News Flash

आधुनिक भारताचा इतिहास

पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या भारतीयांनी सामाजिक व धार्मिक सुधारणा हाती घेतल्या.

यूपीएससीची तयारी : श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये आपण आधुनिक भारताच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या कालखंडाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वांगीण आढावा घेणार आहोत. १८५७ च्या उठावामुळे कंपनीची सत्ता संपष्टात आलेली होती आणि भारतावर ब्रिटिश राजसत्तेचे थेट नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलेले होते. हे सत्तांतर १८५८ च्या भारत सरकारच्या कायद्याद्वारे झालेले होते.

पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या भारतीयांनी सामाजिक व धार्मिक सुधारणा हाती घेतल्या. या सुधारणांनी जातीप्रथा, अस्पृश्यता, सामाजिक आणि कायदेशीर भेदभाव यासारख्या सामाजिक परंपरा आणि मूर्तीपूजा आणि अंधश्रद्धा यासारख्या धार्मिक बाबींवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. या चळवळी पुरोगामी स्वरूपाच्या होत्या. या सर्व चळवळी व्यक्तिगत समानता, सामाजिक समानता, विवेकवाद, प्रबोधन, उदारमतवाद यासारख्या लोकशाही मूल्यांवर आधारित सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करणे या उद्देशांनी प्रेरित होत्या. पाश्चिमात्य शिक्षणामुळे भारतीयांनी आधुनिक विवेक, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि राष्ट्रवादी राजकीय दृष्टिकोनाचा अंगीकार केलेला होता. इंग्रजी भाषेने देशात राष्ट्रवादाची वाढ होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती, ही भाषा भारतातील विविध प्रदेशातील उच्च शिक्षित लोकांची वैचारिक देवाणघेवाण करण्याची माध्यम बनली. पाश्चिमात्य शिक्षणामुळे देशात स्वातंत्र्य, समता व बंधुता या संकल्पना रुजण्यास सुरुवात झाली आणि शिक्षित भारतीयांमध्ये दृष्टिकोन आणि हितसंबंध यामध्ये काहीसा एकसारखेपणा निर्माण झाला. तसेच काही भारतीयांनी ब्रिटिश साम्राज्यवादाच्या आर्थिक धोरणाची समीक्षा करून ब्रिटिश आर्थिक धोरणे भारतीयांचे शोषण कशाप्रकारे करत आहेत हे दाखवून दिले. या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की, भारतात राष्ट्रवादाची उभारणी झाली व १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. येथूनच पुढे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भारतीय राष्ट्रीय चळवळीची वाटचाल सुरू झाली. साधारणत: भारतीय राष्ट्रीय चळवळीचे तीन टप्पे केले जातात. १८८५ ते १९०५ (मवाळ कालखंड), १९०५ ते १९२० (जहाल कालखंड) आणि १९२० ते १९४७ (गांधी युग). या टप्प्यानिहाय भारतीय राष्ट्रीय चळवळीतील इतर प्रवाह या अंतर्गत क्रांतिकारी चळवळी, कनिष्ठ जातीतील चळवळी, कामगार चळवळ, भारतीय संस्थाने व संस्थानातील प्रजेच्या चळवळी, भारतीय राष्ट्रीय चळवळीमधील महिलांचे योगदान, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी आणि गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय यांचे कार्य व ब्रिटिशांच्या काळातील भारतातील घटनात्मक विकास यासारख्या बाबींचा अधिक विस्तृत आणि सखोल अभ्यास करावा लागणार आहे. आधुनिक भारताच्या या कालखंडावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. गतवर्षीय परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न आणि यासाठी लागणारा आकलनात्मक दृष्टिकोन.

१९२० च्या दशकातील राष्ट्रीय चळवळीने अनेक विचारधारांचे अधिग्रहण करून स्वत:चा सामाजिक आधार विस्तारित केला. चर्चा करा.

हा प्रश्न समजून घेताना गांधीजींची विचारधारा, समाजवादाची विचारधारा, क्रांतिकारी विचारधारा इत्यादी विचारधारा माहिती असणे गरजेचे आहे आणि याद्वारे राष्ट्रीय चळवळीने स्वत:चा विस्तार कसा केला, याची उदाहरणासह दाखवून चर्चा करणे येथे अपेक्षित आहे.

 

 १९४० च्या दशकादरम्यान सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया गुंतागुंतीची बनविण्यामागील ब्रिटिश साम्राज्य सत्तेच्या भूमिकेचे मूल्यांकन करा.

या प्रश्नाचे आकलन करताना दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे निर्माण झालेली स्थिती आणि तत्कालीन भारतीय चळवळीतील भारतीय नेत्यांच्या मागण्या याविषयीचे आकलन आणि समज गरजेची आहे. या मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ब्रिटिशांनी केलेल्या उपाययोजना आणि या उपाययोजनांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया कशी गुंतागुंतीची बनविलेली होती हे सोदाहरण स्पष्ट करून ब्रिटिश साम्राज्य सत्तेच्या भूमिकेचे मूल्यांकन करावे लागते.

 

‘स्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा फक्त तीन वर्षांमध्ये तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य संविधान सभेला पूर्ण करणे कठीण गेले असते, पण १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्याच्या अनुभवामुळे करता आले. चर्चा करा.’

प्रश्न समजून घेताना ब्रिटिश शासन काळात संविधान निर्मितीला चालना देणारे कायदे

आणि हे कायदे कसे १९३५ चा भारत सरकार कायदा याची पार्श्वभूमी तयार करणारे होते हे सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहे. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना १९३५ चा भारत सरकार कायदा आणि यातील तरतुदी याचा प्रामुख्याने स्वतंत्र भारताचे संविधान तयार करताना संविधान सभेने विचार केलेला होता आणि यातील अनेक तरतुदीचा संविधानामध्ये समावेश केलेला होता, हे थोडक्यात नमूद करून १९३५ चा भारत सरकार कायदा हा संविधान सभेला कशा स्वतंत्र भारताचे संविधान तीन वर्षांमध्ये तयार करण्यासाठी उपयुक्त ठरला, हे दाखवून चर्चा करणे अपेक्षित आहे.

 

‘सद्यस्थितीमध्ये महात्मा गांधीजींच्या विचारांचे महत्त्व यावर प्रकाश टाका.’

या प्रश्नाचे उत्तर लिहिताना महात्मा गांधीची विचारधारा थोडक्यात नमूद करून, सद्यस्थितीमध्ये घडणाऱ्या घडामोडीची पार्श्वभूमी देऊन ही विचारधारा कशी महत्त्वाची आहे हे अधोरेखित करून दाखवावे लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 12:04 am

Web Title: upsc exam study akp 94 27
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा इतिहास सुधारणा किती आणि कशा
2 यूपीएससीची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास
3 चालू घडामोडी  दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा
Just Now!
X