केतन पाटील

विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो,

केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारे भरती करीत असते. आयोगाच्या या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या २३ सेवांमध्ये विभागणी केली जाते. ही विभागणी विद्यार्थ्यांला मिळालेले गुण, स्पर्धकाने मांडलेले प्राधान्यक्रम, वर्गवारी, उपलब्ध जागा व आता नव्याने दाखल झालेले (महाराष्ट्र, गोवा, गुजरात व मध्य प्रदेश) या घटकांच्या आधारे केली जाते.

या सेवांमध्ये तीन प्रकारच्या सेवांचा समावेश आहे.

*    अखिल भारतीय सेवा –

*   भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

*   भारतीय पोलीस सेवा ((IPS)

*   भारतीय वन सेवा (IFS)

गट ‘अ’ सनदी सेवा – यामध्ये भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोस्ट आणि दूरसंचार लेखा वित्त सेवा, भारतीय हिशोब आणि लेखा परीक्षण सेवा, भारतीय राजस्व सेवा (सीमा आणि केंद्रीय अबकारी कर), भारतीय संरक्षण लेखा सेवा, भारतीय राजस्व सेवा (आयकर),

भारतीय शस्त्रागार सेवा (साहाय्यक कार्य व्यवस्थापक, प्रशासन), भारतीय टपाल सेवा, भारतीय सनदी लेखा सेवा, भारतीय रेल्वे वाहतूक सेवा, भारतीय रेल्वे लेखा सेवा, भारतीय रेल्वे कार्मिक सेवा, रेल्वे सुरक्षा बलामध्ये साहाय्यक सुरक्षा आयुक्त, भारतीय सुरक्षा संपदा सेवा, भारतीय माहिती सेवा (कनिष्ठ श्रेणी), भारतीय व्यापार सेवा (गट अ- श्रेणी ३), भारतीय कॉर्पोरेट कायदे सेवा इत्यादी.

गट ब’  सेवा – सशस्त्र बल मुख्यालय सनदी सेवा (सेक्शन ऑफिसर ग्रेड); दिल्ली, अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप, दमण दीव आणि दादरा आणि नगर हवेली सनदी सेवा; दिल्ली, अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप, दमण दीव आणि दादरा आणि नगर हवेली पोलीस सेवा; पुदुचेरी सनदी सेवा आणि पुदुचेरी पोलीस सेवा इत्यादी.

उपरोक्त नमूद सर्व सेवांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते.

स्वातंत्र्योत्तर भारतात सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय प्रशासनाच्या स्वरूपात अनेक बदल घडवून आणले. त्यांनी ICS चे नाव बदलून केवळ IAS असे केले नाही तर या सेवा गुणधर्माने आणि कार्य चारित्र्याने ‘भारतीय’ कशा ठरतील, या दृष्टीने काम केले. स्वतंत्र भारतातील नेतृत्वाने स्वातंत्र्यपूर्व काळातील अधिकाऱ्यांची दमनकारी व अत्याचारी स्वरूपाची संरचना बदलून कल्याणकारी राज्याची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. सरदार पटेल या सेवांना ‘भारताच्या ऐक्याची पोलादी चौकट’ असे संबोधत असत. या सेवांद्वारे भारत हे एक ‘राष्ट्र’ म्हणून विकसित व्हावे ही त्यांची अपेक्षा होती आणि ते साध्य करण्यास व एकूणच राष्ट्राच्या भरभराटीत या सेवांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, याची त्यांना जाणीव होती.

भारतीय समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सेवांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ.

* भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)-

भारतीय प्रशासनातील हे सर्वोच्च पद आहे. या पदावरील व्यक्ती तिच्या अखत्यारीतील प्रदेशाच्या, विभागाच्या विकासासाठी जबाबदार असते. या पदावरील व्यक्तीला पुढील कार्ये पार पाडावी लागतात – कायदा व सुव्यवस्था राखणे; महसूल गोळा करणे, त्यासंबंधीची व्यवस्था पाहणे व त्यासंबंधीचा न्यायनिवाडा करणे; राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याद्वारे आलेल्या योजनांचे व्यवस्थापन पाहणे व त्यासंबंधीच्या अडीअडचणी सोडविणे; दंडाधिकारी म्हणून काम पाहणे; सरकारच्या नियमित कामांत भाग घेणे, प्रशासकीय व राजकीय प्रमुखास माहिती देऊन धोरणनिश्चितीसंदर्भात काम करणे इत्यादी.

साधारणत: IAS पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीला तिच्या प्रशिक्षणानंतर उपजिल्हाधिकारी/ सहायक जिल्हाधिकारी अशा पदावर काम करता येते व नंतर स्वतंत्रपणे जिल्हाधिकारी/ आयुक्त/ विभागप्रमुख म्हणून नियुक्ती मिळू शकते. या सेवेतील अधिकाऱ्यांना सरकारी, निमसरकारी विभागांपासून ते अगदी UN/ADB  किंवा World Bank‘ येथेसुद्धा सरकारद्वारे नियुक्त केले जाते. Cabinet Secretary हे IAS सेवेतील सर्वोच्च/ वरिष्ठ पद आहे.

*  भारतीय पोलीस सेवा (IPS) –

देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी केंद्र आणि राज्याच्या गृह मंत्रालयाकडे असते. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी या दोन्ही मंत्रालयांच्या नियंत्रणाखाली राहून आपल्या पदाची जबाबदारी पार पाडतात. पोलीस आणि कायदा-सुव्यवस्था हे राज्याच्या अखत्यारीत येणारे घटक आहेत.

या सेवेतील अधिकाऱ्यांना पुढील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात – कायदा व सुव्यवस्था राखणे; गुन्हे निर्मूलन व गुन्हेगारी रोखणे; गुन्हे तपास, शोध व गुप्त माहिती मिळवणे; महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षाव्यवस्था सांभाळणे; नागरी जीवनातील आर्थिक गैरव्यवहारांची तपास व्यवस्था सांभाळणे; आपत्कालीन व्यवस्था पाहणे, नियोजनात भाग घेणे आणि जिल्हा/राज्य प्रशासकीय व राजकीय प्रमुखांसोबत नेमून दिलेल्या कार्यकक्षेत काम करणे, इत्यादी.

पुढील लेखात आपण आणखी काही सेवांची माहिती घेऊ.