यूपीएससीची तयारी  :- प्रवीण चौगले

या लेखामध्ये आपण यूपीएससी पूर्वपरीक्षा २०२० करिता ‘भूगोल’ या विषयाच्या तयारीचा आढावा घेऊयात. भूगोल हा पूर्वपरीक्षेमध्ये अधिक गुण मिळवून देणारा विषय आहे, कारण बहुतांश प्रश्न संकल्पनांवर आधारित असतात. आपण जर सर्व संकल्पना नीट अवगत करून घेतल्या तर हा विषय आवाक्यात येतो. भूगोलावर दरवर्षी सरासरी १५ ते १८ प्रश्न विचारले जातात. २०१९ च्या पूर्वपरीक्षेमध्ये या विषयावर ११ प्रश्न विचारण्यात आले होते.

आपणास ज्ञात आहेच की, भूगोल हा विषय विविध उपघटकांमध्ये विभागाला गेला आहे. त्यापैकी प्राकृतिक भूगोल या घटकाची तयारी कशी करावी, याबाबत आपण जाणून घेऊयात. प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वीविषयक सर्व बाबींचा अभ्यास केला जातो. यामध्ये शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण इ. घटकांविषयी माहिती घेणे आवश्यक आहे. यानंतर भूरूपशास्त्र या घटकामध्ये पृथ्वीचे कवच, अंतरंग, अंतरंगातील प्रक्रिया अभ्यासाव्या लागतात. यामध्ये विशेषत: ज्वालामुखी, भूकंपप्रवण क्षेत्रे इ. बाबी महत्त्वपूर्ण आहेत. सागरशास्त्र (Oceanography) मध्ये सागरतळ रचना, सागरी साधनसंपत्ती, सागरजल तापमान, सागराची क्षारता, सागरी प्रवाह, प्रवाळभित्तिका ((Coral Reefs), सागरी प्रदूषण इ.सोबत सागरमाला प्रकल्प, सागरी हद्दीवरून राष्ट्राराष्ट्रांमध्ये होणारे वाद String of pearls. बाबी लक्षात घ्याव्यात.

वातावरणाचे घटक, रचना, हवेचे तापमान व दाब, वारे, मान्सून, जेटप्रवाह, सायक्लोन्स, एल निनो, ला निना इ. हवामानशास्त्राशी संबंधित मुद्दे महत्त्वाचे आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वीचा सर्वागीण अभ्यास केला जातो. परिणामी या घटकास भूगोलाचा गाभा मानला जातो. प्राकृतिक भूगोल प्रामुख्याने संकल्पनात्मक बाबींशी अधिक जवळीक साधणारा घटक आहे. यामुळे उपरोल्लेखित घटकांचे पारंपरिक ज्ञान असणे क्रमप्राप्त आहे.

पूर्वपरीक्षेमध्ये नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये राजकीय नकाशाबरोबरच पर्वत, पर्वतांचा दक्षिणोत्तर किंवा पूर्व—पश्चिम क्रम, नद्या, समुद्र, वाळवंटे इ. प्राकृतिक भूगोलाशी संबंधित बाबींवरही प्रश्न विचारले जातात. नकाशावाचन करताना समकालीन घडामोडी ध्यानात घेणे आवश्यक ठरते.

प्राकृतिक भूगोलाची तयारी एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांपासून सुरू करावी. या पुस्तकांमधून मूलभूत आकलन करून घेतल्यावर पुढील टप्प्यामध्ये Certificate physical and human Geography by Goe Cheng Leang हे संदर्भ पुस्तक वापरावे. प्राकृतिक भूगोल हा बऱ्याच परीक्षार्थीसाठी निरस वाटणारा घटक आहे, मात्र या घटकाची स्वत:च्या नोट्स तयार केल्यास हा विषय आपल्या आवाक्यात येतो. नोट्स बनविण्यापूर्वी या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे  विश्लेषण करणे फायदेशीर ठरते.

 

या घटकावर २०१९ च्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊ.

१)  पुढीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

     समुद्र                          समुद्रालगतचा प्रदेश

१. एड्रियाटिक समुद्र           : अल्बानिया

२. काळा समुद्र                   :  क्रोएशिया

३. कॅस्पियन समुद्र               :  कझाकस्तान

४. भूमध्य समुद्र                 :  मोरोक्को

५. तांबडा समुद्र                 :  सीरिया

या प्रकारचे प्रश्न सोडविण्याकरिता भारत तसेच जगाच्या भूगोलातील प्राकृतिक घटकांची माहिती असणे आवश्यक आहे. यासोबतच नकाशावाचनाचे महत्त्वही यांसारख्या प्रश्नांमधून अधोरेखित होते.

 

२) पुढीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

हिमनदी                 नदी

१. बंदरपुंच्छ              :  यमुना

२. बारा शिग्री             :  चेनाब

३. मिलाम                 :  मंदाकिनी

४. सियाचीन              :  नुब्रा

५. झेमू                      :  मानस

या प्रश्नामध्ये भारतातील हिमनद्या आणि त्या हिमनदीतून उगम पावणाऱ्या इतर नद्या याविषयी विचारले आहे. याकरिता भारतातील नदीप्रणालींची माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये भारतातील प्रमुख नद्या, त्यांची उगमस्थाने, त्यांच्या उपनद्या आदी बाबींची माहिती असावी.

वरील प्रश्नांवरून नकाशाधारित प्रश्न व नकाशावाचनाचे महत्त्व अधोरेखित होते. नकाशावाचनाकरिता Oxford किंवा ttk ‘ चा अ‍ॅटलास घ्यावा. भूगोलाचा अभ्यास करताना व वर्तमानपत्र वाचत असताना अ‍ॅटलास नेहमी जवळ ठेवला पाहिजे.