यूपीएससीची तयारी : अपर्णा दीक्षित

या आधीच्या लेखाचा समारोप करताना आपण असे म्हटले होते की, सर्वच उमेदवारांना सर्वच घटक सोपे वाटत नाहीत. अशा वेळी सोप्या घटकांवरचे प्रश्न पहिल्या तासात अचूकपणे आणि लवकर सोडवून स्वत:चे मनोबल वाढवावे. मग नंतर अवघड वाटणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे; परंतु आपल्याला सोप्या वाटणाऱ्या घटकांवर गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत किती प्रश्न विचारले गेलेत आणि त्यातही कोणत्या उपघटकावर जास्त भर देण्यात आला आहे, याचे भान असणे गरजेचे आहे. मगच त्या उपघटकावरील प्रश्नांची दिलेल्या वेळेत अचूक उत्तर देण्यासाठी काय करता येईल याचा विचार करणे सोपे जाईल. पुढील तक्त्यामध्ये उताऱ्यावरील आकलन क्षमता या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे प्रश्न प्रकारानुसार वर्गीकरण केले आहे.

यामध्ये आपण पाहिले होते की, अनुमान, मुख्य संकल्पना आणि गृहीतक या प्रकारचे प्रश्न सर्वसमावेशक प्रश्न म्हणून ओळखले जातात. वरील तक्त्यानुसार अशा प्रश्नांचे प्रमाण हे विशिष्ट ठराविक माहितीवर आधारित विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपेक्षा जास्त आहे. यातील प्रत्येक प्रश्न प्रकार कशा पद्धतीने हाताळायचा हे आपण पहिल्या लेखात पाहिले; पण इथे एक बाब लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे लेखक अप्रत्यक्षरीत्या काय सांगतो आहे ते ओळखण्याचे कौशल्य. इंग्रजी भाषेवर अत्यंत प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे. यामध्ये समानार्थी शब्द, वाक्प्रचार, वाक्यांचे प्रकार आणि यांचे एकमेकांत रूपांतर करण्याची प्रक्रिया इ.चे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच पूर्ण उतारा आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हे जाणता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पुढील तक्ता आपल्याला अंकगणित आणि सामान्य बुद्धिमत्ता या घटकातील विचारल्या जाणाऱ्या विविध विषयांवरील प्रश्नांच्या संख्येचे विश्लेषण देत आहे.

यामध्ये सर्वात जास्त सरासरीने विचारले जाणारे विषय आहेत – संख्या, सरासरी, शेकडेवारी, सुलभीकरण (Simplification), गुणोत्तर आणि प्रमाण, Combination Permutation  इ. याव्यतिरिक्त असेही काही विषय आहेत, की ज्यावर दरवर्षी हमखास एक तरी प्रश्न असतोच. उदा. काम आणि वेळ, मिश्रण इ. आता ज्या विषयांवर सरासरीने जास्त प्रश्न विचारले आहेत, त्यांचा अभ्यास करताना खूप सूत्रे लक्षात ठेवावी लागत नाहीत. प्राथमिक संकल्पना लक्षात आल्यानंतर सर्वात उपयोगी पडणारे कौशल्य म्हणजे दिलेल्या माहितीचे सूत्रांमध्ये वा समीकरणांमध्ये रूपांतर करता येणे. येथेदेखील दिलेल्या प्रश्नांचे अचूक आकलन होण्यासाठी इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी पूर्वपरीक्षेची वाट न पाहता अगोदरपासूनच इंग्रजीचे अचूक आकलन होईल इतके कौशल्य विकसित करण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. काही उमेदवारांना इंग्रजी आणि गणित दोघांचीही भीती वाटत असते; पण जर या विषयांकडे सुरुवातीपासून नियोजन करून हळूहळू लक्ष दिले तर आपली भीती किती निरर्थक होती याची जाणीव होईल. या विषयांच्या अभ्यासामध्ये सातत्य मात्र असायला हवे. नाही तर काही महिने अभ्यास करून सोडून देणे कधीही फायद्याचे ठरणार नाही हे लक्षात ठेवावे.

आता आपण तार्किक क्षमता आणि विश्लेषण क्षमता या घटकांतील विविध विषयांवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत.

वरील तक्ता पाहिला की असे लक्षात येते की,Puzzles या विषयावरच जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले आहेत; पण हा विषय वाटतो तसा एकसंध नाही. या विषयामध्ये विचारल्या

जाणाऱ्या प्रश्नांतील माहिती ही अत्यंत निरनिराळ्या घटकांतील संबंधांचा विचार करते. जसे की, व्यक्ती, त्यांच्यातील नाती, त्यांचे व्यवसाय, राहण्याची ठिकाणे, त्यांची वये इ. बऱ्याचदा दिलेल्या माहितीला जर योग्य रीतीने दिलेल्या अटींनुसार मांडता आले तर सर्वच प्रश्नांची अचूकरीत्या उत्तरे देता येतात.

इथे 5×3 matrix चा हमखास वापर करता येतो; पण माहितीचे स्वरूप पूर्णपणे लक्षात आल्याशिवाय ती मांडण्याचा प्रयत्न करू नये. बऱ्याचदा माहिती ही विखुरलेल्या स्वरूपात दिलेली असते. अशा वेळी कोणती माहिती पहिल्यांदा उपयोगी आहे आणि कोणती नंतर याचा निर्णय घ्यावा लागतो आणि नंतर वापरावयाच्या माहितीला खूण करून ठेवावी लागते. हे सर्व अत्यंत शांतचित्ताने करावे लागते. Judgemental Reasoning मधील प्रश्न सोडवताना कधी कधी Syllogism मधील आकृत्यांचा वापर करता येतो. त्यासाठी आधी Non—standard statements ¨FZ standard statements  मध्ये रूपांतर करून घ्यावे लागते. Syllogism हा एक महत्त्वाचा विषय असल्याने त्याची पुरेशी तयारी होणे अपरिहार्य आहे. Non—Verbal Reasoning या प्रकारामध्ये एक तर आकृत्या दिल्या जातील किंवा दिलेल्या माहितीचे आकृतीमध्ये रूपांतर करून प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. आपल्याला कोणता घटक सोपा वाटतो एवढाच विचार करणे पुरेसे नाही तर त्या घटकातील प्रत्येक उपघटकाचा विचार करून त्याच्यावर सजगपणे काम करणे गरजेचे आहे. तरच आपल्याला परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास प्राप्त होईल.