ लोकसेवा आयोगाने पूर्वपरीक्षेसाठी खालील अभ्यासक्रम अंतर्भूत केला आहे.

१) आकलन (Comprehension) :

या घटकाअंतर्गत काही उतारे दिलेली असतात व त्यावर प्रश्न विचारले जातात. उतारे हे एकतर इंग्रजीत किंवा िहदीत असतात. ते मराठीत दिलेले नसतात. एमपीएससीच्या परीक्षेत हे उतारे मराठीत असतील. २०११-२०१२ या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी या घटकाची योग्य तयारी न केल्याने तसेच अभ्यासाचे आणि वेळेचे नियोजन न करता आल्याने ते अपयशी ठरलेत. काही विद्यार्थ्यांनी प्रथम उतारा इंग्रजीत वाचण्यास सुरुवात केली, तो न समजल्याने उतारा िहदीत वाचण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा उपलब्ध वेळ गेला व ते प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवू शकले नाहीत. म्हणून उतारा कोणत्याही एकाच भाषेत वाचा. एकतर इंग्रजीत किंवा िहदीत उतारा वाचण्यापूर्वी जर वेगात प्रश्न वाचून घेतलेत तर नक्की तुम्हाला कुठे जायचे व कोणत्या प्रश्नांची उत्तरे द्यावयाची हे माहीत असतात, म्हणून कमीत कमी वेळेत तुम्ही उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल. अर्थात उतारा वेगात व्यवस्थित वाचून त्याचे लवकरात लवकर विश्लेषण करता येणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी भरपूर सराव आवश्यक आहे. किंबहुना तुम्ही दैनिक वृत्तपत्र वाचतानाच तो वेगात वाचण्याची सवय करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या आधी संघ लोकसेवा आयोगाने विचारलेल्या मागच्या प्रश्नपत्रिकेतील उतारे सराव म्हणून सोडवून पाहणे आवश्यक आहे. काही विद्यार्थी सरळ परीक्षेच्या दिवशीच या उताऱ्यांना हात लावतात ते अजिबात योग्य नाही. किंबहुना या परीक्षेत अपयशी होण्यासाठी ते एक कारण ठरू शकते. तुम्ही कितीही हुशार असाल आणि तुमचा वाचण्याचा वेग कितीही असेल तरीही या प्रकारच्या प्रश्नांचा परीक्षापूर्व सराव न करणे हे घातकच आहे. कारण परीक्षेच्या दिवशी त्या दोन तासांत तुम्ही प्रचंड तणावात असता व त्या ठिकाणी तुम्हाला रिटेक घेण्यासाठी संधी नसते म्हणून परीक्षेपूर्वी या घटकाची व्यवस्थित तयारी करावी.

२) संवाद कौशल्यासह आंतर वैयक्तिक कौशल्य (Interpersonal Skill Including Communication Skills) :

लोकांशी, समूहाशी संवाद कौशल्य हा प्रशासनात काय, जीवनाच्या सर्वच क्षेत्रात उपयोगी पडणारा घटक आहे. आपण प्रशासनात जाणार आहात तेथे वरिष्ठ, कनिष्ठ लोकप्रतिनिधी, नागरिक, प्रसारमाध्यमे यांच्यासोबत आपला संपर्क येणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्यांची निवड होणार आहे, त्यांच्या अंगी संवाद कौशल्य चांगले असावे. हे पाहाण्यासाठीच हा भाग अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. खरंतर याचा उपयोग सर्वात जास्त मुलाखतीच्या वेळेस होतो.

उदा. यूपीएससी-२०१२ साथग्रस्त खेडय़ातील लसीचे वितरण करणारे तुम्ही मुख्य अधिकारी आहात, तुमच्याकडे लसीची एकच कुपी आहे, गावाचा सरपंच आणि एका ग्रामस्थाला त्या लसीची गरज आहे, लस त्याला स्वतला देण्यासाठी गावाचा सरपंच दबाव आणत आहे, तुम्ही काय कराल?

अ)    लसीच्या अधिक पुरवठय़ासाठी आवश्यक ती प्रक्रिया कार्यान्वित कराल.

ब)    अन्य गावातील वितरकामार्फत गरीब ग्रामस्थाला लस पुरवाल.

क)    दोघांच्या गरजेची निकड जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे पाठवाल.

ड)    अन्य गावातील वितरकामार्फत सरपंचाला लस पुरवाल.

३) निर्णयक्षमता व समस्या निवारण : प्रशासनात येऊ इच्छिणाऱ्या युवकांच्या अंगी कोणताही प्रश्न व्यवस्थित हाताळण्याचे अंगभूत कौशल्य असणे आवश्यक आहे. प्रशासनात आल्यानंतर आपणास असे अनेक प्रसंग येतील की, जेव्हा फक्त तुम्हाला एकटय़ाला योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. मागच्या वर्षी प्रश्नपत्रिकेत या घटकावर जे प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांसाठी निगेटिव्ह माìकग पद्धती नव्हती.

 उदा. २०१२ मध्ये प्रश्न क्रमांक ७४ पासून ८० पर्यंत प्रश्न या भागावरच विचारले होते.

उदा. तुमच्या दुय्यम अधिकाऱ्याने तयार केलेल्या अंतिम अहवालाविषयी तुमचे काही मतभेद आहेत, हा अहवाल तातडीने सादर करावयाचा आहे. दुय्यम अधिकारी आपल्या माहितीचे समर्थन करीत आहेत, अशा प्रसंगी तुम्ही –

अ) दुय्यम अधिकारी चूक असल्याचे त्याला पटवून द्याल.

ब) अहवालाचा पुनर्वचिार करण्यास त्याला सांगाल

क) तुम्ही स्वत: अहवालात बदल कराल.

ड) आपल्या चुकीचे समर्थन करू नये, असे त्याला सांगाल.

उदा. दुर्गम प्रदेशात पाणीपुरवठय़ाचा एक प्रकल्प राबविण्यास तुम्हाला सांगितले जाते. या प्रदेशातील लोकांच्या  उत्पन्नाचा स्तर कमी आहे. तेथील २५ टक्के लोक दारिद्य््रारेषेखालील आहेत. प्रकल्पाच्या खर्चाचा निर्णय घेण्याच्या बठकीत तुम्ही –

अ) पाणीपुरवठा सर्वस्वी मोफत असावा, अशी शिफारस कराल.

ब) पाण्याचा वापर करणाऱ्यांनी फक्त एकदा निश्चित रक्कम नळाच्या जोडणीसाठी द्यावी आणि पाणी मोफत वापरावे, असे प्रतिपादन कराल.

क) दारिद्य्ररेषेवरील लोकांनी दरमहा ठराविक पाणीपट्टी द्यावी आणि दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना मोफत पाणी पुरवावे, अशी शिफारस कराल.

ड) पाण्याच्या वापरासाठी पाणीपट्टी आकारली जावी आणि दारिद्य्ररेषेखालील कुटुंबासाठी पाण्याचा किमान वापर मोफत असावा, अशी शिफारस कराल.

४) सामान्य मानसिक क्षमता (General Mental Ability) : या घटकाचा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सराव करावा. सामान्यत: बुद्धिमत्ता या घटकाखाली प्रश्न आपण अभ्यासले असतील, तशा प्रकारचे प्रश्न या घटकावर विचारले जातात. २०१२ च्या ‘यूपीएससी’च्या पूर्वपरीक्षेत या घटकावर विचारलेले काही प्रश्न-

उदा. सनिक छावणी देशांच्या अन्य भागांना जोडणारे अ, इ, उ, ढ, द आणि फ  असे सहा रस्ते आहेत. त्यापकी कोणत्याही एका वेळेस अ, ढ आणि फ  यांपकी एक रस्ता खुला असतो. इ बंद असल्यास द देखील बंद असतो. वादळामध्ये अ आणि इ यांपकी फक्त एक रस्ता खुला असतो. या माहितीच्या आधारे कोणते विधान बरोबर आहे ?

अ) साधारण परिस्थितीमध्ये फक्त तीन रस्ते खुले असतात.

ब) वादळामध्ये किमान एकतरी रस्ता खुला असतो.

क) पूर आल्यास फक्त तीन रस्ते खुले असतात.

ड) संकटकाळी सर्व रस्ते बंद असतात.

उदा.

२) अ, इ आणि उ या तीन व्यक्तींनी काळा, निळा आणि नारंगी रंगाचे शर्ट घातले असेल तरी ते त्याच क्रमाने घातलेले नाहीत. त्यांच्या विजारी हिरव्या, पिवळया आणि नारंगी असल्यास तरी त्याच क्रमाने त्यांनी घातलेल्या नाहीत. एकाही व्यक्तीने एकाच रंगाचा शर्ट आणि विजार घातलेली नाही, आणखी काही तपशील पुढे दिला आहे.

१) अ ने काळा शर्ट घातलेला नाही.

२) इ ने निळा शर्ट घातलेला नाही.

३) अ ने हिरवी विजार घातलेली नाही.

४) इची विजार नारंगी रंगाची आहे.

 उ ने घातलेली विजार आणि शर्ट अनुक्रमे कोणत्या रंगाचे असतील ?

अ) नारंगी आणि काळा   ब) पिवळा आणि निळा

क) हिरवा आणि निळा    ड) पिवळा आणि काळा

५) मूलभूत अंकगणित, तक्ता आलेख ( Basic Numeracy) : या घटकाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतो की, यात गणिताचा किती भाग समाविष्ट असेल. मात्र २०११ व २०१२ या प्रश्नपत्रिकेवरून २०१२ मध्ये जवळजवळ १३ प्रश्न तेही अत्यंत सोपे या घटकावर विचारले गेले होते तर २०१२ मध्ये फक्त चार प्रश्न या घटकावर विचारले होते. या घटकाच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंत शिकलेल्या गणिताच्या मूलभूत संकल्पना समजून घ्याव्यात, जास्त आकडेमोड करावी लागेल किंवा जास्त मोठे प्रश्न शक्यतो परीक्षेत विचारले जात नाहीत.

उदा. २०१२च्या संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खालील प्रश्न विचारले होते.

उदा. ताशी सरासरी ४८ कि.मी. वेगाने श्रीयुत कुमार कामावर जातात. पहिले ६० टक्के अंतर पार करण्यासाठी त्यांना उरलेले अंतर पार करण्याच्या वेळापेक्षा १० मिनिटे जास्त लागतात. त्यांचे कार्यालय किती अंतरावर आहे ?

अ) ३० कि.मी.  ब) ४० कि.मी.

क) ४५ कि.मी.  ड) ४८ कि.मी.

उदा. ( २०११ ) – वर्गातील १०० विद्यार्थ्यांपकी ६० टक्के विद्यार्थी क्रिकेट खेळतात, ३० टक्के फुटबॉल खेळतात आणि १० टक्के दोन्ही खेळ खेळतात. क्रिकेट किंवा फुटबॉल न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ?

अ) २५         ब) २०            क) १८        ड) १५

तक्ते, आलेख यांचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम निरनिराळ्या प्रकारचे आलेख व त्यावरील प्रश्न सोडविण्याचा सराव करावा. २०११ व २०१२ मध्ये संघ लोकसेवा आयोगाने जे प्रश्न विचारले होते, ते अत्यंत सोपे होते. त्यामुळे या घटकाबद्दल जास्त भीती बाळगू नये.

६) इंग्रजी भाषेचे आकलन (English Language Comprehension Skills) : दर्जा दहावीपर्यंत पहिला घटक आकलन व हा सहावा घटक इंग्रजी भाषेचे आकलन यात फरक असा आहे. आकलन या घटकास जे उतारे दिले असतात ते इंग्रजी व िहदी या दोन्ही भाषेत दिलेले असतात, ते थोडे अवघड व विचार करायला लावणारे असतात. मात्र इंग्रजी भाषेचे आकलन या घटकात असणारा उतारा फक्त इंग्रजीतच असेल त्याचे िहदी भाषांतर केलेले नसते. साधारणत: दोन किंवा तीन उतारे या घटकावर विचारले जातात.

सी-सॅट पेपर २चा अभ्यास करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:

१) सीसॅट पेपर २ मध्ये जास्तीत जास्त गुण मिळविण्याची सुवर्णसंधी असते. या पेपरमध्ये यशस्वी होण्यासाठी सुरुवातीपासून जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे.

२) खेळातला एक नियम आहे, जर तुम्हाला १०० मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यावयाचा असेल तर तुम्ही रोज २०० मीटर धावण्याचा सराव केला पाहिजे, हा नियम येथेही लागू पडतो. या प्रश्नपत्रिकेत फक्त ८० प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही १०० प्रश्न असतील या भूमिकेतून सराव केला पाहिजे, म्हणजे परीक्षेच्या दिवशी दोन तासांत फार तारांबळ उडणार नाही.

३) प्रश्नपत्रिकेतील प्रश्न काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. प्रश्नात दिलेला एक एक शब्द व्यवस्थित समजून घ्या. कारण एकेका शब्दाच्या फरकाने अर्थ आणि उत्तरसुद्धा बदलू शकते व अशा प्रश्नांचा सराव जास्तीतजास्त करावा.

४) प्रश्नपत्रिकेत आकलनावरचे प्रश्न आधी सोडवावेत की, सामान्य मानसिक क्षमतेवरील  प्रश्न पहिले सोडवावेत? सीसॅट पेपर २ मध्ये किती प्रश्न सोडवावेत? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीगणिक बदलणारे आहे. सर्वाना लागू पडेल असा एक नियम नाही, परंतु ज्या प्रश्नांसाठी निगेटिव्ह माìकग नाही, असे प्रश्न सर्वात प्रथम सोडविण्यास घ्यावेत. ज्यांना अंकगणित व मानसिक क्षमता हा घटक सोपा वाटतो, त्यांनी शांत डोक्याने, अचूकपणे तो घटक सोडवून नंतर आकलन या घटकाकडे जावे. परीक्षेत सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देता यावीत, असा हट्ट धरू नये, जास्तीत जास्त प्रश्न वेळेत, अचूकपणे सोडविण्याचा प्रयत्न करावा. एकदा उतारा वाचण्यास घेतल्यास त्याची उत्तरे दिल्यानंतरच पुढच्या उताऱ्यावर जावे, उतारा अर्धवट सोडून दुसऱ्या प्रश्नाकडे गेल्यास उताऱ्यासाठी दिलेला वेळ वाया जातो.

५) अभ्यासक्रमात दिलेल्या घटकांपकी एखादा घटक कुणाला ना कुणाला अवघड वाटणार आहे, अशा घटकासाठी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या किंवा ज्याला हा घटक व्यवस्थित जमतो अशा तुमच्या मित्राकडून हा घटक समजून घ्या, अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. आपल्याला ज्याची भीती वाटते त्या घटकाचा जास्तीत जास्त  सराव करा. मनातील भीती काढण्याचा हाच शास्त्रशुद्ध उपाय आहे.