News Flash

सीसॅटसाठी रणनीती आणि आव्हाने

सर्वात अगोदर आपण किती गुणांचे ध्येय ठेवणे आवश्यक आहे, हे ठरवावयास हवे.

यूपीएससीची तयारी : अपर्णा दीक्षित

याअगोदरच्या लेखामध्ये आपण CSAT च्या विविध घटकांतील विषयांचे गेल्या तीन वर्षांत विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आधारावर विश्लेषण केले होते. आता या लेखामध्ये आपण पेपर सोडवताना लागणारी रणनीती कशी आखायची आणि ते करत असतानाची आव्हाने काय आहेत, हे पाहणार आहोत.

कोणत्या रणनीतीला एक उत्तम रणनीती म्हणता येईल? उत्तम रणनीती म्हणजे अशी की, जी आपल्यातील कार्यक्षमता, कौशल्य, तयारी आणि कमतरतांचा अचूक अंदाज घेऊन ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन करण्यासाठी मदत करते. यामध्ये आपल्याला सोपे तसेच अवघड वाटणाऱ्या घटकांची आणि त्यातील विषयांची जाणीव, अपुरी तयारी असलेल्या विषयांची जाणीव, वाचनाचा अपेक्षित वेग आणि आपला वाचनाचा वेग, मिळवावयाच्या गुणांचे उद्धिष्ट आणि अपेक्षित अचूकता आणि त्यासाठी सोडवावयास लागणाऱ्या प्रश्नांची संख्या, प्रश्न सोडवताना वेळ वाचवणाऱ्या पद्धती या सर्वांचा विचार करून केलेले वेळेचे नियोजन इ.चा अंतर्भाव होतो. आता यातील एकेक घटकांवर आपण चर्चा करू यात.

सर्वात अगोदर आपण किती गुणांचे ध्येय ठेवणे आवश्यक आहे, हे ठरवावयास हवे. CSATहा किमान पात्रता पेपर असून त्यात कमीत कमी ६६ गुण मिळवणे अपरिहार्य आहे. पण त्यामुळे फक्त ६६ गुणांचे ध्येय ठेवणे अत्यंत धोक्याचे राहील. कारण परीक्षेत आपण जे काही पर्याय उत्तर म्हणून निवडतो ते सर्वच अचूक असतील हा अंदाज ते पर्याय निवडताना येईलच असे नाही. म्हणून अशा नकळत चुका झाल्या तरी आपल्याला कमीत कमी गुण खात्रीशीर मिळवता येतील यासाठी मुळातच आपले ध्येय हे ६६ गुणांपेक्षा जास्त ठेवायला हवे जसे की, ८० गुण वा १०० गुण. मग हे गुण प्राप्त करण्यासाठी सोडवलेल्या प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर यायला हवीत याचा अंदाज असायला पाहिजे. सोडवलेले प्रश्न आणि विविध गुणांच्या ध्येयानुसार सोडवलेल्या प्रश्नांपैकी अपेक्षित अचूक प्रश्नांची संख्या हे दाखवणारा तक्ता बाजुला दिला आहे.

जसे की, जर एखाद्याने ६० प्रश्न सोडवले असतील तर ६६ गुण प्राप्त करण्यासाठी किमान ३५ प्रश्नांची उत्तरे अचूक असायला हवीत तरच नकारात्मक गुणपद्धतीचा परिणाम परीक्षेच्या निकालावर होणार नाही. पण जर ध्येय ८० वा १०० गुणांचे असेल तर ६० प्रश्नांपैकी अनुक्रमे ३९ आणि ४५ प्रश्न अचूक असायला हवेत. मगच आपण नकळत होणाऱ्या चुकांना सावरून घेऊ शकतो. यासाठी आपण सोडवणाऱ्या प्रश्नांच्या अचूकतेचा आणि प्रश्न सोडवण्याच्या वेगाचा अंदाज असणे आवश्यक आहे. हे सर्व लक्षात येण्यासाठी पुरेसे सराव पेपर सोडवणे आवश्यक आहे.

आता आपण वाचनाच्या वेगाबद्दल बोलू या. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ च्या CSAT पेपरमध्ये एकूण ७८२० शब्द होते. बऱ्याच जणांना एकदाच वाचून प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत. म्हणून कमीत कमी ७० ते ८० टक्के  माहिती परत डोळ्याखालून घालावी लागते. याशिवाय आपण सर्वच वेळ फक्त वाचनात घालवत नाही तर त्यापैकी काही वेळ विचार करून उत्तर काढण्यात घालवतो. हे सर्व लक्षात घेतले की असे लक्षात येते की, आपल्या वाचनाचा वेग अंदाजे १७५ ते २०० शब्द दर मिनिट असायला पाहिजे. आता प्रत्येकाने आपापल्या वाचनाचा वेग तपासून पाहावा. आता काही जण म्हणतील की हा पेपर पास होण्यासाठी सर्व प्रश्न सोडवण्याची गरज नाही. हे बरोबर आहे. पण कोणते प्रश्न सोडवावेत आणि कोणते नाही यासाठी प्रत्येक प्रश्नातील काही भाग वा कधी कधी सर्व भाग वाचावा तर लागेलच. मग अशा वेळी प्रश्नांची निवड कशी करावी आणि कुठे कुठे वेळ वाचवता येऊ शकतो हे आता पाहू या.

पहिल्यांदा जर प्रश्न प्रकार वा माहिती वा उताऱ्याचा विषय वा भाषेची शैली हे सर्व जर अपरिचयाचे वा नेहमी अवघड जाणारे असतील तर प्रश्न सोडवण्याच्या पहिल्या फेरीत त्याच्यावर वेळ घालवू नये. जर खूप साऱ्या माहितीवर अगदीच कमी प्रश्न विचारले असतील तर अशा प्रश्नांना कमी प्राधान्य द्यावे. उतारा सोडवताना जर प्रश्नाचे स्वरूप अप्रत्यक्ष म्हणजे विधाने देऊन त्यांच्या सत्यते वा असत्यतेबद्दल विचारले असेल तर Elimination  पद्धतीचा उपयोग होतो का हे पाहावे. ही पद्धत म्हणजे विधाने वाचण्याच्या अगोदर पर्याय पाहावेत आणि त्यांतील असे विधान शोधावेत जे जर चूक निघाले तर चारपैकी तीन पर्याय चूक ठरतात. असे विधान सापडले की पहिल्यांदा त्याची सत्यता पडताळावी, असे केल्याने बराच वेळ वाचतो. याअगोदरच्या लेखांमध्ये tally  म्हणजेच ताळा पद्धतीचा उल्लेख केला होता. तिचाही वापर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे करावा. त्याचप्रमाणे जर इंग्रजी भाषेवर आपली पक्की पकड नसेल तर असे प्रश्न जिथे शब्दच्छल वा समजावयास अवघड वा कधीच परिचय न झालेल्या वाक्यप्रकाराचा उपयोग केला असेल तो प्रश्नप्रकार कितीही परिचयाचा असला तरी त्याला शेवटी हाताळावे.

एक चांगली रणनीती आखताना एवढ्या सर्व बाबींचा बारकाईने विचार केला तर पूर्वपरीक्षेमध्ये यश संपादन करणे अत्यंत सोपे काम होऊन जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2021 12:04 am

Web Title: upsc exam study akp 94 24
Next Stories
1 अभियांत्रिकी सेवा भूगोल व पर्यावरण
2 नागरी सेवा क्षमता चाचणी
3 एमपीएससी मंत्र : अभियांत्रिकी सेवा इतिहास, राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था
Just Now!
X