News Flash

आधुनिक जगाचा इतिहास

आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात साधारणत: १५ व्या शतकापासून झाली असे समजले  जाते.

यूपीएससीची तयारी : श्रीकांत जाधव

अभ्यासक्रमामध्ये १८ व्या शतकातील घटना उदा. औद्योगिक क्रांती, जागतिक महायुद्धे, राष्ट्रांच्या सीमारेषांची पुनर्रचना, वसाहतीकरण व निर्वसाहतीकरण, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद यांसारखे राजकीय विचारप्रवाह/ तत्त्वज्ञान व त्याचे प्रकार आणि त्याचा समाजावरील प्रभाव अशा पद्धतीने आधुनिक जगाचा अभ्यासक्रम नमूद केलेला आहे.

आधुनिक जगाचा इतिहास – पार्श्वभूमी

आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात साधारणत: १५ व्या शतकापासून झाली असे समजले  जाते. युरोपमधील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये प्रबोधन युगामुळे एक मूलभूत बदल होण्यास प्रारंभ झालेला होता. तर्कशक्ती, बुद्धिप्रामाण्यवाद यांसारख्या तत्त्वांना अनुसरून विचार प्रक्रियेला सुरुवात झालेली होती. शतकानुशतके अस्तित्वात असणाऱ्या परंपरांना चिकित्सक पद्धतीने स्वीकारणे सरू झालेले होते, ज्यामुळे वैज्ञानिक विचारप्रक्रियेला अधिक चालना मिळालेली होती आणि याच्या परिणामस्वरूप अनेक वैज्ञानिक शोध लावण्यात आलेले होते. अनेक भौगोलिक शोध लावले गेले आणि या शोधांमुळे वसाहतवाद आणि साम्राज्यवाद याची सुरुवात झालेली दिसते.

युरोपमध्ये १८ व्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि यामुळे जगाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात झालेली होती. अनेक राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञान उदयाला आलेले होते आणि या राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञानामध्ये भांडवलवाद, समाजवाद आणि साम्यवाद हे महत्त्वपूर्ण मानले जातात व यांचा सद्यस्थितीमध्येही प्रभाव दिसून येतो. अशा पद्धतीने एक व्यापक समज विकसित करावी लागते.

१८ व्या शतकातील महत्त्वाच्या घटना उदा. राजकीय क्रांती – अमेरिकन व फ्रेंच क्रांती, औद्योगिक क्रांती, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकन खंडामधील युरोपियन साम्राज्यवाद; राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञान – भांडवलवाद, साम्यवाद, आणि समाजवाद इत्यादी, तसेच १९ व्या शतकातील युरोपातील राज्यक्रांती व राष्ट्रवादाचा उदय आणि जर्मनीचे व इटलीचे एकीकरण, आधुनिक जपानचा उदय, अमेरिकेतील गृहयुद्ध इत्यादी महत्त्वाच्या घटना या काळाशी संबंधित आहेत व सर्वाधिक प्रश्न या घटनांशी संबंधित विचारले जातात.

प्रस्तुत लेखामध्ये १८ व्या आणि १९ व्या शतकातील घटनांची माहिती घेणार आहोत आणि त्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन याची तयारी कशी करावी याबाबत चर्चा करणार आहोत. या विषयाची तयारी करताना आपणाला साधारणत: युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडातील देशांमध्ये १८ व्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटना व त्यांचे परिणाम आणि यामुळे घडून आलेले बदल यांसारख्या विविधांगी पैलूंची माहिती अभ्यासणे महत्त्वाचे ठरते.

गतवर्षीय परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले कांही प्रश्न

‘उशिराने सुरू झालेल्या जपानमधील औद्योगिक क्रांतीमध्ये निश्चित काही असे घटक होते, जे पश्चिमेतील देशांच्या अनुभवापेक्षा खूपच भिन्न होते.’ विश्लेषण करा.

‘आफ्रिकेचे युरोपीय प्रतिस्पर्धी यांच्या आकस्मातामुळे   छोट्या छोट्या कृत्रिमरीत्या निर्मित राज्यामध्ये तुकडे करण्यात आले.’ विश्लेषण करा.

‘अमेरिकन क्रांती वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव होता.’ सिद्ध करा.

सर्वप्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच का झाली? औद्योगिकीकरणाच्या काळामधील तेथील लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेची चर्चा करा. भारताच्या सद्यस्थितीमधील जीवन गुणवत्तेशी ती कशी तुलनात्मक आहे?

अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीनी आधुनिक जगाचा पाया कशा प्रकारे रचला. स्पष्ट करा.

२०२० मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत.

उपरोक्त प्रश्न हे औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद या दोन महत्त्वाच्या घटनांशी संबंधित आहेत. या प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी साम्राज्यवाद आणि वसाहतवाद काय होते आणि याची सुरुवात कशी झाली आणि यासाठी नेमके कोणते घटक कारणीभूत होते आणि औद्योगिक क्रांतीला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यामुळे कसा फायदा झाला, या विषयी माहिती असणे गरजेचे आहे. आपणाला प्रबोधन युग आणि या युगाचे परिणाम, स्वरूप, युरोपमधील समाजजीवनामध्ये घडून आलेले बदल याचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय वसाहतवाद आणि साम्राज्यवाद हे युरोपमधील देशांनी सुरू केलेली प्रक्रिया आणि याअंतर्गत त्यांनी आशिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडामध्ये कशा प्रकारे वसाहती स्थापन करून साम्राज्यवाद निर्माण केला याचे योग्य आकलन करता येत नाही. अमेरिकन क्रांतीसंबंधीचा प्रश्न समजून घेण्यासाठी सर्वप्रथम वाणिज्यवाद काय होता आणि इंग्लंड या देशाने वाणिज्यवादाद्वारे अमेरिकन वसाहतीची आर्थिक नाकेबंदी कशी केलेली होती, याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. या माहितीचा वापर करून अमेरिकन क्रांती ही वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव होता हे आपणाला सोदाहरण स्पष्ट करता येते. अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतींनी आधुनिक जगाचा पाया निर्माण करण्यात कोणते योगदान दिलेले आहे हे मुद्देनिहाय अधोरखित करून स्पष्ट करावे लागते. हे सर्व प्रश्न विषयाची सखोल माहिती गृहीत धरून विचारण्यात आले आहेत.

या घटकाची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शालेय पुस्तकांमधून मूलभूत माहिती अभ्यासावी आणि या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘अ हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वल्र्ड’ हा राजन चक्रवर्ती लिखित संदर्भ ग्रंथ वाचावा. तसेच बाजारामध्ये या विषयावर अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत, ती देखील पाहावीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 12:11 am

Web Title: upsc exam study akp 94 28
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे अभ्यासतंत्र
2 स्वातंत्र्योत्तर भारत
3 मुख्य परीक्षा – इतिहास अभ्यासक्रम विश्लेषण
Just Now!
X